नागपूर सायबर सेल. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात इथं दोन तक्रारी दाखल झाल्या. एका तक्रारीत हेमनानी यांनी सोनी लाईव चॅनल डाऊनलोड करण्यासाठी टोल फ्री नंबरवर फोन केला होता. त्यावेळी त्यांना काहीच प्रतिसाद मिळाला नाही. थोड्या वेळातच दुसऱ्या नंबरवरून त्यांना फोन आला. त्यांना नक्की काय समस्या आहे हे बोलणाऱ्या व्यक्तीने विचारून घेतलं. आणि त्यांना कॅंडिडेट ॲप डाऊनलोड करायला सांगितलं गेलं. लगेच पाच रूपये ट्रान्सफर करायला लावून त्याचा स्क्रीन शॉट शेअर करायला सांगितला गेला. हेमनानी यांनी विश्वास ठेवला आणि समोरच्या व्यक्तीला ओटीपी नंबर सांगितला. काही वेळातच त्यांच्या मोबाईलवर 1 लाख 32 हजार रूपये खात्यातून ट्रान्सफर झाल्याचा मेसेज हेमनानी यांच्या मोबाईलवर झळकला. हे बघून हेमनानी यांना आपण फसवले गेलोय हे लक्षात आलं.
सायंटिस्ट असलेल्या मिश्रा यांच्या बाबतीत तर वेगळंच काहीतरी घडून आलं. आरोपीने त्यांची बनावट सही करून आयसीआयसीआय बॅंकेतील खात्यात लिंक असलेला मोबाईल नंबर बदलण्यासाठी अर्ज केला. बॅंकेनेही कुठलीही शहानिशा न करता हा अर्ज स्वीकारला आणि नवीन नंबर लिंक केला. हा नवा नंबर लिंक होताच आरोपीने आपल्या खात्यात 26 लाख 50 हजार रूपये ट्रान्सफर करून घेतले. एवढी मोठी रक्कम दुसऱ्या खात्यात गेली तरी बॅंकेकडून खातेदाराला कुठलाही अलर्ट मेसेज गेला नाही. चार-पाच दिवसांनी मिश्रा यांना खात्यात झालेला फेरफार कळला. आणि त्यांनी लगेचच नागपूर सायबर सेलकडे तक्रार केली.
हेमनानी आणि मिश्रा यांनी लगेचच सायबर सेलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक.बागुल यांच्याकडे तक्रार दाखल केली. तक्रार मिळताच अवघ्या 15 मिनिटात पोलीस शिपाई कुणाल हटेवार यांनी बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली बँकेच्या नोडल ऑफिसरशी संपर्क साधला. फ्लिपकार्ड वॅलेटद्वारे वळते झालेले पैसे त्यांनी परत हेमनानी यांच्या खात्यात जमा करायला लावले. मिश्रा यांच्या बाबतही पोलीस शिपाई अजय पवार यांनी त्या बॅंकेला ईमेल पाठवला. बॅंकेच्या अधिकाऱ्यांशी बोलून काय घडलंय याची माहिती दिली. चौकशी केली आणि मिश्रा यांची रक्कम परत मिळवून दिली.
– निता सोनवणे, नागपूर