सीतारामबाबांनी फटाके फोडले नाहीत, दगड मारले नाहीत, तरी पक्षी पिकापासून दूर राहिले

चापडगावातल्या एका शेतात तेलाचा डबा , काठी यांच्या साथीवर दमदार गाण्याचा आवाज घुमतो. हा आवाज सीतारामबाबा पवार यांचा. वय सत्तरच्या आसपास. पंचक्रोशीत वाघ्या कलावंत म्हणून प्रसिद्ध .
नाशिक जिल्ह्यातल्या निफाड तालुक्यात नांदूर पक्षी अभयारण्याला लागून चापडगाव आहे. गावाजवळ सीतारामबाबांची एक एकर शेती आहे. शेती कमी असल्यानं ते आणि त्यांचे सहकारी पंचक्रोशीत खंडोबाची गाणी सादर करत. पोटापाण्यासाठी हाच मुख्य आधार. पण यंदा कोरोनामुळे कार्यक्रम बंद. दोन वेळच्या खाण्याचीही भ्रांत पडू लागली. आता शेत हाच आधार होता.
बाबा दरवर्षी ऊस लावतात. गेली दोन वर्ष परिसरात पाऊस जास्त होत असल्यानं या वर्षी त्यांनी भात लावला. पीकही चांगलं आलं. पण काढणीसाठी ते तयार झालं तसं पक्षांचे थवेच्या थवे येऊ लागले. पिकाचं नुकसान टाळण्यासाठी फटाके फोडणं, गिलोरीनं दगड मारणं हे उपाय शेतकरी करतात. यात त्यांना इजाही होते.
बाबांचं पक्ष्यांवर प्रेम. पक्ष्यांना इजा न होता पीक सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांनी उपाय शोधला. सकाळी सात ते सायंकाळी सहापर्यंत ते शेतात थांबतात. काठीनं तेलाचा डबा ते वाजवतात. त्यांचा पिंड कलाकाराचा असल्यानं हे वादन आणि त्यासोबत त्यांचं गायन आनंद तर देतंच सोबत पक्ष्यांना जपण्याचा धडाही देतं.
#नवीउमेद #निफाड #नाशिक #नांदूरपक्षीअभयारण्य
-प्राची उन्मेष, ता. निफाड , जि. नाशिक
Charushila Kulkarni

SUPPORT