सुखकर्ता श्रीगणेश

कोरोनामुळे लॉकडाऊन झालं तेव्हाची ही गोष्ट. अनेक लोक कामाविना घरी बसले. त्यात हातावर पोट असणाऱ्यांचे खऱ्या अर्थाने हाल झाले. आता अनलॉकची प्रक्रिया सुरू झालेली असली तरी अनेकांना काम मिळालेलं नाही. अशांचा मदतीसाठी एक मुलगा उभा राहिला तो थेट ऑस्ट्रेलियातून. मूळचा सोलापूरचा, श्रीगणेश वल्लाकाटी. व्यावसायिक. सध्या वास्तव्य ऑस्ट्रेलिया. श्रीगणेश याने फेसबुकवर सोलापूरातील परिस्थिती वाचली. त्याचवेळी एमजे प्रथम मानव सेवा संस्था ही सोलापूरातील सेवाभावी संस्था गरीब आणि बेवारस लोकांना एकवेळच्या अन्नाची व्यवस्था करत आहे हेही त्याच्या वाचनात आलं.

श्रीगणेशने एमजे मानवचे संस्थापक – अध्यक्ष मोहन तलकोकुल यांच्या मोबाईल नंबरवर संपर्क साधला. संस्थेच्या खात्याची माहिती घेऊन आर्थिक मदत थेट संस्थेच्या खात्यावर टाकली. या मदतीमुळे गरीब, बेघर, निराधारांना ऐकवेळचं जेवण, चहा, नाष्टा तसंच धान्य कीट देण्याची व्यवस्था करण्यात आली.श्रीगणेश वल्लाकाटी यांनी शिक्षणानंतर व्यवसायासाठी थेट ऑस्ट्रेलिया गाठली. गेल्या पाच-सहा वर्षांपासून ते ऑस्ट्रेलियात स्थायिक आहेत. परदेशात राहत असले तरी त्यांनी मातृभाषेशी आणि गावाशी नाळ तोडली नाही. सामाजिक भान म्हणून ते वेळोवेळी संस्थांना मदत करत असतात.विशेष म्हणजे श्रीगणेश यांचा ‍१६ जून रोजी वाढदिवस होता. वाढदिवस साधेपणाने साजरा करत ती सर्व रक्कम त्यांनी गरजूंना अन्नधान्य देण्यावर खर्च केली. लॉकडाऊनपासून आतापर्यंत जवळपास एक लाख रुपये त्यांनी अन्नधान्य वाटपावर खर्च केले आहेत.

– अमोल सीताफळे, सोलापूर

Leave a Reply