सुख म्हणजे नक्की काय असतं?
एरवी हिंदी-इंग्रजी गाणं गुणगुणणारे, त्यात दंग होऊन जाणारे अस्मादिक आता आपसूकपणे “चिव-चिव चिमणी, अगं ए चिमणे”, “चांदोबा, चांदोबा भागलास का?”, “एका माकडाने काढलंय दुकान”, अशी गाणी गुणगुणतात. कामावरून परतल्यानंतर नेहमी येणारा थकवा घरात पाऊल टाकताच पळून जातो. अगदी जेवतानाही मोबाईलवरून दूर न होणाऱ्या हाताला आता घरी गेल्यावर फारशी मोबाईलची आठवणही येत नाही. कारण काय? तर गोडगोंडस चिमुकल्याचा, आमच्या ‘चिकू’चा आमच्या आयुष्यात झालेला प्रवेश.
२७ डिसेंबर २०२१. सकाळी नऊ वाजून सात मिनिटांनी डॉक्टरांनी ऑपरेशन रूमचा दरवाजा उघडला आणि एक चिमुकला जीव हातात आणून ठेवत ‘अभिनंदन!’ शब्द उच्चारला. त्याएका क्षणात गेल्या नऊ महिन्यात डोंगराएवढी वाटणारी हुरहुर, चिंता दूर जाऊन तिच्या जागी नवचैतन्याने प्रवेश केला. इवल्या इवल्या हाता-पायांची नाजूकशी हालचाल करत, डोळ्याच्या पापण्या हलक्या हलक्या उघडत टुकुटूकू पाहणारं बाळ, एक विलक्षण- शब्दांत मांडता न येणारा आनंद आणि त्याचसोबत वाढलेल्या जबाबदारीचं भानही देत होतं.
गर्भावस्थेतील आईचा आहार-विहार, याची विशेष काळजी डॉक्टरांच्या सल्ल्याने, बाळाच्या मामा, मामी, दोन्ही आत्यांसह घरातील ज्येष्ठांकडून घेतली गेल्यानं बाळाची आणि आईची दोघांचीही प्रकृती छान राहिली. बाळासाठी आईचं दूध म्हणजे अमृत! स्तनपानाचं वैज्ञानिक महत्त्व माहिती असल्यानं अगदी पहिल्या दिवसापासूनच त्यावर विशेष लक्ष होतं. शिवाय सिझेरियन बाळंतपण असल्यानं पत्नीचीही काळजी घेणं गरजेचं होतं. दोघांचीही काळजी घेत, पत्नीला पुरेसा आराम देत, आता बाळाच्या झोपण्या-उठण्याच्या वेळांवर माझं वेळापत्रक ठरू लागलंय.
दवाखान्यातून डिस्चार्ज घेताना चिमुकल्याला टीटीचं इंजेक्शन घ्यायचं होतं. आता आपल्या डोळ्यांदेखत, आपल्या बाळाचं हे पहिलंचं इंजेक्शन असल्याने काहीशी धाकधूक वाटत होतीच. पण या गोष्टी अपरिहार्य आणि आमच्या बाळाच्या उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्यासाठी उपयुक्त आहेत, हे माहिती होतंच. तरीही पुढच्या चार महिन्यातील सर्व लसीकरण होईपर्यंत बाळाला काही त्रास होईल का? अशी विनाकारण भीती वाटायची. पण ती तर बाळाच्या पुढील निरोगी वाढीसाठीची संजीवनीच आहे, अशी आम्ही दोघं एकमेकांची समजूत घालत होतो. बाळाला सुई टोचताना मनाला होणारा त्रास ‘बापपणा’ची जाणीव करून देणारा.
अनंत वैद्य त्याच्या बाळासह
आत्या-आजीच्या निगराणीखाली पारंपरिक पध्दतीने बाळाची टाळू भरणं, रोजची मालिश, न्हाऊ घालणं यात मी आणि पत्नी असा दोघांचाही सहभाग असतो. यातून पालकत्वाचा काहीसा आव्हानात्मक पण तितकाच हवाहवासा वाटणारा प्रवास हळुहळु सुकर होतोय. गर्भावस्थेतील २८० दिवस, अन‌् नंतरची दोन वर्षे असे एक हजार दिवस बाळाच्या वाढीसाठी अत्यंत महत्वाचे असतात. त्यामुळे आता साडेपाच महिन्यांच्या आमच्या बाळाशी आई, बाबा म्हणून आम्ही दोघंही जमेल तेवढ्या गप्पा मारणं, त्याला बडबडगीतं म्हणून दाखवणं, असं करतो. या सर्वात आपणही कधी लहान होऊन जातो, घरातलं वातावरण फक्त आणि फक्त आनंद नि उत्साहात कसं बदलून जातं, हे समजतही नाही.
यासह आजोबा आणि पणजी अशा दोन वेगवेगळ्या पिढ्यांच्या प्रेमळ प्रतिनिधींचा सहवास लाभत असल्याने चिमुकल्यासाठी तीदेखील वेगळीच पर्वणी ठरतेय.
यंदा उन्हाळ्याच्या दिवसांत बीडमध्ये विक्रमी उष्णता असल्याने बाळाला ताप जाणवायचा, दुसऱ्या बाजूला पंख्याखाली ठेवलं की लगेच त्याला सर्दीही व्हायची. मग अशा वेळी फारच विशेष काळजी घ्यावी लागली. शिवाय बाळाच्या दिनक्रमातील छोट्याछोट्या बदलांवरही लक्ष ठेवावं लागतं. मी ऑफिसला असतो तेव्हा बाळाची आई ही जबाबदारी एकहाती सांभाळते. पण घरी परतल्यानंतर त्यावर चर्चा होतेच. आता चिकुचं पोटावर पडणं, पाय रेटून पुढे जाण्यासाठी धडपड करणं असं सर्व सुरू आहे. हे सर्व अनुभवताना विलक्षण आनंद होतो. त्याचं निरागस हास्य पाहतच राहावंसं वाटतं. त्याच्याशी खेळताना तासन‌्तास असे निघून जातात की, अगदी कळतही नाही.
गोंडस बाळ आणि त्याची आई
त्यामुळेच ‘सुख म्हणजे नक्की काय असतं?’ या कोड्याचं उत्तर या चिमुकल्याच्या आगमनाने, या पालकत्वाच्या विलक्षण अनुभवानं मला तरी उलगडलेलं आहे. आमचं सुख आता आमच्या अंगणात रांगतंय आणि त्याची दिसामासानं निरोगी वाढ पाहणं यासारखा दुसरा आनंद नाही.
लेखन: अनंत वैद्य, बीड
नवी उमेद कसं वाटतं तुम्हाला? तुमचा अभिप्राय, प्रतिसाद अवश्य लिहा. आणि वाचकहॊ, तुम्हीही नवी उमेदला आर्थिक मदत करा. त्यासाठी ही लिंक: https://naviumed.org/support/

Leave a Reply