सुधाकरचा पुनर्जन्म

ऑक्टोबर महिन्यातल्या गडचिरोली दौर्‍यात सुधाकर जगुजी गावडे हा तरूण भेटला. हा येरंडी गावातला छोटा शेतकरी. येरंडी हे गडचिरोली जिल्ह्यातल्या धानोरा तालुक्यातलं लहानसं गाव. लोकसंख्या अवघी तीनशे. गावात ग्रामपंचायत सदस्यांशी आणि इतर गावकर्‍यांशी गप्पागोष्टी सुरू होत्या. येरंडीत झालेल्या सुधारणा हा विषय होता. खुद्द गावकर्‍यांकडूनच त्याबद्दल ऎकायला छान वाटत होतं. कारण सुधारणा त्यांनीच घडवून आणल्या होत्या. गप्पांदरम्यान, सुधाकरने पुढे येऊन सांगितलं की अवघ्या चार दिवसांमागे त्याला जणू पुनर्जन्म मिळालाय. कसा? 

तर त्याला शेतात काम करताना साप चावला. आणि तो शेतातच कोसळला. त्याच्या बायकोच्या हे लक्षात आलं आणि तिने आरडाओरडा करून लोकांना गोळा केलं. लोकांनी ताबडतोब ‘सर्च’ची ऍब्युलन्स बोलावली आणि सुधाकरला ‘सर्च’च्या दवाखान्यात नेलं. त्याला तिथे त्वरित उपचार मिळाले. तो वाचला. (‘सर्च’ ही डॉ अभय आणि डॉ राणी बंग यांनी स्थापन केलेली गडचिरोलीस्थित विख्यात संस्था.) स्वतःच्या सर्पदंशाची घटना सुधाकर स्वतःच सांगत होता. सुधाकर आणि इतर गावकरी सांगत होते की सर्पदंश झाल्यावर त्यांनी पुजार्‍याकडे (वैदू) जाणं कधीच बंद केलंय. कारण दवाखान्यात गेल्यावर जीव शंभर टक्के वाचतो.  गावातल्या सुधारणेचा याहून मोठा आणि जीताजागता पुरावा कुठला?
– मेधा कुळकर्णी