सुनसगावातल्या हिरकणी

 

जळगाव जिल्ह्यातला जामनेर तालुका. इथलं सुनसगाव. गाव तसं छोटसं. पण इथल्या अंगणवाडी सेविकांचं काम मात्र मोठं. कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू झालं आणि खरी परीक्षा सुरू झाली ती या सेविकांची. एरवी घरोघरी जाऊन गरोदर बायकांना आहाराविहाराचं महत्त्व पटवून देणं, समजावून सांगणं हे त्यांचं काम. पण तेही थांबलं. काय करायचं हा विचार सुरू झाला. आणि गावातील अंगणवाडी सेविका कल्पना कुलकर्णी, मदतनीस कुसुम महाजन यांनी त्यांच्या सुपरवायझर अर्चना धामोरे यांच्या मदतीने कोरोना काळात मुलांचं संगोपन, गरोदर माता आणि लसीकरण यासाठी योजना आखली. धामोरे यांच्या मार्गदर्शनाने गावात गरोदर माता ते शून्य वयोगटातील मुलांसाठी ‘हिरकणी’ व्हॉट्सअँप ग्रुप तयार करण्यात आला. १ ते ३ वर्षातील मुलांसाठी ‘छोटे सरदार’ तर ३ ते ६ वर्षातील मुलासांठी ‘माझी धमाल शाळा’ नावाचा व्हॉट्स अँप ग्रुप तयार केला गेला. प्रत्येक ग्रुपमध्ये गावातील १२ ते १५ सदस्यांना जोडण्यात आलं.

‘हिरकणी’ ग्रुपमध्ये गरोदर मातांनी कोणता आहार घ्यावा, अमृत आहार, लसीकरण याबाबत माहिती पाठवली जाते. स्तनपान कसं करावं? प्रसूती पूर्व तयारी कशी आणि कोणती करावी? अशी विविध उपयोगी माहिती सोप्या शब्दांमध्ये पाठवली जाते. कोरोनाकाळ असल्याने मोठे समूह एकत्रित न करता सोशल मीडियाच्या माध्यमातून या अंगणवाडी सेविका गावात माहिती पोहचवत आहेत.

‘छोटे सरदार’ या ग्रुपवर मुलांच्या आहाराची आणि लसीकरणाची माहिती दिली जात आहे. मुलांना वेळेवर लसी देण्यासाठी हा उपक्रम उपयोगी ठरला आहे. तर ‘माझी धमाल शाळा’ या ग्रुपवर मुलांना घरातील भांडी वापरून छोटे छोटे उपक्रम मुलांच्या हातून पूर्ण करून घेतले जात आहेत. भांड्यांची क्रमवार रचना करणे, एकास एक संगती समजावणे, कागदाचे काम, रंग काम, असे अनेक प्रयोग या तालुक्यातील सुनसगावात अंगणवाडी सेविकांनी केले आहेत.

विशेष म्हणजे याच सोशल मीडियाच्या माध्यमातून माहेरी गेलेल्या गरोदर मातांच्या संपर्कात राहून त्यांना योग्य सल्ला देण्याचं कामही होत आहे. गरोदर मातांचं प्रबोधन करणं, बाळाच्या योग्य वाढीची माहिती घेणं, अशी काम कोरोना काळातही अविरत सुरू आहेत. यामुळे कोरोना काळात गावात सुखरूप बाळतंपण होणं आणि कुपोषणाला अटकाव करता आल्याचं कल्पना आणि कुसुमताई सांगतात.

या दोघींनीही गावातील चौकाचौकात जाऊन कोरोना होणार नाही म्हणून काय काळजी घ्यायची, हात कसे धुवायचे, मास्क कोणता आणि कसा वापरावा यासंबंधी जनजागृती केली. प्रात्यक्षिक करून दाखवलं. त्यामुळे गावात कोरोनाचा शिरकाव खूप उशिरा झाल्याचं कल्पना कुलकर्णी सांगतात.
– कावेरी राजपूत, तालुका जामनेर, जिल्हा जळगाव

Leave a Reply