सुनील कडासने : बस नाम ही काफी है!

 

नाशिक जिल्ह्यातलं मालेगाव. मे आणि जूनच्या सुरूवातीच्या काळात हे शहर कोरोनाचा हॉट स्पॉट म्हणून ओळखलं जात होतं. आज मालेगावात अत्यंत कमी संख्येने कोरोना पेशंट सापडत आहेत. याचं श्रेय तिथं काम केलेल्या अनेकांना जातं. त्यातंलच एक नाव सुनील कडासने. ‘बस नाम ही काफी है’ ही त्यांची ओळख.
मालेगावातल्या कोरोनास्थितीचं गांभीर्य ओळखून शासनाने लाललुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांची तिथं समन्वयक म्हणून नियुक्ती केली. दांडगा जनसंपर्क आणि सर्वसामान्यांशी थेट संवाद ही सुनील यांची कार्यशैली. त्यांनी काम सुरू केलं आणि शहराची परिस्थिती आता पूर्वपदावर येऊ लागली आहे.
मालेगावमधला रुग्णांचा वाढता आकडा, मृतांची संख्या, संसर्गाच्या भीतीने मालेगावच्या रुग्णांना उपचारासाठी येऊ देण्यास नाशिक-धुळ्यातील जनतेचा सक्त विरोध, नीट उपचार मिळत नसल्याने रुग्णांच्या नातेवाइकांमध्ये खदखदणारा असंतोष अशी चिंताजनक स्थिती मालेगावात होती. झोपडपट्टयांचे शहर अशी ओळख असलेल्या मालेगावात आरोग्यविषयक जागृतीचा अभाव. प्रशासनापुढे मोठं आव्हान होतं.

 

सुनील कडासने हे गेले पंचवीस दिवस कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी शहरवासीयांना साद घालत आहेत. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. करोनावर नियंत्रण मिळविण्यात येत असलेले यश, लोकांमधली जागरुकता व त्यांच्या मानसिकतेत होणारा सकारात्मक बदल याचं श्रेय समन्वयक कडासनेंकडे जातं.
पोलीस नागरीकांचे मित्र आहेत हे वास्तव कडासने यांच्या कार्यशैलीतून ठळकपणे दिसून येते. करोना आजाराच्या जनजागृतीसाठी ते आता जेव्हा शहरातील गल्लीबोळातून फिरत असतात त्यावेळी आबालवृद्धांकडून त्यांच्यावर केली जाणारी फुलांची उधळण, हे त्याचंच द्योतक. लोकांना धाकदपटशा दाखवण्यापेक्षा त्यांच्या खऱ्या अडचणी समजून घेणं आणि त्यांना वास्तवाची जाणीव करुन देणं अधिक लाभदायक, परिणामकारक ठरतं असं कडासने म्हणतात.
शहरात करोनाने थैमान मांडले असतांना अनेक रुग्णालये बंद होती. अन्य आजार असलेल्या रुग्णांची हेळसांड सुरू होती. सुनील कडासने यांच्या पाठपुराव्यामुळे महापालिकेतर्फे चौदा युनानी डॉक्टरांची नियुक्ती झाली. खाजगी डॉक्टरांना संरक्षण साधने पुरवण्यात आल्यानंतर शहरातील सर्व खाजगी रुग्णालये सुरू झाली. टाळेबंदीमुळे यंत्रमाग बंद असल्याने मजुरांची रोजीरोटी बंद झालेली. त्यांनी यंत्रमाग कारखाने सुरू करण्यासाठी पाठपुरावा सुरू केला. शासनाची परवानगी मिळाल्यावर पहिल्याच दिवशी शहरात सहा हजार यंत्रमाग सुरू होऊ शकले. मालेगावात आज प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील सुमारे सव्वा लाख यंत्रमाग सुरू झाले असून लवकरच सर्व कारखाने सुरू होऊन शहर पूर्वपदावर येण्याची अपेक्षा आहे. अत्यंत तुटपुंज्या मानधनावर घरोघरी जाऊन रुग्णशोध मोहिमेचे काम करणाऱ्या आशा वर्कर महिलांच्या प्रती सुनील यांनी अशीच संवेदना प्रकट केली. दरमहा अवघ्या दोन हजार रुपये मानधनावर डॉक्टरांप्रमाणेच दिवसभर जोखीम उचलणाऱ्या या महिलांचे मानधन वाढवून देण्याची सूचना त्यांनी केली. त्यानुसार महापालिकेने हजार रुपयांची वाढ केली. महसूल खात्यातर्फे धान्य पाकिटांची मदतही त्यांनी या महिलांना मिळवून दिली.
या आधी चार वर्षे मालेगावला अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत असतांना मालेगावमधील नागरिकांच्या मनात त्यांनी विश्वाास निर्माण केला होता. त्यामुळेच गुन्हेगारीला आळा बसण्यास मदत झाली होती. मुस्लिमबहुल मालेगावाची गरज ओळखून तेव्हा त्यांनी उर्दू आणि अरबी या भाषा शिकून घेतल्या. शांतता, कायदा व सुव्यवस्था तसंच सार्वजनिक हितासाठी त्यांनी कुराणामधील आयतांचा दाखला लोकांना दिला. त्यामुळे मुस्लिम समाजात आपला माणूस अशी त्यांची प्रतिमा निर्माण झाली. त्यांची ही शैली प्रशासनाला मदतीची ठरली – तेव्हा आणि आताही.

– प्राची उन्मेष, नाशिक

Leave a Reply