सौरउर्जा आली, वीजटंचाई पळाली

नगर-बीड जिल्ह्याच्या सीमेवरचं आष्टी तालुक्यातलं केरुळ. इथं मुस्ताक शेख यांची दहा एकर शेती. शेतीवरच उदरनिर्वांह. त्यामुळे चांगले उत्पादन घेण्याची त्यांची कायमची धडपड. शेतीसाठी एकीकडे पाणी महत्त्वाचं. पण पाणी द्यायचं तर आपल्याकडे विजेचा प्रश्न कायम सतावणारा. पाणी आहे पण वीज नाही ही स्थिती तर नेहमीचीच.
रब्बीचा हंगामात भारनियमन असेल तर शेतकऱ्यांची तारांबळही ठरलेली. हे सगळं बघून शेख यांनी आधी इंजिनपंप वापरायला सुरुवात केली. पण, त्यासाठी लागणारं इंधन परवडेना. काय करायचं असा विचार सुरु असतानाच शेख यांना नागपुरात एका कृषी प्रदर्शनात सौर ऊर्जेवर चालणाऱ्या पंपाची माहिती मिळाली. मग त्यांनी सौर ऊर्जेवर चालणारा पंप आपल्या शेतात बसवायचे ठरवले.
शासनाच्या ‘अटल सौर ऊर्जा’ योजनेने त्यांना आधार दिला. या योजनेतून महावितरणतर्फे सौर उर्जेंचे युनिट उभारण्यासाठी शेतकऱ्यांना अनुदान दिले जाते. जैन इरिगेशनच्या अधिकाऱ्यांनी शेख यांना मार्गदर्शन केले. शेख यांनी महावितरणकडे अटल सौर ऊर्जा योजनेअंतर्गत सौर उर्जा प्रकल्प बसवण्यासाठी मागणी केली.

प्रकल्प मंजुर झाला. हे युनिट होतं सहा लाख 75 हजार रुपयांचं. त्यासाठी शेख यांनी 34 हजार सातशे रुपये भरले. आणि 75 टक्के अनुदान मिळालं. अन्‌ पाच अश्विशक्तीचा विद्युत पंप सौर उर्जेवर सुरु झाला. यात सोळा प्लेटचे तीन पॅनेल वीज निर्मिती करतात. थेट जोडणी असलेला (डीसी) विद्युत पंप बसवला असून दिवसभर पंप सुरु राहतो. सध्या शेख यांच्या शेतात तीन एकर गहू, एक एकर कांदा, दोन एकर ज्वारी, अडीच एकर हरभरा, दीड एकर चारापीके आहेत. अशी दहा एकरावरची शेती सौरउर्जेच्या वीजेतून हिरवीगार झाली आहे. सौरउर्जेतून तयार होणारी वीज साठवली जात नाही तर थेट पंप चालू राहत असल्यामुळे शेतीला पाणी देण्यासाठी रात्री जागरण करण्याची गरज पडत नाही. तसंच पिकांना पाणी देण्यासाठी जलमापक यंत्र बसवल्यामुळे सगळी यंत्रणा मोबाईलद्वारे हाताळली जात आहे.
मुस्ताक शेख म्हणतात, ’सौरउर्जेवर वीज निर्मिती करणारा प्रकल्पामुळे शेतीला वेळेवर व मुबलक पाणी मिळू लागले आहे. वीजटंचाई आणि इंधनखर्चातून मुक्तता तर झालीच. शिवाय शेतीला किती पाणी दिले याचे मोजमाप करण्यासाठी जलमापक बसवल्यामुळे पाणीही नियंत्रित देता येते’.
संपर्क – मुस्ताक शेख – ७७५६०५०७६७
– सूर्यकांत नेटके.