मे 2021. कोविडची दुसरी लाट. नागपूरातल्या एका गरोदर महिलेला कोविड झाला. आठव्या महिन्यातच, उण्यापु-या 32 आठवड्यांच्या बाळाला जन्म देऊन तिचं निधन झालं. आता बाळाला दूध तर हवंच. म्हणून फॉर्म्युला मिल्कचा पर्याय समोर आला. पण बाळाला हे दूध पचलं नाही. आता पर्याय होता केवळ आईच्या दुधाचा. बाळ तिथल्या दवाखान्यात असेपर्यंत काही महिलांनी असं दूध बाळाला नियमितपणे दिलं. पण प्रश्न आला तो बाळ घरी, ठाण्याला आणल्यावर. संबंधितांपैकी कुणी ट्विटरवर बाळाला आईचं दूध हवंय असं लिहिलं, फोन नंबरही पोस्ट केला आणि मदत करू इच्छिणार्यांचे फोन येणं सुरू झाल. तेव्हाच बाळाच्या आत्याला बीएसआयएम अर्थात ब्रेस्टफिडिंग सपोर्ट फॉर इंडियन मदर्स या ग्रुपविषयी कळलं. ग्रुपच्या संस्थापिका आधुनिका प्रकाश आणि स्तनपान सल्लागार कॅमिली दोघींची मदत मिळाली. मिल्क बॅंकेतलं दूध बाळाला कसं पाजायचं याविषयी या दोघींनीही त्यांना मार्गदर्शन केलं आणि बाळाला दूध व्यवस्थित मिळू लागलं.
या ग्रुपवरचीच एक आई उत्तरा लिहिते, “बाळाला अंगावर पाजण्याचा माझा प्रवास अतिशय चढउताराचा होता. सुरुवातीला मी निपल शिल्ड वापरलं, ते वापरणं नंतर बंदही केलं. नंतर तर माझ्या अडीच महिन्याचं बाळ अंगावर पिणंच नाकारू लागलं. या सगळ्यातून बाळाने पुन्हा अंगावर पिण्यासाठी प्रयत्न करणं, त्यात सातत्य ठेवणं आणि हा प्रयत्न सुरूच ठेवणं, यासाठी केवळ बीएसआयएम अर्थात ब्रेस्टफिडिंग सपोर्ट फॉर इंडियन विमेन या फेसबुक ग्रुपची मला अत्यंत मदत झाली.”
दुसऱ्या एका बाळाची आई लिहिते, “36 व्या आठवडे पूर्ण झाले आणि माझ्या बाळाचा जन्म झाला. पहिला आठवडा दूध आलंच नाही. पण तरीही माझ्या डॉक्टरांनी स्तनपानासाठी प्रयत्न करत राहा असं सांगितलं. पहिल्या महिन्यात बाळाचं वजनही फारसं वाढलं नाही. पहिले तीन महिने निपल शिल्ड लावायचं, बाळाला पाजण्यासाठी रात्रीची जागरणं करायची यात गेला. आणि या ग्रुपची ओळख झाली. हळूहूळू या सपोर्ट ग्रुपने मला निपल शिल्डशिवाय बाळाला दूध पाजण्यासाठी प्रयत्न करायला सांगितलं. आणि आता आम्ही स्तनपानाचा एक वर्षाचा टप्पा पार केलाय. हे सगळं शक्य झालं ते या ग्रुपवरच्या सगळ्या आयांच्या सूचना आणि पाठिंब्यामुळे.”
या वर उल्लेखलेल्या पोस्ट आहेत त्या फेसबुकवरील ब्रेस्टफिडिंग सपोर्ट ग्रुपच्या. 2013 साली हा ग्रुप सुरू झाला आणि आता या गटाचे सदस्य एक लाखापेक्षा अधिक आहेत. आधुनिका प्रकाश यांनी हा ग्रुप सुरू केला. त्या म्हणतात, ब्रेस्टफिडिंगसंदर्भात मला स्वतःला खूप अडचणी आल्या. तेव्हा नव्या पालकांसाठी योग्य वेळी योग्य सल्ला मिळत नाही हेही लक्षात आलं. म्हणून हा ग्रुप सुरू करायचं ठरवलं.
बाळाचं पोट नीट भरतंय ना, बाळाची वाढ चांगली होतेय ना, बाळाच्या पोटदुखीवर उपाय काय, स्तनाग्रांना भेगा पडल्या असतील तर काय करावं, आईला कोविड झाला असेल तर बाळाला स्तनपान करावं का, पाजणा-या मातेने कोविडची लस घ्यावी का असे एक ना अनेक प्रकारचे प्रश्न एखादी नवी नवी आई विचारत असते. बीएसआयएमच्या ग्रुपवर जवळपास 20 जणांची टीम या नव्या आयांचं शंकानिरसन करत असते. आधुनिका प्रकाश सांगतात, की आमच्या टीममध्ये स्तनपानविषयाचे सल्लागार आहेत. हे सल्लागार या मुलींच्या शंकांना, प्रश्नांना उत्तरं देत असतात.
स्तनपानाबद्दलचे महिलांचे प्रश्न दूर अंतरावरून, सोशल मिडियावरून कसे सोडवले जातात? आधुनिका म्हणाल्या, “बाळाचं वर्तन कसं आहे, आईची तब्येत कशी आहे याची आधी आम्ही चौकशी करतो. आईचा प्रश्न काय आहे ते ऐकून थेट सल्ला दिला जात नाही, तर बाळाच्या आईने तिचा अनुभव आधी सांगावा, असं आम्हाला वाटतं. स्तनपानाचे फायदे मातेला सांगितले जातात. पण स्तनपान करायचं की नाही हा निर्णय मात्र आईने घ्यावा असं आम्हाला वाटतं. काही केसेसमध्ये डॉक्टरांना दाखवणं गरजेचं असतं. तिथं मात्र बालरोगतज्ञ किंवा स्त्रीरोगतज्ञांची भेट घ्यायला सांगितलं जाते. स्तनपानासंबंधी आईच्या शंकांवर फेसबुकवरच्या चर्चेतून मार्ग निघाला नाही तर ग्रुपच्या एखाद्या सल्लागाराशी या महिलांना फोनवरही बोलता येतं.”
कोविडकाळात या ग्रुपचा बराच फायदा झाला. आधुनिका सांगतात, “नवोदित आयांना हेल्पलाईनच्या माध्यमातून आम्ही स्तनपान सल्लागारांमार्फत स्तनपानासंबंधी मार्गदर्शन केलं. ज्या बाळांनी या काळात आपली आई गमावली अशा बाळांसाठी मिल्क डोनेशन ड्राईव्ह सुरु केला. आई किंवा बाळ दोघांपैकी कुणीही कोविडबाधित असेल तरीही बाळाला स्तनपान सुरू ठेवावं यासाठी या फेसबुक, इन्स्टाग्राम आणि बीएसआयएमच्या वेबसाईटवरून सतत मार्गदर्शन केलं.”
लेखन: वर्षा जोशी- आठवले, नवी उमेद, पुणे
#WBW2022
Breastfeeding Support for Indian Mothers