सोलापूर शहरातल्या एमआयडीसी परिसरातले कलावती नगर. प्रामुख्यानं इथं कामगारांची, हातावर पोट असलेल्यांची वस्ती. इथेच आशीर्वाद क्लिनिक आहे. गेल्या ७-८ महिन्यांपासून दर महिन्याच्या २० तारखेला इथे मोफत आरोग्य तपासणी होते. डॉक्टर मोनिका एकही पैसा न घेता मार्गदर्शन करतात. २७ वर्षांच्या डॉक्टर मोनिकांचा परिसरातल्या अनेकांना आधार वाटतो.
डॉक्टर मोनिका सुरेश जिंदे दाजी पेठ परिसरात राहणाऱ्या. गुलबर्गा इथून बीएएमएस. सोलापुरातील मार्कंडेय रूग्णालयात तीन वर्ष प्रशिक्षण कालावधी. त्यानंतर स्वतःचं क्लिनिक. दर ६ महिन्यांनी शहरातल्या विविध भागात त्या आरोग्य शिबीर घेतात.
यामागची प्रेरणा वडिलांची. मोनिका यांचे वडील सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेत मॅनेजर होते. अनेक सामाजिक उपक्रम ते करत. २०१९ मध्ये २० ऑक्टोबरला त्यांचं निधन झालं. याच दिवशी मोनिका यांचा वाढदिवस असतो. वाढदिवसाच्या दिवशीच वडिलांचा मृत्यू झाल्यानं कधीही वाढदिवस साजरा न करण्याचं त्यांनी ठरवलं. त्याच सोबत त्यांची आठवण म्हणून दर २० तारखेला मोफत सेवेचा निश्चय केला.
”समाजाप्रती निर्माण झालेली ओढ शांत बसू देत नाही,”मोनिका सांगतात. ”आपलं जीवन गरजूंच्या कामी यावं, आपल्या कार्याचा लाभ इतरांना व्हावा, अशी इच्छा या उपक्रमामागे आहे.”
-विनोद चव्हाण , सोलापूर