स्वउत्कर्षासोबत पापड उत्पादनातून रोजगारनिर्मितीही

अलकाबाई पाटील- वयाची साठी ओलांडलेल्या धुळ्यातील महिला गृहउद्योजिका.  थोडंफार वाचता येईल आणि सही करता येईल इतकेच शिक्षण झालेलं. मात्र अलकाबाईंच्या ‘हितेश पापड आणि गृह उद्योग’ या व्यवसायाचा आवाका पाहिला, तर भलेभले अवाक होतील. आजच्या घडीला त्यांच्या उद्योगाच्या माध्यमातून त्या १६ जणांना आज रोजगार देत आहेत.

अलकाबाईंना स्वयंपाकाची, वाळवणाची आवड. आजूबाजूच्या महिलांनी त्यांना आधी थोड्या प्रमाणावर नागलीचे (नाचणी) पापड बनवून विकत देण्याचा आग्रह केला. आणि अश्या प्रकारे २०११ पासून पापड बनविण्याच्या व्यवसायाचा श्रीगणेशा झाला. सुरूवातीला त्या स्वत:च घरी पापड बनवायच्या, बनवलेले पापड विकायच्या. पापडांची चव उत्तम होती, त्यामुळे ग्राहक कायमचे जोडले गेले. असे करत करत काही वर्षात त्यांच्या कामाने जोर धरला. हॉटेल उद्योगात जशी पापडांची मागणी वाढली तशी ती, छोट्या शहरातील आधुनिक कुटुंबांमध्येही वाढली. अनेक महिला घरोघरी करियर करत असल्याने आता पापड विकत घ्यायला प्राधान्य देऊ लागल्या. अनेकींना करायची इच्छा असून नेमकी रेसिपी माहिती नसते, आणि तो व्यापही वाटतो, त्यामुळे त्या वाळवणाचे पदार्थ विकत घेतात.

अलकाताई पाटील- त्यांच्या स्पेशल नागली पापडांसोबत

बदलत्या काळाची बदलती पावलं अलकाबाईंनी वेळीच ओळखली. आणि अन्य गरजू महिलांना सोबत घेऊन पापड निर्मिती आणि वाळवणांचा व्यवसाय चांगलाच वाढवला. आजघडीला ९ महिलांना अलकाबाईंच्या हितेश पापड आणि गृह उद्योगात वर्षभर रोजगार मिळतो. सोबत अवजड कामासाठी ७ तरूण मुलांनाही त्या रोजगार उपलब्ध करून देत आहे. उल्लेखनीय गोष्ट म्हणजे अलकाबाईंसोबत काम करणाऱ्या या महिला आधी केवळ गृहिणी होत्या, त्यांना कसल्याच कामाचा अनुभव नव्हता. पण अलकाबाईंसोबत काम करून त्यांची नियमित कमाई सुरू झाली.

धुळ्याच्या भोकर परिसरात अलकाबाई आता मुलगा विठ्ठलच्या मदतीने अत्याधुनिक यंत्रांच्या सहाय्याने, अतिशय स्वच्छ वातावरणात लाखो पापडांची निर्मिती करत आहेत. त्यांच्याकडे नागलीचे, उडदाचे, तांदळाचे, ज्वारीचे पापड, कुरडया, शेवया, मूगवड्या, वेफर्स, उपवासाचे पापड, साबुदाणा चकल्या असे सर्व वाळवणाचे प्रकार बनवले जातात. पापडातही छोटे डिस्को पापड, पट्टी पापड, नॉर्मल मोठे पापड असे सर्व प्रकारचे पापड तयार होतात. पापडाचा घाटा चुलीवर शिजवला जातो आणि पापड बनविण्याचे पूर्ण काम मशीनवर होते.

हितेश पापड आणि गृहउद्योगात मशीनवर पापडनिर्मिती

त्यांनी बनवलेले पापड धुळ्यातच नव्हे, तर महाराष्ट्रासह गुजरात आणि मध्यप्रदेशातही विकले जात आहेत. पापडांची गुणवत्ता चांगली असल्याने प्रत्येक वेळी पुढची ऑर्डर जास्तीचीच येता. विशेष म्हणजे आता मागणी अधिक आणि निर्मिती कमी अशी वेळ त्यांच्या गुणवत्तेने आणि पाककलेने निर्माण केली आहे. त्यामुळेच अलकाबाईंनी आता पुन्हा व्यवसाय वृद्धीची योजना आखली आहे. अलकाबाईंचे शिक्षण रूढार्थाने कमी असेल, पण मेहनतीची तयारी, कौशल्यावरील विश्वास, गरजू महिलांना सोबत घेऊन जाण्याची उद्योजकता आणि आपल्या व्यवसायाच्या उत्कर्षावरील विश्वास तारीफेकाबील आहे.

लेखन: कावेरी परदेशी, धुळे

नवी उमेद कसं वाटतं तुम्हाला? तुमचा अभिप्राय, प्रतिसाद अवश्य लिहा. आणि वाचकहॊ, तुम्हीही नवी उमेदला आर्थिक मदत करा. त्यासाठी ही लिंक: https://naviumed.org/support/

 

#नवी_उमेद

#हितेशगृहउद्योगआणिपापड

#धुळे

#स्वयंरोजगार

#महिलासबलीकरण

Leave a Reply