स्वत:साठी आणि इतरांसाठी ‘मास्क बनवू, मास्क वापरू,सुरक्षित राहू’

 

स्वत:साठी, कुटुंबासाठी आणि इतरांसाठी ‘मास्क बनवू, मास्क वापरू, सुरक्षित राहू’ असा मंत्र एका शाळेनं आपल्या मुलांना दिला आहे.
लहान असो वा मोठा, मास्क हा आता जगभरातील प्रत्येक व्यक्तीच्या पोशाखाचा अनिवार्य भाग आहे. पण प्रत्येकाला मास्कवर पैसे खर्च करणं परवडतंच असं नाही. आपल्या विद्यार्थ्यांच्या बाबतीतली हीच बाब हेरली, काशिनाथ अहिरे यांनी. अहिरे, चांदवडच्या नेमीनाथ जैन शिक्षण संस्थेच्या माध्यमिक शाळेत कलाविभाग प्रमुख. मुलांकडे मास्क हवेच आणि खर्चही व्हायला नको, म्हणून विद्यार्थ्यांनाच मास्क तयार करायला शिकवायचं त्यांनी ठरवलं. तेही ऑनलाईन. कार्यानुभवाच्या तासाला टाकाऊतून टिकाऊ या संकल्पनेतून. साहित्य घरी असलेली जुनी कापडं.


प्राचार्या एस आर बाफना सांगतात,” 5 वी ते 8 वीच्या मुलांना आम्ही हे प्रशिक्षण दिलं. ज्या मुलांच्या घरी शिलाई मशीन होतं त्यांनी शिलाई मशीनवर आणि ज्यांच्याकडे नव्हतं त्यांनी हाताने मास्क शिवले. इलेस्टिकचा वापर करणार नाही, हे मुलांनी स्वतःहूनच सांगितले होते. कापड़ी नाड्या शिवून त्यांनी त्या जोडल्या. एरवी सतत मोबाइल, टीव्ही यात गुंतलेली मुलं सुई-दोरा,कापड-कात्री घेऊन वेळ सत्कारणी लावत आहेत याचा पालकांना खूप आनंद झाला. प्रत्येकाने किमान दोन तर काहींनी पाच मास्कही तयार केले. विशेष म्हणजे, मुलं मास्कचे महत्त्वही घरच्याना, आजूबाजूच्या सांगत आहेत.”
शालेय अभ्यासक्रमात शिवणकाम नाही. मास्कच्या निमित्ताने मुलांना शिवणकामाची ओळख झाली. कापडाचे शिवणकाम, घडीकाम, कातरकाम मुलं शिकली. यातून मुलांना स्वनिर्मितीचा आनंद मिळालाच, शिवाय आपल्या मुलांचे कलागुण पाहून शिक्षक आणि पालकांनाही कौतुक वाटलं.
– भाग्यश्री मुळे, ता. चांदवड जि. नाशिक

Leave a Reply