स्वमग्नतेतून स्वयंपूर्णतेकडे पहिलं पाऊल

एक गुटगुटीत बाळ आपल्या घरी जन्माला यावं अशीच आमचीही इच्छा होती. पण, आपला पहिला मुलगा ऑटिस्टीक आहे, हे कळलं आणि सुखस्वप्नचित्रच विस्कटून गेलं. इथचं आमचं पहिलं पाऊल पडलं स्वमग्नेतेच्या जगात. मग ४ नोव्हेंबर २०११ रोजी आमच्यासह पुणे येथील डॉक्टर अमिता पुरोहित, बेळगावचे शंशाक कोणो, मिलिंद कंक आणि काही लोकांनी एकत्र येऊन ‘आरंभ’चा पाया रचला.  एक अद्ययावत, आधुनिक असं मराठवाड्यातलं पहिलं स्वमग्न मुलांसाठीचं केंद्र ‘आरंभ’! मग मी विशेष बी.एड.पूर्ण केलं. खास प्रशिक्षण घेतलेला, मुलांच्या प्रत्येक गरजेला ओळखून त्यावर योग्य उपाय करणारा शिक्षकवर्गही नेमला.

आपल्या मुलांना विशेष प्रशिक्षणाची गरज आहे हेच आई-वडील मान्य करत नाहीत. अशा मुलांचा आधार होणे, हे मूल पुढे स्वावलंबी होऊ शकते हा विश्वास त्यांना देणे गरजेचे असते. माझ्या मुलाला विविध थेरपी देण्यासाठी आम्ही बरीच धावपळ केली. त्यातूनच जाणवलं, सर्व थेरपीज एकाच ठिकाणी मिळायला हव्यात. उत्तम दर्जाचे शिक्षण पुरवणे, विद्यार्थांना स्वावलंबी बनविणे, स्वमग्न मुलांविषयी जागृती करुन मुलांच्या शिक्षणासाठी पालकांना प्रोत्साहित करणे हे आजचं ‘आरंभ’च काम. ‘आरंभ’मध्ये 28 विद्यार्थी आहेत. मुलांच्या क्षमता विकसित करण्यासाठी आवाज, अॅिक्युपेशन, प्ले, म्युझिक, ड्रामा, मास्क,स्पिच आणि फिजिओथेरपीचा उपयोग केला जातो.  आवाज थेरपीतून मुले न बोलता आपल्या भावना दुस-या माध्यमाच्या सहाय्याने दर्शवू शकतात. अॅाक्युपेशनल थेरपीने आपल्या अतिउत्तेजीत भावनांवर, अति चंचलतेवर नियंत्रण ठेवायला शिकतात. प्ले थेरपीतूनही उर्जा योग्य ठिकाणी वापरली जाते. ड्रामा थेरपी विविध भावनांचे प्रकटीकरण कसे करायचे हे शिकवते. मास्क थेरपीत फक्त डोळे उघडे ठेवले जातात. त्यामुळे स्थिर नजर देणे ह्या मुलांना शक्य होते. मुलांच्या समस्या, अडचणी, प्रश्न यावर पालकांसाठी कार्यशाळा होतात. 

प्रत्येक मुलात सूप्त गुण असतात. स्वमग्न मुले क्षमता लवकर प्राप्त करू शकत नाहीत. पण त्यांची बुध्दी सामान्य मुलांप्रमाणेच असते. त्यासाठी आमचा आर्ट झोन काम करतो. इथं 10 वर्षांवरील मुलांना त्यांच्यातील कलागुणांनुसार प्रशिक्षण दिलं जातं. आणि मग त्यातून सुंदर कलात्मक वस्तुंची निर्मिती केली जाते. या वस्तुंचे प्रदर्शन, विक्री करून स्वमग्न मुलांना बाजारपेठ उपलब्ध करून दिली जाते. येथे प्रथमच ब्लॉक-पेंटिंगचे रुमाल, रांगोळ्या, पणत्या, मेणबत्या, लिफाफे, ग्रीटिंग कार्ड्स, पेपरबॅग तसेच सुतळीपासून लेटर-हँगिंग अशा विविध वस्तू तयार करण्यात आल्या. हा प्रयोगही फलदायी ठरतोय. कारण त्यातून त्यांच्या क्षमता वाढत आहेत. विशेष म्हणजे यावर्षी बनविलेल्या वस्तुंची व्रिकी अपेक्षेपेक्षा जास्त झाली. त्यामुळे मुलांची बँकेंत खाती उघडता आली. ‘आरंभ’च्या छोट्या मित्रांनी स्वयंपूर्णतेच्या दिशेने उचललेले हे पहिले पाऊल. 

– अंबिका टाकळकर.