हँड वॉश स्टेशन!

‘ए बंटी, तेरा साबुन स्लो है क्या?’ असे म्हणत मित्राला साध्या साबणाने हात धुतोय म्हणून चिडवणारी मुलं आपल्याला टीव्हीत रोजच दिसतात. पण हाच साबण मुलांना मोठ्ठ्या आजारांपासून वाचवू शकतो. खरं महत्त्व साधा साबण की लिक्विड सोप, याला नसून हात धुण्याला आहे. नियमित हात धुण्याने अनेक आजारांपासून बचाव होतो, यावर ‘युनिसेफ’नेही शिक्कामोर्तब केलंय. जगभरात दरवर्षी पस्तीस लाख मुलं डायरिया, न्युमोनिया अशा आजारांमुळे जीव गमावतात. हातांची, परिसराची अस्वच्छता हे याचं मुख्य कारण. हात स्वच्छ धुण्याच्या साध्या उपायाने आणि परिसर स्वच्छतेने ही मृत्यूसंख्या ५० टक्के कमी होऊ शकते. यवतमाळ जिल्ह्यामधल्या घाटंजी तालुक्यातील पंगडी येथे मराठी शाळेच्या शंकर साठवणे या जि.प.प्रा. शिक्षकाच्या हे लक्षात आलं. त्यांच्या कल्पनेमधून तिथे पाच वर्षांपूर्वी ’हॅन्ड वॉश सेंटर’ उभं राहिलं. त्यांनी स्वतः त्यासाठी स्वतःचे चार हजार रुपये खर्च केले. आणि विशेष म्हणजे गेली पाच वर्षं हा उपक्रम अखंड सुरु आहे. ‘मध्यान्ह भोजन वितरण’ या उपक्रमातला पहिला टप्पा म्हणजे विद्यार्थ्यांनी साबणाने हात धुणे! सुरुवातीला विद्यार्थी हॅन्ड पंपवर हात धुवत. नंतर १५ लिटरच्या एका बॅरलला नळ लावून त्याला ३ फूट उंचीच्या स्टॅन्डवर उभं केलं. असे ६ नळ असलेलं ’हॅन्ड वाॅश स्टेशन’ तयार झालं. शाळेतीलच १००० लिटरच्या पाण्याच्या टाकीला त्याची जोडणी करण्यात आली. आणि आता सर्व शिक्षा अभियानांतर्गत हॅन्ड वाॅश स्टेशनचं बांधकाम करण्यात आलं आहे. त्याकरिता शासनाने १० हजार रुपयांचे अनुदान दिलं. २०१३-१४ मध्ये यवतमाळ येथे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) डाॅ.सुचिता पाटेकर आणि ’सर फाउंडेशन’, सोलापूरचे सिद्धाराम माशाळे यांच्या उपस्थितीत पंगडी भोजन वितरण व्यवस्थापनाची चित्रफीत दाखविण्यात आली. जी त्यानंतर उमरखेड, महागाव, कळंब व घाटंजी येथील कार्यशाळेतही दाखविण्यात आली.

जेव्हा संपूर्ण गावाला साथीच्या आजाराने ग्रासलं, त्यावेळी एकही विद्यार्थी आजारी पडला नाही, हे या उपक्रमाचं यश. “ही ‘हॅन्ड वाॅश’ची किमया,” अशी प्रतिक्रिया शिक्षक शरद सोयाम यांनी व्यक्त केली. याचमुळे शारीरिक स्वच्छता व आरोग्य यांचं महत्त्व त्यांना आणि त्यांच्याबरोबर पालकांना समजून आलं. शंकर साठवणे, शरद सोयाम यांच्यासह उत्तम कोवे, सुनील यमसलवार, भगवान सरदार, देवराव जांभुळे, गजानन श्रीरामे व विद्या गटलेवार हे या उपक्रमाचे व्यवस्थापन करतात. शारीरिक स्वास्थ्य सर्वांसाठीच महत्त्वाचं आहे. त्याकरिता शिळं व उघड्यावरचं अन्न खाऊ नये. साथीच्या काळात उकळलेलं पाणी प्यावं. नखं वाढलेली नसावीत. हातांनी काम केल्यानंतर व भोजनापूर्वी हात धुणे, हाच आरोग्याचा मंत्र आहे. ‘सुविधा’ असेल तरच ‘सवय’ लावता येते ही गोष्ट स्वच्छतेला तंतोतंत लागू पडते. मुलांना हात धुण्याची सवय लावणे आणि त्यासाठी ती सुविधा शाळेत उपलब्ध करुन देणे ही दोन्ही उद्दिष्टं हँड वाॅश स्टेशनमुळे साध्य झाली आहेत. मात्र, हँड वाॅश स्टेशनसाठी पाण्याची उपलब्धता ही शाळांसमोर मोठी समस्या आहे. पाणी नसेल तर ते साठवून ठेवण्याची सोय तरी असावी, असं मत शरद सोयाम यांनी व्यक्त केलं.

– नितीन पखाले.