“पंढरीच्या वारीला जायचं ही आमच्या घरातली परंपराच. माझे आई- वडील दरवर्षी वारीला जातात. दोन वर्षं कोरोनाचा खंड पडला म्हणून नाराज होते, यावर्षी दुप्पट उत्साहानं गेले. पण आता वय झालंय, त्यामुळे आषाढी वारीच्या गर्दीत माझे वडील रस्ता चुकले, कुठं हरवले ते काही कळेनाच. आई तर रडायलाच लागली, गर्दीतून आम्हांला पटकन फोनही करायचं सुचेना तिला. पण तिला कुणीतरी पोलिसांच्या ‘मिसिंग सेल’ कडे जायला सांगितलं. आणि काय आश्चर्य पोलिसांनी आईला आधार तर दिलाच, पण सूर्य मावळायच्या आत आमचे आबा हजर केले, आम्हांलाही कळवलं. खरंतर त्या क्षणी आम्हांला पोलिसांच्या रूपाने पांडुरंगच जणू भेटलाय, असं वाटलं” वारीत अचानक वयस्कर वडील हरवल्याने हतबल झालेल्या मुलाची आणि त्याच्या आईंची ही प्रातिनिधिक प्रतिक्रिया.
आषाढी वारी, म्हणजे महाराष्ट्रातील सर्वसामान्य वारकऱ्यांसाठी पर्वणीच. या वर्षीतर कोरोनाच्या दोन वर्षाच्या कालखंडानंतर, कोणत्याही निर्बंधांशिवाय अतिशय उत्साहाने लाखो वारकरी या वारीत सहभागी झाले. पण वारी जसा आनंदाचा, भक्तीत तल्लीन होण्याचा काळ असतो, तसाच तो दुर्दैवाने आप्तांच्या ताटातुटीचा काळही असतो. अनेक लहान मुलं, महिला, ज्येष्ठ नागरिक या वारीत हरवतात, वाट चुकतात, आपली दिंडी- आपली माणसं यांच्यापासून कुठंतरी मागं राहून जातात. म्हणूनच वारीत हरवलेल्या अश्या लोकांच्या मदतीसाठी सोलापूर ग्रामीण पोलिसांनी यंदा प्रथमच ‘मिसिंग सेल’ नावाची केंद्रं जागोजागी उभी केली. आणि त्याच्या माध्यमातून सुमारे १६३९ हरवलेल्या लोकांचा शोध घेऊन त्यांना आपल्या नातेवाईकांकडे सुपुर्द केले.
श्री ज्ञानेश्वर माउली आणि संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यात लाखो भाविक श्री क्षेत्र पंढरपूर येथे आषाढी एकादशी निमित्ताने येत असतात. हे भाविक पंढरपुरात तसेच सोलापूर जिल्हया्त नातेपुते, माळशिरस, वेळापूर, भंडीशेगाव, वाखरी येथे पालखीचा मुक्काम असतो, त्या- त्या ठिकाणीदेखील पालखीच्या दर्शनासाठी पंचक्रोशीतील भाविक येत असतात. या भाविकांमध्ये वृध्द, लहान मुले आणि महिला देखील सामील असतात. परंतू गर्दीच्या ठिकाणी रस्ता चुकून, हात सुटून घरच्या लोकांपासून ते दूर जातात आणि हरवतात. हाच प्रकार पंढरपुरात गेल्यावरही घडतो. तिथं तर गर्दीचा महासागर उसळलेला असतो. म्हणूनच या हरवलेल्या लोकांचा शोध घेऊन, त्यांना नातेवाईकांच्या ताब्यात सुखरूप देण्यासाठी सोलापूरच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातुपते यांनी यंदाच्या वारीमध्ये ‘मिसींग सेल’ हा अभिनव उपक्रम राबवला. यासाठी महिला सुरक्षा विशेष कक्ष, सोलापूर ग्रामीण येथील महिला पोलीस उपनिरीक्षक सोनाली गोडबोले आणि महिला पोलीस अंमलदार यांचे पथक ज्ञानेश्वर माउलींच्या पालखी सोबत ठेवण्यात आले होते.
पालखी सोहळा चालत असताना व मुक्कामाच्या ठिकाणी सदरच्या पथकाने मोजक्या ठिकाणी थांबून हरवलेल्या लोकांच्या नोंदी घेवून त्यांचा सोबतचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या मार्फत शोध घेवून त्यांना त्यांच्या नातेवाईकांच्या सुखरूप ताब्यात दिलंय. याशिवाय आषाढी यात्रा काळात पंढरपुरात या मिसिंग सेल मार्फत उंचावर ‘तीर्थक्षेत्र चौक्या’ स्थापन करण्यात आल्या होत्या. यावर्षी सुमारे पंधरा लाख भाविकांची गर्दी पंढरपुरात उसळेल असा अंदाज असल्याने वारी काळात पाच मिसिंग सेल आणि सुमारे सहा तीर्थक्षेत्र चौक्या पंढरपुरात कार्यरत होत्या. यात्रा काळात सुमारे १६४० भाविक हरवल्याची नोंद पोलिसांकडे झाली असून, अत्यंत कौतुकास्पद गोष्ट म्हणजे त्यापैकी १६३९ भाविकांची पुन्हा कुटुंबियांशी भेट घालून देण्यात सोलापूर ग्रामीण पोलीस यशस्वी ठरलेले आहेत. शिवाय त्यापैकी ७२ लहान मुलांनाही पुन्हा आई- बाबांच्या हवाली करण्यात आलंय.
पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते सांगतात, “यंदाच्या वारीत अभूतपूर्व गर्दी उसळणार याचा अंदाज असल्याने आधीपासूनच पोलिसांचं या गर्दीच्या नियंत्रणासाठीचं आणि हरवलेल्या लोकांना शोधून देण्याचं प्रशिक्षण सुरू केलं. या तीर्थक्षेत्र चौक्यात आणि मिसिंग सेलमध्ये महिला पोलीस आवर्जून नेमल्या, जेणेकरून वारकरी महिलांना, हरवलेल्या मुलांना त्या धीर देऊ शकतील. खरंतर आजकाल अनेक वारकऱ्यांकडे मोबाईल असतो, पण वारीच्या काळात प्रचंड गर्दी झाल्याने नेटवर्कवर लोड येऊन, कंजेशन होऊन संपर्क होणं अवघड होतं. म्हणूनच गर्दीला हाताळण्यासाठी आणि उत्तम संपर्कासाठी आम्ही यात्रा काळात जादाचे मोबाईल टॉवर उभे केले. या तीर्थक्षेत्र चौक्या हरवलेल्या माणसांचा शोध तर घेतच होत्या त्याशिवाय भाविकांना रस्त्याचे मार्गदर्शन, स्वच्छतागृहे कुठं आहेत, पंढरीत काय बघावं यासाठीही अनेक पोलिसांनी स्वत:हून मदत केली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या मिसिंग सेल आणि तीर्थक्षेत्र चौकीत कार्यरत राहणाऱ्या पोलिसांना, त्यांच्या संरक्षणासाठी बूस्टर डोस घेणे बंधनकारक केले होते.”
लेखन: विनोद चव्हाण, सोलापूर
नवी उमेद कसं वाटतं तुम्हाला? तुमचा अभिप्राय, प्रतिसाद अवश्य लिहा. आणि वाचकहॊ, तुम्हीही नवी उमेदला आर्थिक मदत करा. त्यासाठी ही लिंक: https://naviumed.org/support/
#नवी_उमेद
#पंढरपूर
#आषाढीवारी
#तेजस्वी_सातपुते
#सोलापूर
#मिसिंगसेल
#सोलापूर