देशपांडे यांच्या आईची तातडीने शस्त्रक्रिया करावी लागणार होती. पैसे हवेत म्हणून सोन्याची मोहनमाळ विकून नाशिकच्या देशपांडे दांम्पत्याने कशीबशी सव्वा लाख रूपयांची रोकड जमवली. टाळेबंदी शिथिल झाल्यामुळे रस्त्याने अचानकच गर्दी वाढू लागली होती. त्यातूनच ते दवाखान्यात निघाले होते. या गर्दीत देशपांडे दाम्पत्याची ही रक्कम असलेली पिशवी रस्त्यात कुठेतरी पडली. एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं. शेवटी जिथून निघालो तो रस्ता धुंडाळणं देशपांडे यांनी सुरू केलं. नाशिक येथील पोलीस आयुक्तालयाच्या चौकात घडलेली ही घटना.
घडल्या गोष्टीमुळे भांबावलेल्या देशपांडे यांनी या भागात जो दिसेल त्याला ‘आमचे पाकिट सापडले कां हो?’ असा गयावया करणारा प्रश्न सुरू केला.
एव्हाना तिथल्या एचडीएफसी बँकेत कामासाठी आलेल्या चांदवडच्या प्रा.प्रशांत मुरलीधर जाधव व त्यांच्या पत्नी दिपाली यांना रस्त्यात ही पिशवी सापडली. आपल्याला सापडलेली ही पैशाची पिशवी कोणाची असावी? या विचारात होत्या. कारण त्यात असलेली नोटांची बंडले पाहून या जाधव दांम्पत्याचेही डोळे विस्फारले होते.
अखेर पैसे शोधण्यासाठी धावपळीत असलेले देशपांडे दांम्पत्य व सापडलेल्या पाकिटातील लाखाची रक्कम पाहून ही पिशवी नक्की कोणाला द्याावी ? अशा विवंचनेत असलेले जाधव दांम्पत्य यांची नेपाळी मार्केट भागात समोरासमोर भेट झाली. देशपांडे दांम्पत्य जाधवांना अजिजीने विचारत होते, आमचे पाकिट सापडले का हो? आणि जाधव दांम्पत्य या भांबावलेल्या देशपांडे दांम्पत्याची विचारपूस करीत पाकिट कसे, कोणते, नोटा कशा, याबाबत विचारपूस करून खात्री करून घेत होते. पैसे कशासाठी व कोठून आणले हेही देशपांडे दांम्पत्याच्या तोंडून एव्हाना स्पष्ट झाले होते.
खात्री पटताच क्षणाचाही विलंब न करता जाधव सरांनी देशपांडे यांच्या पाठीवर हात ठेवला. पैशाची पिशवी त्यांच्या हातात देत त्यांना आश्चर्याचा धक्काच दिला. दोघांनाही जे पाहिजे होते ते मिळाल्याचा अवर्णनीय आनंद झाला. दोघांच्याही डोळ्यात अश्रू…. आणि फिजिकल डिस्टन्सिंगचा नियम असतानाही जणू काही देवच भेटला अशा आनंदात देशपांडेंनी जाधवांना मिठी मारली. नंतर लगेचच आईच्या शस्त्रक्रियेसाठी अनामत रक्कम म्हणून ते पैसेही भरून आले.
– प्राची उन्मेष, नाशिक