हरित पारसी टेकडीसाठी जालनेकरांचा पुढाकार
एक सुंदर डोंगर, भरगच्च हिरवीगार झाडी, रंगीबेरंगी फुलांचे ताटवे, वेगवेगळे पशूपक्षी, डोंगरावर पायथ्याशी झुळझुळ वाहणारं पाणी, नैसर्गिक सौंदर्याने परिपूर्ण असं ठिकाण विकसित होतंय, जालना शहराजवळच्या समृद्धी महामार्गाला लागून असलेल्या पारसी टेकडीवर. याच पारसी टेकडीच्या दोनशे एकरच्या क्षेत्रावर हे सगळं फुलवतायेत- जालनेकरांचेच हात.
जालना हे औद्योगिक शहर आहे. ‘स्टील सिटी’ म्हणून ओळख असलेल्या या शहराला दरवर्षी उन्हाळ्यात पाण्यासाठी यातना भोगाव्या लागतात. ही समस्या दूर करण्यासाठी आणि शहरातील प्रदूषणाला सडेतोड उत्तर देण्यासाठी जालन्यातील कुंडलिका- सीना पुनरूज्जीवन अभियान, समस्त महाजन ट्रस्ट- मुंबई यांच्यासह जालन्यातीन उद्योजक, पर्यावरण प्रेमी नागरिक एकवटले आहेत- शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी. याचाच परिणाम म्हणून गेल्या सहा महिन्यात जालन्यातून वाहणाऱ्या कुंडलिका आणि सीना नद्यांचा चेहरामोहराच बदलण्याचे यशस्वी प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी नदीतला गाळ, कचरा, काटेरी झाडे काढून नद्यांचे पात्र स्वच्छ झाल्यावर तिथे साडेसातहजार बांबूच्या रोपांची लागवड करण्यात आली.
त्यानंतर आता मोर्चा वळवला आहे वृक्षलागवडी कडे. दर रविवारी जालना शहरातील पर्यावरण प्रेमी आता एकत्र येतात आणि वृक्षारोपण केलं जातंय. समस्त महाजन ट्रस्ट, मुंबईच्या माध्यमातून नागेवाडी अतिरिक्त औद्योगिक वसाहत परिसरातील अतिशय विस्तीर्ण आणि भव्य अश्या पारसी टेकडी संवर्धनासाठीच्या कामाची सुरूवात 13 जानेवारी 2022 रोजी जालन्याचे जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या हस्ते वृक्षारोपणाने करण्यात आली. सुरूवातीला या टेकडीवर चर खोदून घेण्यात आले, त्यामुळे टेकडी वर पडणारे पावसाचे पाणी वाहून न जाता आता तिथेच अडवले आणि जिरवले जातेय. या सगळ्या कामासाठी कृषी विज्ञान केंद्र, खरपुडी, जालना यांचे तांत्रिक मार्गदर्शन लाभतेय.
पारसी टेकडीवर पुर्णतः देशी झाडांचीच लागवड करण्यात आलीये. त्यात मुख्यतः कडूनिंब, पिंपळ, वड, जांभूळ, आंबा या वृक्षांचा समावेश आहे.या वृक्षारोपण केलेल्या सर्व झाडांची काळजी समस्त महाजन ट्रस्ट, मुंबई मार्फत घेतली जातेय. याशिवाय जालना औद्योगिक वसाहतीमधील मोठ्या उद्योगांनी आपल्या सीएसआरफंड मधून पाण्याच्या टँकरची व्यवस्था केलीये. याशिवाय शहरातील पर्यावरणप्रेमी नागरिक आयुष्यात एकदाच 500 रू. भरून झाडांचे पालकत्व घेऊ शकतात. त्यात त्यांच्या नावे झाड लावण्याची, त्याला खतपाणी देण्याची आणि त्याला टिकवण्याची जबाबदारी पूर्णपणे ‘लघुउद्योग भारती’ या संघटनेने घेतली आहे.
या पारसी टेकडीवर दर रविवारी आता शाळांच्या सहली येऊ लागल्या आहेत. गेल्या रविवारी तर कृषी विज्ञान केंद्रातील ‘आपली शाळा’ मधील विद्यार्थ्यांनी पारसी टेकडीवरील खड्ड्यांमध्ये सिडबॉल्सची पेरणी करून, वृक्षारोपणाच्या उपक्रमात आपला सहभाग नोंदवला. आता पावसाला सुरूवात झाल्याने हजारो वृक्षांसह हा संपूर्ण परिसर सुंदर आणि समृद्ध होत आहे.
आपले शहर स्वच्छ, सुंदर, हरित करून मोकळा श्वास घेण्यासाठी जालना शहरातील पर्यावरण प्रेमी ही धडपड करत आहे. त्या दृष्टीने शहरातील कलावंत पथनाट्यसादर करून लोकजागृती करत आहेत. शहरातील नागरिकांना पाणीबचत, वृक्ष लागवड आणि वृक्षसंवर्धन यांचं महत्व समजावून सांगत आहेत, त्यामुळे शहरातील नागरिक मोठ्या संख्येने पारसी टेकडीच्या संवर्धनासाठी पुढे झाले आहेत.
त्यामुळेच एकेकाळी पारशी लोकांच्या नावानं‌ ओळखली जाणारी ही पारसी टेकडी, लवकरच एक पर्यटनाचे हिरवेगार, निसर्गरम्य केंद्र बनेल, यात शंका नाही.
लेखन: अनंत साळी, जालना
नवी उमेद कसं वाटतं तुम्हाला? तुमचा अभिप्राय, प्रतिसाद अवश्य लिहा. आणि वाचकहॊ, तुम्हीही नवी उमेदला आर्थिक मदत करा. त्यासाठी ही लिंक: https://naviumed.org/support/

Leave a Reply