हा अभ्यास कशासाठी?

२०१४ साली गठित झालेल्या विधानसभेच्या अधिवेशनांत आमदार नेमके कोणते प्रश्न उपस्थित करतात, याचा आम्ही, म्हणजेच संपर्क संस्थेने अभ्यास केला. राज्यातील ९ अल्प मानवविकास निर्देशांक असलेल्या जिल्ह्यांना केंद्रस्थानी ठेवून केलेल्या एकूण ९,८३५ प्रश्नांच्या अभ्यासाचे हे निष्कर्ष.  

महाराष्ट्रातील समस्या मुंबईत स्थानापन्न असलेल्या धोरणकर्त्यांपर्यंत प्रभावीपणे पोचवण्याचं काम संपर्क गेली तीन दशके करत आली आहे. मुंबईत असण्याचा फायदा वंचित विभागाला, वंचितांच्या समस्या सोडवायला करायचा, हा कामाचा हेतू आहे.

We the people / आम्ही भारताचे लोक, अशी आपल्या संविधानाची सुरुवात आहे. हे ‘लोक’ देशाच्या राज्यकारभारात प्रतिबिंबित व्हायला हवेत. तसं होतंय का? फारसं नाही. स्थिती अशी आहे, म्हणून गप्प बसायंचं का? हताश व्हायचं का? मुळीच नाही. भारताच्या राज्यघटनेत लोकांना महत्व दिलंय आणि लोकांवर विश्वासही टाकलाय, जबाबदारीही दिलीये. ती पार पाडण्याचा आपण प्रयत्न करायला हवा.  आपली, लोकांची स्थिती सुधारण्याचा दुसरा मार्ग नाही. आपल्या सहभागाला पर्याय नाही. आमचा अभ्यास हा एक प्रकारे लोकप्रतिनिधींसोबत कारभारात केलेला सहभागच आहे.

राजकारणाला तुच्छ न लेखता, तिथली प्रक्रिया समजून घेत हस्तक्षेप करणं. लोकप्रतिनिधी ही आपणच निवडून दिलेली माणसं असतात. त्यांच्याशी सातत्यपूर्ण संवाद ठेवणं. हे आम्ही करत आलो आहोत.

त्याचाच एक भाग म्हणजे हा अभ्यास.

आम्ही या अभ्यासावर अखेरचा हात फिरवत असताना विधानसभेतील अनेक आमदारांच्या नावापुढचं पक्षाचं नाव बदललं आहे. मात्र, आम्ही विधिमंडळातल्या नोंदी इथे कायम ठेवल्या आहेत. कारण त्या २०१४-१८ या काळातल्या आहेत.

आमदारांबरोबरच्या आजवरच्या आमच्या कामातून आणि अभ्यास, निरीक्षण यातून आम्हाला जाणवतं की, प्रश्न सोडवायला प्रत्येक वेळी रस्त्यावरच यायला लागतं असं नाही. प्रगल्भ संवाद हाही मार्ग असू शकतो. घोषणाबाजीपेक्षा माहिती, माहितीचं विश्लेषण आणि माहितीची परिणामकारक मांडणी अधिक प्रभावी ठरतं.

युनिसेफसोबत आम्ही बालकांच्या प्रश्नांचा अभ्यास २०१५ पासून सुरू केला. विधानसभेत बालकांचे प्रश्न किती, कोणते विचारले जातात, हे तपासलं. आणि आमदारांना या प्रश्नांची माहिती द्यायला सुरूवात केली. या प्रयत्नांतून २०११-१५ या कालावधीतल्या संख्येपेक्षा बालकांविषयीची प्रश्नसंख्या २०१६- १८ या काळात शंभरहून अधिक वाढली.

म्हणूनच, आम्ही  महाराष्ट्रात आमदार संवाद मंच ही कल्पना साकारण्याचा प्रयत्नही सुरू केला आहे. त्याविषयी अधिक माहिती आम्ही आपल्याला योग्य वेळी देऊच.

ही सगळी माहिती आमच्या या वेबसाईटवर उपलब्ध आहे. हा विषय अधिक लोकांपर्यंत पोचावा, आणि यावर चर्चाही घडवून आणावी असं वाटतं. तुमच्या सहकार्याशिवाय ते कसं होणार?

मेधा कुळकर्णी  9833518713 / मृणालिनी जोग  982050478  /  हेमंत कर्णिक 9821550498