शिरुड ता. शहादा येथील हेमलता शितोळे यांची ही गोष्ट. १० मार्च १९८० रोजी हेमलता यांचा शितोळे परिचार यांचा जन्म झाला. प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी डिप्लोमा केला. संगणक क्षेत्रातील पदवी प्राप्त केली. याच दरम्यान वडील अरुणराव शितोळे यांचं २००२ साली निधन झालं. तत्कालीन कामगार राज्यमंत्री हेमंतराव देशमुख यांचे अरुण शितोळे हे स्वीय सहायक होते. अचानक पितृछत्र हरविल्याने आता आपल्यासह कुटुंबियांचे काय होईल ही विवंचना सातत्याने सतावत होती. त्यातून हिमतीने उभ्या राहत त्यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली.
वडील राजकीय क्षेत्रात असतांना अनेकांशी संपर्क होताच. त्यातून चर्चा करीत व्यवसाय करावा की शिक्षण पूर्ण करुन शासकीय अथवा खाजगी नोकरीला प्राधान्य द्यावे अशी द्विधा मनःस्थिस्तीत हेमलता होत्या. अखेर हिंमत करुन व्यवसायाला त्यांनी प्राधान्य दिले. तेव्हा म्हणजे २००४ ला भारतीय दूरसंचार निगमची दुरध्वनी सेवा परिसरात सुरू झाली होती. बीएसएनएलचे सिमकार्ड विकण्यापासून व्यवसायाला सुरुवात केली. यातून कुटुंबाला धीर देता येईल आणि व्यवसायात भविष्य निर्माण करण्याची संधी मिळवता येईल अशी खुणगाठ मनाशी बांधून दोन्ही भावांना सांभाळलं. याच दरम्यान, शिरुड ता. शहादा येथील गावकऱ्यांनीही त्यांना साथ दिली.
लहान भावाला डिप्लोमा सिव्हील केल्यानंतर सुशिक्षीत बेरोजगार अभियंता म्हणून नोंदणी झाल्यानंतर ठेकेदारी विश्वात पदार्पण केलं. याच दरम्यान, परिसरातील महिलांशी संपर्क सातत्याने येत असल्याने महिला बचत गटाच्या सदस्यांना मदत करणे, स्वयंरोजगारीत होण्यासाठी महिलांना सातत्याने प्रोत्साहन देणे यातून जनसंपर्क वाढला. वडिलांच्याच पावलावर पाऊल ठेवून त्या राजकीय क्षेत्रातही कार्यरत झाल्या. सध्या हेमलता शितोळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या नंदुरबार जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. राजकारणाच्या माध्यमातून पिडीत, वंचित महिलांना आधार देणे, त्यांना परिसरातच रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देणे, शासनाच्या महिलांसाठी असलेल्या सर्व योजनांचा लाभ देणे, वेळप्रसंगी पदरमोड करून प्रत्येक महिलेच्या अडचणी खंबीरपणे खांद्याला खांदा लावून साथ देण्याची धमक हेमलता यांना महिलांमध्ये लोकप्रिय करून गेली. केंद्र शासनाच्या पर्यावरण बचाओ मोहिमेला सहभागी होत भविष्यात विजेची टंचाई भासू नये यासाठी पारंपरिक पध्दतीने उपलब्ध असलेल्या नैसर्गिक साधनांच्या मदतीने सौर ऊर्जा प्रकल्प त्यांनी सुरू केला आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर टेक्सटाईल क्षेत्रात त्यांना आपले करीयर करायचं आहे. परिसरात व जिल्ह्यात मोठ्याप्रमाणात कापसाचे उत्पादन घेतले जाते. मात्र कापसावर प्रक्रिया करणारे उद्योग नसल्याने शेतकऱ्यांनी मेहनतीने पिकविलेला कापूस इतर राज्यात जातो. याच मातीत परिसरातील शेतकऱ्याने काबाडकष्ट करून उत्पादीत केलेल्या कापसावर येथेच प्रक्रिया करून स्वस्त दरात उच्च दर्जाचं कापड नागरिकांना उपलब्ध करुन देण्याचा त्यांचा मानस आहे.
जीवनात अनेक बरेवाईट प्रसंग आले तरी त्यातून खचून न जाता स्वतःच्या आत्मविश्वास व हितचिंतकांच्या मदतीने हेमलता शितोळे यांनी राजकीय, सामाजिक व औद्योगिक क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला आहे.
– रुपेश जाधव, नंदुरबार