लहान मुला-मुलीला वाढवताना मुला-मुलीवर योग्य संस्कार करण्याचं दडपण पालकांना येतं. संस्कार कोणते करायचे, हे माहीत असलं तरी ते कसे करायचे, हे मात्र कळत नाही. मग तोंडी सूचना, प्रलोभनं, शिक्षा आणि सगळ्यात सोपा मार्ग म्हणून सुट्टी लागली की ’संस्कार वर्गा’त दाखल करणं केलं जातं.
लहान मुला-मुलीसाठी अनुभव, हाच सर्वात मोठा शिक्षक असतो. ’खोटं बोलायचं नाही,’ असं दरडावून सांगितल्यावर जेव्हा मूल आई-बापाला खोटं बोलताना बघतं; तेव्हा ते काय समजतं? त्याला स्पष्टच कळतं, की खोटं बोलायला हरकत नसते; पण तसं कबूल करायचं नसतं. किंवा ’खोटं बोलू नये,’ असं तोंडाने म्हणत खुशाल खोटेपणा करायचा असतो. मुलाला दिलेलं होमवर्क जेव्हा आई, बाप किंवा इतर वडीलधारं कोणी करून देतं, तेव्हा कोणता संस्कार होतो?
एकदा काय झालं, एका मुलीच्या शाळेने तिची निवड केली, वक्तृंत्व स्पर्धेत भाग घेण्यासाठी. ती घरी आली आणि तिने बापाला सांगितलं, ’मला भाषण लिहून दे! ते मी पाठ करीन आणि स्पर्धेत म्हणून दाखवीन.’ अशीच तर रीत असते, बरोबर? बापाने नकार दिला! तो म्हणाला, ’तू गोष्टीची पुस्तकं वाचतेस ना? ‘देनिसच्या गोष्टी’ तुला आवडतात ना? मग त्यातलीच एखादी सांग!’
ती अगोदर लटपटली. तिने हट्ट करून बघितलं. बापामुळे आईनेदेखील भाषण लिहून द्यायला नकार दिला. दोघे ऐकत नाहीत हे बघून तिला त्यांचा राग आला आणि स्वतःच पुस्तकातून एक गोष्ट निवडून ती सांगायचं तिने ठरवलं. पाठ करण्याचा प्रश्न नव्हता, कारण गोष्ट तिच्या आवडीची होती आणि आवडल्यामुळे मित्र-मैत्रिणींना सांगितलेली सुद्धा होती.
स्पर्धेला बाप हजर नव्हता. आई तिला घेऊन गेली. संध्याकाळी बाप घरी आल्यावर तिचा चेहरा आनंदाने फुलला. ’काय झालं?’ बापाने विचारलं. ती उत्तरली, “मंदार आणि त्याचे वडील पहिले आले; रोशनी आणि तिची आई दुसरी आली आणि (’मी’वर जोर देत) मी तिसरी आली!” आपल्या यशात वाटेकरी नाही; आपण कोणाच्या कुबड्या घेतल्या नाहीत, याचा तिला केवढा आनंद झाला होता.
आपण एकटे यश मिळवू शकतो, आईबापांच्या वयाच्या मोठ्या माणसांच्या बरोबरीने काही तरी करून दाखवू शकतो, हा आत्मविश्वास तिला मिळाला. हे संस्कार करणं नाही का? हा आत्मविश्वास तिला पुढे नक्कीच उपयोगी पडेल. स्वतःचे निर्णय स्वतः घेताना तिला अडचण येणार नाही. हे असंच होत गेलं, तर एक स्वतंत्र व्यक्तिबमत्त्व म्हणून विकसित होणं तिला सोपं जाईल. यातून ती स्वतंत्र होईल आणि आईबापांवर अवलंबून रहाणार नाही. कदाचित स्वतःचे निर्णय घेण्याची सवय लागून ती नवर्याबवरही त्यासाठी अवलंबून रहाणार नाही.
हां, मात्र ज्या आईबापांना मुलाने वा मुलीने आपल्यापासून स्वतंत्र होऊच नये, असं वाटत असेल; प्रत्येक निर्णय आपल्याला विचारून घ्यावा, असं वाटत असेल; सदैव आपल्या (आणि नंतर नवर्याेच्या) अर्ध्या वचनात रहावं, असं वाटत असेल; त्यांनी हे असले प्रयोग न केलेलेच बरे!
-हेमंत कर्णिक