हॉटेल,दुकानं,हातगाड्या बंद असूनही रत्नागिरीत मुक्या प्राण्यांचं पोट भरलेलं

 

रत्नागिरीतील शिवाजी स्टेडियम परिसर, माळनाका, जयस्तंभ, एसटी स्टँड, आठवडा बाजार, थिबा पॅलेस, कुवारबाव, रेल्वे स्टेशनचा परिसर.
या परिसरात रोज किमान ५० ते ६० मुक्या प्राण्यांना जवळपास महिना- दीड महिन्यांपासून अन्नपाणी मिळत आहे. बांधकाम व्यावसायिक आणि प्राणिमित्र मुकेश गुंदेचा यांच्या पुढाकारातून. गुंदेचा रत्नागिरीतली संवेदनशील व्यक्तिमत्त्व. संपत्तीचा सुयोग्य उपयोग जाणणारे.


सध्या लॉकडाऊनमुळे गरिबांचे हाल होत आहेत. त्यांना प्रशासनाकडून मदत पुरवली जात आहे. मात्र शहरात दिवसभर शेकडो गाई , बैल, कुत्री उपाशीच. पूर्वी जनावरांना बाहेर पडलेले पदार्थ वगैरे खायला मिळत होते. इतकेच नव्हे तर बरेच हॉटेल व्यवसायिकसुद्दा त्याना खायला देत होते. कुत्र्यांना खायला मिळायची मुख्य ठिकाणं म्हणजे हातगाड्या. पण आता हे सगळंच बंद. मुकेश यांच्या ही बाब लक्षात आली. त्यांनी ती आपल्या अर्हम ग्रुपच्या मित्रांना सांगितली. मग चेतन गांधी, विशाल जैन, सचिन जैन, निलेश शहा आणि इतर मित्रही सरसावले. कामाची विभागणी झाली.
रोज 500 चपात्या आणि 30-40 बिस्कीट पुडे, काही ठिकाणी पाणी न चुकता पुरवले जात आहे, यासाठी स्वतः मुकेश गुंदेचा आणि त्यांची टीम संध्याकाळी 5 ते रात्री 10 वाजेपर्यंत शहरात फिरतात.
सध्या गरिबालाच दोन वेळचं जेवण मिळणं अवघड असताना मुक्या जनावरांकडे कोण लक्ष देणार अशी परिस्थिती आहे. मात्र मुकेश गुंदेचा यांच्या टीमचे काम कौतुकास्पद आहे. त्यांच्या कार्याला सलाम .

-जान्हवी पाटील, रत्नागिरी

Leave a Reply