‘ख़ुशी’ची निवृत्ती

पोलीस सेवेत प्रामाणिक दीर्घ सेवा दिल्यानंतर ‘खुशी’ने पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर आयोजित छोटेखानी गौरव सोहळ्यात पोलीस सेवेतून निरोप घेतला़. ‘खुशी’ने चंद्रपूर पोलिसांच्या श्वान पथकात तब्बल सात वर्षांची दीर्घ सेवा दिली. कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीनंतर त्यांचा सत्कार करून निरोप देण्याची परंपरा आपल्याकडे आहे. मात्र, एखाद्या मुक्या प्राण्याच्या सेवानिवृत्तीचा गौरव सोहळा आयोजित व्हावा हा खरोखरच अभिनव उपक्रम. चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक संदीप दिवाण यांनी यासाठी पुढाकार घेतला.

लॅब्रो प्रजातीच्या ‘खुशी’चा जन्म नागपूर येथील ब्रिडरकडे २२ नोव्हेंबर २००८ झाला़. १६ फेब्रुवारी २००९ मध्ये ती चंद्रपूर पोलीस दलातील श्वान पथकात रुजू झाली़. १ फेब्रुवारी २०१० ते ५ मे २०१० पर्यंत श्वान प्रशिक्षण केंद्रात तिने प्रशिक्षण पूर्ण केले़. नंतर खुशी चंद्रपूर पोलिसांच्या बॉम्ब शोधक आणि नाशक पथकात कार्यरत होती. या कालावधीत तिने व्हीव्हीआयपी महामार्ग घातपातविरोधी तपासणी तसेच मर्मस्थळाचे घातपातविरोधी तपासणीबाबतचे तब्बल ५३८ कॉल केले. २० फेब्रुवारी २०१६ मध्ये अशाच एका गुन्ह्याच्या तपासावरून परतताना तिला अर्धांगवायूचा झटका आला़. तेव्हापासून तिच्यावर नागपूर येथील पशुचिकीत्सालयात उपचार सुरू आहेत़. यापुढे खुशी पोलीस दलात सेवा देण्यास सक्षम नसेल, असा अहवाल पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला आणि चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक संदीप दिवाण यांनी ‘खुशी’ला सेवानिवृत्ती देण्याचा निर्णय घेतला़. ‘खुशी’च्या कामगिरीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी श्वान पथकाच्या उपस्थितीत नुकताच हा सोहळा पार पडला़. पोलीस अधीक्षकांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून खुशीचा सत्कार करण्यात आला़. भेटवस्तू आणि भविष्यासाठी काही खर्च म्हणून रोख रक्कमही भेट देण्यात आली़. हा प्रसंग उपस्थितांसाठी खरोखरच भावस्पर्शी ठरला़.

 – प्रशांत देवतळे.