।। बाळांची दुसरी आई अंगणवाडी ताई ।।

 

”पूर्वी दारावर गेले की लोक शिवीगाळ करायचे, आता तेच लोक मला मुलगी म्हणून खूप आपुलकीनं वागवतात, मुलाचं वजन बघा म्हणून आपणहून येतात.” संगीता वडर्लाकोंडावार सांगत होत्या. अंगणवाडी सेविका म्हणून १९९१ पासून त्या दोडगीरमध्ये काम करताहेत.
”मी जेव्हा १९८८ मध्ये कामाला सुरुवात केली तेव्हा लाभार्थी पळून जायचे. लस घ्यायला घाबरायचे. पण तेव्हा इथल्या लहानग्यांमध्ये केलेल्या जागृतीची फळं आता दिसत आहेत. ही मुलं आता सजग नागरिक झाली आहेत. त्यामुळे इथल्या परिस्थितीतही खूप फरक पडला आहे.” किष्टापूरच्या अंगणवाडी सेविका निर्मला बनसोड सांगत होत्या. त्यांच्या अंगणवाडीत सध्या ५६ मुलं आहेत.


दोडगीर आणि किष्टापूर ही गडचिरोली जिल्ह्यातल्या अहेरी तालुक्यातली दुर्गम गावं. साधारण ४५० ते ५०० लोकसंख्येची. नक्षलग्रस्त भागातली. पण लोकांसाठी काम करत असल्यानं तसा कधीच कोणी त्रास दिला नाही असं संगीताताई आणि निर्मलाताई दोघीही सांगतात.
दोडगीरमध्ये आदिवासी वस्ती. पोषणाच्या बाबतीत शहरी भागात जसे स्त्री -पुरुष समानतेचे प्रश्न भेडसावतात तसे इथे नाहीत. एक तर आदिवासी समाजात मुलींना खूप महत्त्व आहे. इथे कुटुंबाला मुलगी हवीच असते. जेवायला सगळे एकत्र बसतात न जे शिजवलंय ते प्रत्येकाच्या ताटात समान घेतलं जातं. संगीताताई सांगत होत्या. निर्मलाताईही सांगतात, इथे मुख्य प्रश्न सोयीसुविधांच्या अभावाचा आहे.आरोग्यविषयक जनजागृतीचा आहे. ”१७-१८ वर्षांपूर्वी तर अशी स्थिती होती की ताप बाळाच्या डोक्यात गेला तरी त्याला डॉक्टरकडे न्यायला इथल्या लोकांना सुचायचं नाही. मलेरियावर झाडपाल्याचं औषध घ्यायचे. तीन-तीन दिवस बायका डॉक्टरकडे न जाता कळा सोसायच्या. जवळ प्रसूतिगृह नव्हती.” संगीताताई आठवणी सांगत होत्या. रस्ते, वीज, पाणी या समस्या आजही आहेतच, दारिद्र्य आहेच.
जनजागृतीसाठी सातत्यानं या दोघी काम करत आहेत. कोरोना काळातही काळजी घेत त्यांचं काम सुरू आहे. या गावांमध्ये अजून रुग्ण नाहीत. गृहभेटी सुरू आहेत. मुलांना अंगणवाडी केंद्रात आहार बनवून देणं बंद असलं तरी अंगणवाडी केंद्रात माल येतो. १५ दिवसांचं धान्य मग घरी पोहोचवलं जातं. धान्याच्या दर्जा समाधानकारक असल्याचं संगीताताई आणि निर्मलाताई दोघीही नमूद करतात. अंडी, केळी, दूध पावडर घरपोच दिली जातात. पोषण अभियानातही दोघी वेगवेगळे उपक्रम राबवत आहेत.
संगीताताई सांगतात, ”मी लोकांना सांगते, भले आपल्याकडे पैसाअडका, वाडी, जागा नसेल तरीही घरच्या घरी भाज्या लावा.” घरच्या घरी भाज्यांची लागवड कशी करायची ते त्या लोकांना शिकवतात. यामुळे पैसे खर्च न होता सकस आहार मिळतो.
निर्मलाताईंच्या गावात मित्रगट चांगल्या प्रकारे काम करतोय. ज्यांना अमृत आहाराचा, इतर उपक्रमांचा लाभ झालाय त्या स्त्रियांचे हे छोटे छोटे गट. याच बायका गटात सभेत माहिती देतात. आपल्यातल्या कोणाच्या सांगण्यावर जास्त विश्वास ठेवला जातो. कोरोना काळात निर्मलाताईंकडे एप्रिल महिन्यात आलेलं दोन वर्षांचं कुपोषित बाळ आता सामान्य श्रेणीत आलं आहे. अमृत आहाराचं ताट तयार करून गावातल्या सर्वांना त्याची माहिती देणं, परसबागांची माहिती आणि प्रात्यक्षिकं, स्वच्छता, आरोग्यविषयक काळजी याची माहिती संगीताताई आणि निर्मलाताई देतात. पूर्वी साधारण ४-५ मुलं कुपोषित असायची मात्र अमृत आहार योजना, पोषण अभियान यामुळे हे प्रमाणही कमी झाल्याचं निर्मलाताई सांगतात. ३ ते ६ वयोगटातल्या मुलांना जसा अंगणवाडीत आहार तयार करून खायला दिला जातो तसा ३ वर्षाखालच्या मुलांनाही दिला तर कुपोषणाचं प्रमाण आणखी कमी होऊ शकतं, असं मत संगीताताई व्यक्त करतात.
– सोनाली काकडे

Leave a Reply