।। सरपंचांचं गाव – मानेगाव-झबडा, भंडारा ।।रिताताईंच्या दूरदृष्टीमुळे गाव सुरक्षित

 

भंडारा जिल्ह्यातली मानेगाव-झबडा गट ग्रामपंचायत आजही कोरोनामुक्त आहे. ती सरपंच रिताताई सुखदेवे यांच्या दूरदृष्टीमुळे आणि ग्रामस्थांच्या जबाबदार वागण्यामुळे. ग्रामपंचायतीची लोकसंख्या साडेतीन हजार. जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश येण्यापूर्वीच मानेगाव-झबडात आदर्श समितीनं कोरोना दक्षता समितीचं काम सुरू केलं.
रिताताईंनी २०१८ मध्ये या आदर्श समितीची स्थापना केली. त्यात सरपंच, पोलीस पाटील, ग्रामविकास अधिकारी, आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका आणि आरोग्यसेवक.


रिताताईंनी मार्च महिन्यातच सर्वात आधी या समितीची बैठक घेतली. या समितीत प्रत्येक वॉर्डातल्या 2-3 तरुणांचाही समावेश केला. मार्चपासूनच समितीतले हे तरुण रोज वॉर्डातल्या 25-30 घरांना भेटी देऊ लागले. घरात कोणाला सर्दी-खोकला, ताप आहे का? इतर काही त्रास होत आहे का? याची चौकशी करू लागले. त्याच्या नोंदी करू लागले. आशा वर्कर्सही रोज 25 घरांना भेट द्यायच्या.


एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात मानेगावपासून तीन किलोमीटर अंतरावरच्या गावात कोरोनाचा रुग्ण आढळला. लगेचच समितीनं गावच्या सीमा बंद केल्या.
नोकरीधंद्यासाठी गावाबाहेर असलेले एप्रिलअखेरीस लॉकडाऊनमुळे गावात परतू लागले. त्यांना गावाबाहेरच्या शाळेत विलगीकरणात ठेवलं. हा नियम सर्वांसाठी. शाळेत पुरेशा प्रमाणात प्रसाधनगृह तर होतीच. न्हाणीघर आणि पुरेशा पाणीपुरवठ्याची व्यवस्था वाढवण्यात आली. जेवणाची सोय प्रत्येकाच्या घरातूनच होत होती.
विलगीकरण पूर्ण झाल्यावरही, त्यांना सात दिवस घरातल्यांपासून दूर राहण्याची विनंती रिताताईंनी केली. रिताताई आणि त्यांच्या टीमनं लोकांच्या कलानं घेत या बाबी पटवून दिल्या. काही दोन-चार ग्रामस्थांनी या अशा विलगीकरणाला विरोध केला. पण इतर गावकऱ्यांनी विरोधकांना आपलं मत मागे घ्यायला लावलं. विलगीकरणात 4-5 जणांना सर्दी-खोकला झाला होता. त्यांना लगेचच भंडाऱ्याच्या जिल्हा रुग्णालयात तपासणीला पाठवलं. विलगीकरण कक्षातल्या लोकांना आरोग्य उपकेंद्रातल्या कर्मचारी नियमित तपासायच्या. मास्क वापरणं सक्तीचं. पुरुषांच्या बचतगटानं मोठ्या प्रमाणात मास्क शिवून दिले. गावात बचतगटामार्फत अनेक उद्योग सुरू आहेत. लॉकडाऊनच्या काळातही शारीरिक अंतराचे नियम पाळून या सर्व बचतगटांचं काम सुरू राहिलं.

रिताताईंनी सामान्य निधीचा वापर करत आरोग्य उपकेंद्रातल्या सर्व आठही कर्मचाऱ्यांना पीपीई किट घेऊन दिल्या. याच निधीचा वापर करून गावातलं रेशनदुकान, बॅंक, विलगीकरण कक्ष, सर्व सार्वजनिक ठिकाणांचं नियमितपणं निर्जंतुकीकरण केलं जातं. आठवडी बाजार बंद.
रिताताईंनी स्वतःच्या मुलाच्या लग्नाचा आदर्श गावकऱ्यांसमोर ठेवला. यामुळं गावातल्या इतर घरांमध्येही साधेपणानं, मर्यादीत संख्येतच कार्यक्रम झाले.
विद्यार्थी, गर्भवती आणि स्तनदा यांना पोषण आहार नियमितपणे मिळेल याकडेही रिताताईंनी लक्ष दिलं.
गावात आधीपासूनच ओला-सुका कचरा वेगळा गोळा करण्यात येतो. ओल्या कचऱ्यातून खतनिर्मिती करतात. प्लास्टिकचा वापर फार कमी आहे. त्यामुळं स्वच्छता आणि निर्जंतुकीकरणाकरता हे फायद्याचं ठरलं.
-साधना तिप्पनाकजे

Leave a Reply