टाळेबंदीमुळे सर्व व्यवहार ठप्प झाल्यानंतर ग्रामीण भागात पोषण आहाराचा प्रश्न बिकट झाला होता. त्यावर महिलांनीच पुढाकार घेतला. गावांमध्ये परसबागा फुलल्या आणि पोषण आहाराचा प्रश्न सुटायला मदत झाली.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद), कृतीसंगम अंतर्गत २५ जून ते १५ जुलै या कालावधीत ‘माझी पोषण परसबाग विकसन मोहीम’ हा उपक्रम झाला. यात राज्यात पहिला येण्याचा मान पटकावला यवतमाळ जिल्ह्याने. मोहिमेंतर्गत उद्दिष्ट होतं तीन हजार २८० वैयक्तिक आणि सामूहिक परसबागा विकसित करण्याचं. मात्र त्या पुढे जात जिल्ह्यातल्या ग्रामीण महिलांनी १३ हजार २८७ परसबागा फुलवल्या.
गेली तीन वर्ष सर्व १६ तालुक्यांमध्ये आहार, पोषण आणि स्वच्छताविषयक कार्यक्रम होत आहेत. त्यामध्ये ग्रामीण भागात पोषणाची आणि आरोग्याची स्थिती सुधारण्यासाठी विशेषतः गरोदर माता, स्तनदा माता, सहा ते २४ महिने वयोगटातील बालके आणि किशोरवयीन मुली यांच्या आहारामध्ये नियमित, स्वच्छ आणि जैविक पद्धतीने पिकविलेला ताजा भाजीपाला आणि फळे आदींचा समावेश व्हावा यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
परसबागांमुळे ग्रामीण भागातील कुटुंबाना घरच्या घरी भाजीपाला व फळे उपलब्ध झाली तसेच कुटुंबाचा भाजीपाल्यावरील खर्चातही बचत झाली.
राज्याच्या ‘उमेद’च्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विमला यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ यांना पत्र पाठवून अभिनंदन केले आहे. तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राजेश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनामुळे ही मोहीम यशस्वी झाल्याचे ‘उमेद’चे जिल्हा अभियान व्यवस्थापक नीरज नखाते, कृतीसंगमचे जिल्हा व्यवस्थापक सुजित क्षिरसागर यांनी सांगितले.
वर्धा जिल्ह्याने आठ हजार २८८ परसबागा तयार करून द्वितीय तर अमरावती जिल्ह्याने सहा हजार २१७ परसबागांची निर्मिती करून तृतीय क्रमांक मिळवला.
-नितीन पखाले, यवतमाळ