२०२० मध्ये पुण्यात पाच वर्षातल्या सर्वाधिक मुलींचा जन्म

“आपण २०२१ मध्ये आहोत म्हणजे मुलगा आणि मुलगी असा भेद, तोही पुण्यासारख्या शहरात असणं अशक्यच असं अनेकांना वाटत असणार. प्रत्यक्षात चित्र वेगळं आहे. २०१६ पासून पुण्यात प्रथमच १००० मुलांमागे ९४६ मुली जन्माला आल्या आहेत. पाच वर्षातील ही सर्वाधिक संख्या आहे. कोविडमुळे २०२० हे महामारीचं वर्ष म्हणून लक्षात राहणार आहे, त्याच वर्षात सर्वाधिक मुलींचं स्वागत शहरातल्या घरांमध्ये झालं ही अधिकारी म्हणून माझ्यासाठी समाधानाची गोष्ट आहे”,
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागातील सहायक आरोग्य अधिकारी डॉ. कल्पना बळिवंत सांगत होत्या. त्या हे सांगतात तेव्हा मागच्या पाच वर्षांत १००० मुलांमागे जन्मलेल्या मुलींची संख्या लक्ष वेधून घेते. २०१६मध्ये १००० मुलांमागे ९३२, २०१७मध्ये ९२६, २०१८मध्ये ९२८ आणि २०१९ मध्ये १००० मुलांमागे जन्मलेल्या मुलींची संख्या अवघी ९०४ एवढी होती. त्यामुळे २०२० मध्ये शहरात पाच वर्षातल्या सर्वाधिक मुली जन्माला आल्या आहेत.

डॉ. बळिवंत सांगतात, हे श्रेय माझ्यासारख्या एकट्या अधिकाऱ्याचं नाही, सगळ्यांचंच योगदान महत्वाचं आहे. आरोग्य विभाग, स्वयंसेवी संस्था, डॅाक्टर यांच्या मदतीमुळेच स्त्री भ्रूणहत्या रोखणं शक्य आहे. कायद्याची अंमलबजावणी ही अधिकारी म्हणून करावी लागतेच, पण जनजागृती आणि समुपदेशन या गोष्टींना याबाबतीत सगळ्यात जास्त महत्त्व द्यायची गरज आहे. लग्न झालेल्या, आई-वडील व्हायला इच्छुक जोडप्यांकडे आम्ही लक्ष केंद्रित केलं आहे.
मुलगा मुलगी असा भेदभाव होऊ नये म्हणून त्यांचं काऊन्सिलिंग आम्हाला महत्त्वाचं वाटतं. त्यादृष्टीने कॅार्पोरेट्स, बॅंका, आयटी अशा ठिकाणच्या विवाहित मंडळींशी आम्ही बोलतो.

दुर्दैव म्हणजे ‘मुलगाच हवा!’ यावर अडून बसणारी बहुतांश वेळा बाईच असते! बऱ्याच जोडप्यांना करिअर आहे. त्यामुळे एकच मूल हवं, म्हणून तो मुलगाच हवा असा दृष्टीकोन दिसतो. आमच्या महापालिकेत सफाई कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या बायकांना त्यांच्या जागी कुटुंबातील सदस्याला कामाला लावता येतं, मुलगा व्यसनी असला तरी या बायका मुलाला नोकरी लावण्याचीच धडपड करतात. अशा वेळी सुनेला नोकरी लावलीस तर ती तुला सांभाळेल हे समुपदेशन करावं लागतं. मुलगा जवळचा, मुलगा श्रेष्ठ ही समाजाने रुजवलेली वर्षानुवर्षांची मानसिकता आहे. ती बदलायला वेळ लागणार. आपण प्रयत्न करत राहायचे, असं म्हणत डॅा. बळिवंत आशा व्यक्त करतात.

पीसीपीएनडीटी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी आणि काही सुजाण पालकांची बदलती मानसिकता याला लिंग गुणोत्तरातील या सकारात्मक बदलाचं श्रेय दिलं पाहिजे. त्याचवेळी कोविडसारख्या एका मोठ्या साथीच्या काळात संपूर्ण जग घरात अडकून पडल्यामुळे तर मुलींच्या जन्माचे हे आकडे सुखावणारे नाहीत ना, असा प्रश्न पडतो.
डॉ. बळिवंत म्हणाल्या तसा ठाम निष्कर्ष काढणं योग्य होणार नाही, त्यामुळे आम्ही कायद्याची अंमलबजावणी अधिकाधिक प्रभावी करणं आणि समुपदेशनाचा वापर अधिक परिणामकारकपणे करणं ही दोन ध्येय निश्चित केली आहेत. जन्म-मृत्यूच्या नोंदी महापालिका वर्षभर ठेवते. मात्र लिंग-गुणोत्तर विषयक माहितीचं संकलन आम्ही वर्षाच्या शेवटी करतो. रेडिओलॅाजिस्ट संघटनांकडून वर्षभरात अधून मधून घटलेल्या गर्भलिंग निदानाबाबत कल्पना दिली जात होती. वर्षअखेरीस हे गुणोत्तर पाहिले तेव्हा समाधान वाटले. एक महिला म्हणून हे समाधान जास्त मोठं आहे.

– के.भक्ती, पुणे

Leave a Reply