२० खेड्यांना कुसळंबच्या ‘कोविड सेंटर’चा आधार

 

बीड जिल्ह्यातल्या पाटोदा तालुक्यातलं कुसळंब. २० गावांसाठी केंद्रस्थानी असणारं बाजारेपठेचं गाव. शासनाच्या प्रत्येक उपक्रमात अग्रभागी. गावाने ‘आदर्श’ म्हणूनही लौकिक मिळवलेला.
कोविडच्या दुसऱ्या टप्प्यात कुसळंबसह परिसरातील वाडीवस्तीवरही रुग्ण सापडू लागले. त्यांना उपचारासाठी न्यायचे म्हटले तर पाटोदा, जामखेड किंवा बीड असे तीन पर्याय समोर होते. मात्र हे तीनही पर्याय ग्रामस्थांना प्रवास आणि इतर दृष्टीने गैरसोयीचे.मग ग्रामपंचायत पदाधिकारी आणि काही ग्रामस्थांनी ठरवलं, गावातच कोविड केअर सेंटर सुरू करायचं .
गावचे भूमिपुत्र असलेले जिल्हा वैद्यकीय अधिकारी आर.बी.पवार यांचेही मार्गदर्शन लाभले. त्यांनी शासकीय परवानगी मिळवून दिली. सेंटरसाठी खंडेश्वर विद्यालयाची इमारत मुख्याध्यापकांनी दिली.ग्रामस्थ, ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी साहित्याची जुळवाजुळव केली. २५ खाटांचे सेंटर २३ एप्रिलला सुरूही झाले.


वाढते रुग्ण पाहता आठ दिवसात २५ खाटा वाढवल्या. अंबाजोगाईतल्या मानवलोक संस्थेने आणखी ५० बेडसह इतर भौतिक सुविधा दिल्या. त्यामुळे १०० रुग्णांच्या उपचाराची सोय झाली आहे.
सेंटरमध्ये सौम्य आणि मध्यम लक्षणे असणाऱ्या रुग्णांवर सरकारी खर्चाने उपचार होतात. एक एमबीबीएस डॉक्टर, २ बीएचएमएस डॉक्टरसह परिचारिका, तंत्रज्ञ असे १५ जण येथे सेवेत. रोज पहाटे योगशिक्षक योगासनांचे धडे देतात.
नाष्टा-जेवणाचा भार गावाने उचलला. त्यासाठी आता कोविड रिलीफ फंडही संकलित होत आहे. व्यापारी, नागरिक असे विविध घटक आपआपल्या परीने अन्नधान्याचं योगदान करतात. सरपंचांनी त्यांच्या शेतातील विहिरीतून टँकरद्वारे पाण्याची सोय केली. बऱ्या झालेल्या रुग्णांना घरी सोडण्यासाठी एक गाडीही ग्रामस्थांनी दिली आहे.
लोकसहभागाचं बळ एकवटल्याने शासनाकडून मदतही मिळाली. या दुहेरी ताकदीने हे सेंटर २० गावांसाठी वरदान ठरतंय.

-अनंत वैद्य, ता. पाटोदा, जि. बीड

Leave a Reply