पटेल रेसिडेन्सी चौक. संध्याकाळी ६ चा सुमार. पावणेदोन महिन्यापूर्वीची गोष्ट. दोघे पुरुष आणि त्यांचं कुटुंब अत्यंत थकलेल्या अवस्थेत दिसले. सोबत तीन लेकरं. त्यांची अवस्था पाहून मी त्यांना झाडाखाली बसवलं. विचारपूस सुरू केली. त्यातला गणेश बोलू लागला.
गणेश तायडे मूळचा मध्य प्रदेशातल्या खेतियाचा. ९ वर्षांपूर्वी तो नाशिकमध्ये आला. सुरुवातीला पडेल ते काम. मग बांधकाम क्षेत्रात मजुरी. बस्तान बसल्यावर धाकट्या भावालाही बोलावलं. दोघे भाऊ आपल्या कुटुंबासह कष्ट करू लागलं.
कोरोनामुळे लॉकडाऊनची घोषणा झाली. सगळंच ठप्प. हाती असलेल्या पैशातून कसेबसे दिवस ढकलले. आसपासच्या संबंधितांशी संबंध चांगले होते. पण एकूण सगळीच अनिश्चितता. रोजच नव्यानव्या अफवा कानी पडत. काय करावं समजत नव्हतं. गावी जायचं तरी वाहन कुठलंच नव्हतं.
गणेशची पत्नी तीन महिन्यांची गरोदर. पहिला मुलगा दोन वर्षांचा. त्याला झोळीत बांधलं आणि आहे त्या स्थितीत गावी निघण्याचं तिने ठरवलं. तिची तयारी बघून सगळ्या कुटुंबानं गावाची वाट धरली. सोबत आणखी काही जण चालू लागले.
मधल्या प्रवासात धडगावचा मूळ रहिवासी असलेला एक पोलीस भेटला. त्याने जेवायला घातलं आणि वाहनातून काही अंतरापर्यंत सोडलं. पुन्हा पायी प्रवास.
असं करत २४६पेक्षा अधिक किलोमीटर काटत ते शहाद्यात पोहोचले होते. त्यांच्या चहापाण्याची सोय केली. हिरालाल रोकडे आणि काही मित्रांना बोलावलं. संकल्प ग्रुपचे सदस्य आले. त्यांनी मास्क ,सॅनिटाइजर देऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
मग त्यांना खेतियापर्यंत पोहोचवण्यासाठी गाडीची व्यवस्था केली.
—रुपेश जाधव,शहादा,नंदुरबार