३० ज्येष्ठांचं कुटुंब आणि कोविड काळजी

 

कोरोनाचं संकट समाजातील विविध घटकांपुढे नवे प्रश्न, नव्या अडचणी घेऊन आलं. ज्येष्ठांसाठी तर हा काळ आणखीच अवघड.
बीड शहरानजीक धुळे-सोलापूर महामार्गावर कोळवाडी इथं बालाघाटाच्या डोंगररांगात आम्ही कामधेून आरोग्यधाम आणि गोशाळा हा प्रकल्प चालवतो. गेली ११ वर्षे हा प्रकल्प सुरू आहे. हे आमचं ३० ज्येष्ठांचं एक कुटुंबच. गतवर्षी जसजशी कोरोनाची लाट बीडपर्यंत येऊन पोहोचली, तशी आमच्या कुटुंबातील सत्तरीतील आप्पा, औटी काका, कुलकर्णी काका, काकी, मोरे मामा, कुमुदिनी आत्या अशा सर्व ज्येष्ठांची अधिकच काळजी वाटू लागली. कारण, ज्येष्ठांची प्रतिकारशक्ती सहसा कमी झालेली असते.
जिल्ह्यात गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात कोविड रुग्ण आढळताच आम्ही जास्त खबरदारी घ्यायला सुरुवात केली. आरोग्यधामचे मुख्य प्रवेशद्वार प्रथम बंद केले. एरवी येणारे अभ्यागत तसेच इतर कामांनिमित्त येणाऱ्यांचा संपर्क कमी केला.
संपूर्ण परिसरात नियमितपणे निर्जंतुकीकरण. स्वच्छतेवर विशेष भर. नेहमीप्रमाणे सायंकाळच्या भोजनानंतर सर्वांना विशिष्ट अंतरावर बसवून कोविड काय आहे? हा आजार कसा होतो? त्याला रोखायचे कसं? याची त्यांना भीती वाटू न देता सविस्तर माहिती दिली.


संवादासोबतच कृतीयुक्त बदलही घडले. सकाळी उठल्यावर सर्वांना कोमट पाणी, रात्री झोपताना वाफ, मोकळ्या हवेत बसणे, उठताना तसेच बसताना घाईगडबड न करणे, हलकाफुलका मात्र नियमित व्यायाम करणे, प्राणायाम, ध्यानधारणा , संतुलित आहार घेणे या बाबींवर भर होताच. बंदिस्त परिसर असला तरीही बाहेरून काही सामान आणले जायचे. सॅनिटायझरचाही वापर होताच. पिण्यासाठी फिल्टरचे तसेच आवश्यकतेनुसार कोमट पाणी देणे, अशा सर्व कामात आरोग्यधामचे कर्मचारी आणि आम्ही गुंतलो.
सुरक्षित अंतर ठेवून ज्येष्ठांसाठी हरीपाठ, नामस्मरण हे उपक्रम सुरू झाले. कधी अंताक्षरी रंगायची. यात ज्येष्ठ पूर्ण रमलेही. कुणी कोडी सोडवण्यात तर कुणी पुस्तक वाचनात दंग झालेले.
ज्यांना शुगर, रक्तदाब आहे, त्यांची आरोग्यधाममध्येच ठराविक अंतराने तपासणी केली. तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार औषधोपचारही सुरू होतेच. योग्य काळजी घेतल्याने वर्षभरात रुग्णालयाची वाट धरावी लागली नाही.
ज्येष्ठांची प्रतिकारशक्ती वाढावी, यासाठी डाॅ. घोडके यांनी मार्गदर्शन केलं. मुंबईस्थित नितीन पोतदार यांनी स्वत:हून सामाजिक दायित्व जपत इथल्या ज्येष्ठांसाठी मास्क आणि सॅनिटायझर पाठवले. #नवीउमेदकडून नितीन पोतदार Nitin Potdar यांना आमच्या संस्थेचं नाव कळलं. समाजातील इतरही दानशूर मंडळींची आरोग्यधामला वेळोवेळी मदत लाभली. पती श्रीनिवास कुलकर्णी, आमची दोन्ही मुल सुमित व अरविंदही या सेवासुश्रूषेच्या कामी गुंतलेले असतात. कर्मचारी पिंटु ढाकणे, कल्पना ढाकणे, आशाबाई, देवनाथ सुरवसे, अमोल ही सर्व मंडळी आरोग्यधाममधील ज्येष्ठांची आई-वडिलाप्रमाणे काळजी घेतात.
बालाघाटचा डोंगर, गोशाळा, कुडूलिंबासह विविध झाडांनी दाटलेला परिसर अशा वातावरणात आपुलकीनं परस्परांना जपणारं ३० ज्येष्ठांचं आमचं कुटूंब कोविडचं संकट दूर व्हावं , उपचार घेणाऱ्यांना दिलासा मिळावा, सर्वांना मुक्त विहार करता यावा, ही सदिच्छा व्यक्त करत आहे …
– मंजुषा श्रीनिवास कुलकर्णी, कामधेनु आरोग्यधाम व गोशाळा, कोळवाडी, ता. बीड.

Leave a Reply