७५ वर्षांची जीवनदायिनी

धुळे शहरातील मालेगाव-चाळीसगाव रस्त्याला जोडणारा हा ५० फुटांचा रस्ता. या रस्त्याचे काम सुरु होते. आणि मध्ये अडथळा ठरत होती ती जिवंत पाण्याचा झरा असलेली विहीर. विहिरीचा ७५ टक्के हिस्सा रस्त्यात येत असल्याने ती बुजवण्याशिवाय पर्याय नव्हता. काय करायचं?
तेव्हा स्थानिक नगरसेवक सतीश महाले यांनी विहीर बुजू द्यायची नाही असा निर्णय घेतला. आणि संबंधित ठेकेदाराला तशा सूचना दिल्या गेल्या. ही विहीर तब्बल ७५ वर्ष जुनी. याच विहिरीतून उन्हाळ्याच्या दिवसांत धुळे शहर आणि ग्रामीण भागाला पाणी पुरवलं जातं. 

ही विहीर वाचविण्यासाठी एक ऍक्शन प्लॅन तयार केला गेला. एखादा पूल बांधण्यासाठी तयार करतात तसा आराखडा तयार केला गेला. विहिरी वरूनच गटार बांधण्यात आली. आता रस्त्यात येणाऱ्या विहिरीवर सिलिंग टाकलं जाणार असून विहिरीचा एक चतुर्थांश भाग खुला राहणार आहे. उर्वरित हिस्सा गटार आणि रस्त्यात झाकला जाणार आहे. या रस्त्यावरून पन्नास टन वजनाचा ट्रक गेला तरी ते वजन सिलिंग अलगद उचलेल अशी व्यवस्था करण्यात आली आहे. विहिरीचे पाणी काढता येईल आणि विहिरीत अससेल्या मासे, कासवांना ऊन मिळेल असं काम इथे करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे विहिरीजवळ सुरक्षा कठडे बांधण्यात येणार असून गरजवंतांना टँकरने पाणी पुरवठा करण्याचं काम अव्याहत सुरु राहणार आहे. 
पाण्याचा एक एक स्रोत अनमोल आहे तो जोपासला पाहिजे, त्याची काळजी घेतली पाहिजे, ही धुळेकरांना झालेली जाणीव महत्त्वाची. 
– प्रशांत परदेशी.