८ तास ना पाणी प्यायले.. ना वॉशरुम.. फक्त श्वास घेता येत होता..

 

रुग्णसेवा म्हणजे ईश्वर सेवा, असं म्हणत मी गेली ७ वर्षे ड्युटी करत आहे. या आधी स्वाईन फ्ल्यू काळातही निडरपणे पेशंटची पुरेपूर काळजी घेतली. HIV /HBsag /cancer /TB असे कोणत्याही आजाराचे पेशंट असो कधीही मनात भीती आली नाही. पण कोरोना वॉर्डात ड्युटीला जाण्यासाठी का कोण जाणे वेगळीच भीती होती, कदाचित covid रुग्णाबद्दल बरंच काही ऐकून झाली असेल किंवा कुटुंबाच्या काळजीने. आपल्यामुळे परिवाराला, मुलाबाळांना संसर्ग झाला तर, हा विचार करून डोकं अगदी सुन्न होते. परंतु आपणच जर असं घाबरलो तर कसं होणार असा विचार करून, आपण कोरोनाला हरवूच असा सकारात्मक विचार करून कामाला सुरुवात केली.
१३ एप्रिल २०२० चा तो दिवस. पहिल्यांदा (PPE) प्रोटेक्टीव्ह किट घालावी लागली.


पहिला दिवस असल्यामुळे कसलंही विशेष प्रशिक्षण नव्हतं. सहकाऱ्यांकडूनच किट कशी घालायची ते माहिती करुन घेतलं. गॉगल, डबल मास्क, शुज कव्हर, फेस शील्ड आणि तो वॉटरप्रूफ ड्रेस ज्यातून बाहेरची हवासुद्धा आत जात नाही हे सगळे खूपच अनकम्फर्रटेबल वाटत होतं. गॉगल कानामागे टोचत होता, शुजकव्हरचे इलास्टीक सारखे खाली खाली सरकत होत, चालताना अडखळत होते, डबल मास्कमुळे श्वास घेण्यास त्रास होत होता. धावपळ करुन घामानेच आंघोळ होत होती. त्यातच त्या ड्रेसच्या कॅप मुळे व एकबंद ड्रेस असल्यामुळे इकडेतिकडे पाहणंही मुश्किल झालं होतं.
त्यातच जर काही खाली वाकून काम करायची वेळ आली तर ड्रेस फाटेल अशी भीती. डबल मास्क अन् N95 मास्क आणि फेस शील्डमुळे अक्षरशः गॉगलवर धुक्याचं जंगलच जमा होत होतं. त्यातूनच वाट काढत सगळी कामं करावी लागत. या सगळ्यामुळे डोळ्यांना अंधारी आल्यासारखं वाटायचं ते वेगळं.
१७ संशयित रुग्णांपैकी एक रुग्ण चौथ्या रिपोर्टला पॉझिटिव्ह आलेला. काहीना काही कारणाने सारखंच रुग्णाजवळ जावं लागत होतं. कधी इंजेक्शन, औषधं द्यायला तर कधी सलाईन संपलं तर बदलायला, डॉक्टरांच्या राऊंडला, कधी पेशंटचे घश्यात नळी टाकण्यास डॉक्टरांसोबत (Intubation ), कधी जेवणाची, पाण्याची व्यवस्था आहे की नाही ते पहायला, कधी आॉक्सीजन लावायला..
पीपीई घातल्यावर पाणी प्यायची इच्छा झाली तर पाणी पिणंही शक्य नसायचं. वॉशरुमला जाता यायचं नाही. आणि हे सगळं पूर्ण ८ तास. ड्युटी संपल्यावर हा ड्रेस एका ठराविक पद्धतीने काढावा लागतो. तर अक्षरशः अंगावरचे सगळे कपडे घामाने चिंब ओले, आणि ग्लोव्हज् घातलेले हात तर विचारूच नका ते तर अगदी पाण्यात भिजत ठेवले होते जणू, त्यातच उकाडा आणि पाण्याची तहान हे सगळं एक माणूस म्हणून मला पण खूपच त्रासदायक होतं. हा अनुभव अल्हाददायक, आनंद देणारा नव्हता. पण, मी आज कुणाच्यातरी दुःखावर फुंकर घालू शकले, कुणालातरी मदत करू शकले हे समाधान नक्कीच मिळालं. स्वतःच्या जिवाची पर्वा न करता, आम्ही सर्व हॉस्पीटल कर्मचारी तुमच्यासाठी सदैव तत्पर आहोत, इथून पुढेही कोविड वॉर्डमध्ये ड्युटी लागण्याची शक्यता आहेच. आणि आम्ही ती ही करू. पण, तुम्हीही स्वतःची काळजी घेतली पाहिजे, सरकार ज्या सूचना देत आहे त्याप्रमाणेच तुम्ही वागायला हवं. साबण-पाणी, मास्क याचा वेळोवेळी उपयोग करा.
– शीतल कदम, परिचारिका, औरंगाबाद

Leave a Reply