८ मिनिटात १००-२०० गणितांची उत्तरं

कल्याणची अनन्या विष्णू देसले. इयत्ता ६ वी. युसिमास इंटरनॅशनल ऑनलाईन ओपन चॅलेंज कॉम्पेटिशन २०२० ची फर्स्ट रनर अप आणि तिच्या गटात पहिली. सुमारे ८० देशांच्या मुलांमधून. स्पर्धेत ८ मिनिटात गणिताचे १००-२०० प्रश्न सोडवायचे . गेल्या वर्षी कंबोडियात झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेतही तिनं उत्तम कामगिरी केली. जिल्हा, राज्य, देश पातळीवर झालेल्या स्पर्धांमध्ये तिनं ३० हून अधिक बक्षिसं मिळवली आहे. अहमदाबाद आणि कोलकाता इथल्या देशपातळीवरच्या स्पर्धेत सलग तीन वर्ष अनन्या पहिली आली आहे.
अनन्याचे वडील विष्णू देसले मुंबईतल्या एका महाविद्यालयात प्राध्यापक. आपल्या मुलीनं पाठ्यपुस्तकाव्यतिरिक्त शिकावं, तिचा सर्वांगीण विकास व्हावा, असं त्यांना वाटत होतं. त्यावेळी त्यांना युसिमास (UCMAS ) बद्दल समजलं.
युसिमास (Universal Concept of Mental Arithmetic System ) ही मलेशियातली संस्था असून ८० हून अधिक देशात ती पसरलेली आहे. ४ ते १३ वयोगटातल्या मुलांसाठी अबॅकस, यंत्र न वापरता तोंडी गणितं झटपट सोडवण्याचं,स्मरणशक्ती, मेंदूला चालना देण्याचं हे प्रशिक्षण. राज्य, देश पातळीसह युसिमासच्या २५ आंतरराष्ट्रीय स्पर्धा आतापर्यंत झाल्या आहेत.
अनन्या दुसरीपासून हे प्रशिक्षण घेत आहे. तिच्या शिक्षिका वर्षा चव्हाण, युसिमासचे संचालक चंद्रकांत मिश्रा, मीरा मिश्रा यांनी तर मार्गदर्शन केलंच. शिवाय तिची आई उज्जवला यांनीही युसिमासमधले बारकावे समजून घेऊन मदत घेतली.
या अभ्यासामुळे अनन्याची श्रवणक्षमता, एकाग्रता, आत्मविश्वास वाढल्याचं तिचे पालक सांगतात. शाळेचा अभ्यास आणि इतर स्पर्धांमध्येही अनन्या बक्षिसं मिळवते. तिच्या पुढील वाटचालीसाठी नवी उमेदकडून अनेक शुभेच्छा.
-विजय भोईर, ता. कल्याण, जि . ठाणे
#नवीउमेद
Vijay Bhoir
#राष्ट्रीयगणितदिवस
#birthanniversaryoflegendaryIndianmathematicianSrinivasaRamanujan