आरोग्यरक्षक सरपंच

सर्वत्र धुमाकूळ घालत असणाऱ्या कोरोनाला काही गावांमध्ये आपला जम बसवता येत नाहीये. कारण इथल्या आरोग्यदक्ष सरपंचांचा बंदोबस्तच चोख आहे. अशाच एक सरपंच आहेत, अकोल्यातल्या मिर्झापूरच्या सरपंच चित्रा वानखेडे. गावात आतापर्यंत फक्त एकच व्यक्ती कोरोनाबाधित झाली होती. ही व्यक्ती उपचारांनंतर पूर्ण बरी होऊन स्वतःचं काम नेहमीप्रमाणं करत आहे. शासनानं सांगितलेल्या सूचना, मार्गदर्शक तत्वांसोबत चित्राताई आणखीही खबरदारी घेत आहेत.
मिर्झापूरची लोकसंख्या एक हजारच्या आसपास आहे. गावातल्या लोकांना हॉस्पीटल, बॅंक किंवा इतर महत्त्वाच्या कामासाठी कधीकधी गावाबाहेर जावं लागतचं. गावातल्या व्यक्तीला गावाबाहेर जाताना कुठं आणि कोणत्या कारणाकरता गावाबाहेर जायचं आहे याची माहिती ग्रामपंचायतीत द्यावी लागते. गावाच्या प्रवेशद्वारावर आशा वर्कर असतात. ही व्यक्ती परतली की प्रवेशद्वारावरच या व्यक्तीचे हात सॅनिटाईज केले जातात. त्याचं तापमान मोजलं जातं. यानंतर पुढचे १० दिवस रोज संध्याकाळी आशा वर्कर या व्यक्तिच्या घरी जाऊन त्याचं तापमान, ऑक्सिजन, नाडी तपासते. या व्यक्तीला ताप, सर्दी-खोकला किंवा इतर काही त्रास होत आहे का याची माहिती घेतली जाते. या व्यक्तीच्या कुटुंबातल्या इतर सदस्यांच्या आरोग्याचीही माहिती घेण्यात येते. गावात कोणी पाहुणा आलाच तर त्याचीही अशाच प्रकारे तपासणी करण्यात येते. या खबरदारीत कोणतीच हयगय केली जात नाही.


गावात नियमित कालावधीनंतर जंतुनाशक फवारणी सुरू आहे. दर दीड महिन्यानं फवारणी करण्यात येते. शेजारच्या गावात रुग्ण आढळल्यावरही गावात फवारणी करण्यात येते. ही फवारणी चित्राताई स्वतः करतात. सरपंच स्वतः फवारणी का करत आहेत असा प्रश्न पडला असेल ना? मिर्झापूर गावात जानेवारी महिन्यात कोरोनाचा रुग्ण सापडला. या रुग्णाला लगेचच रुग्णालयात दाखल केलं. या व्यक्तीचं गावात दुकान आहे. ते दुकान बंद करण्यात आलं. शासकीय नियमानुसार रुग्णाच्या वास्तव्याच्या आसपासच्या भागात जंतुनाशक फवारणी करायची असते. पण गावातले मजूर भीतीनं या भागात जंतुनाशक फवारणी करायला तयार नव्हते. शेवटी चित्राताईंनी स्वतःच फवारणी करण्याचा निर्णय घेतला. जंतुनाशक भरलेल्या या यंत्राचं वजन 25 किलोच्या आसपास असतं. हे धूड पाठीवर बांधून चित्राताई स्वतःच गावात फवारणी करतात. “सुरूवातीला मला हे जड गेलं पण आता सवय झाली. गावाची कुटुंबप्रमुख या नात्यानं गावाच्या आरोग्याची जबाबदारी माझी आहे. त्यामुळं मजुरांनी भीतीपोटी नकार दिल्यावर मी स्वतःचं फवारणी करायचं ठरवलं”, असं चित्राताई सांगतात. काही गावकरी त्यांना म्हणू लागले हे सर्व तुम्ही कुठं करता? त्यांना चित्राताईंनी सांगितलं, “तुम्ही फक्त घरात थांबा. मी माझी जबाबदारी पार पाडते”. त्यांच्या घरच्यांनीही त्यांना प्रोत्साहन दिलं. ग्रामपंचायत सदस्य आणि कर्मचाऱ्यांचीही त्यांना कामात साथ आणि मदत मिळते. पण फवारणीचं काम करायला कोणी पुढं येत नाही. याबाबत चित्राताईंना कोणाबद्दल काहीच आक्षेपही नाही. कारण आपण अशा प्रकारच्या कामाकरता कोणावर जबरदस्ती करू शकत नाही, असं त्यांचं म्हणणं आहे.
कोरोनाची साथ आल्यावर लगेचच चित्राताईंनी याबाबत काय काळजी घेतली पाहिजे याची माहिती घेतली. गावातल्या सर्व नागरिकांना वैयक्तिक स्वच्छता, कोरोना टाळण्याकरता हात धुणं, मास्कचा वापर आणि इतर खबरदारीचे उपाय घरोघरी जाऊन पटवून दिले. आपल्या घरासमोरची जागा, नाली स्वच्छ ठेवायची जबाबदारी आपली असल्याची ताकीद त्यांनी दिली. यासोबतच आहाराबद्दलही त्या माहिती देत होत्या. चित्राताईंचं म्हणणं ऐकलं की फायदा होईल हे गावकऱ्यांना माहित असल्यानं ते ही त्यांना साथ देतात. गावातल्या महिलांना त्या पूर्वी महिन्यातून एकदा एकत्र भेटत असत. आता त्या फोनवरून गावातल्या महिलांच्या संपर्कात असतात. रोजगारासाठी नाशिक, मुंबईत असणारे गावकरीही गेल्या वर्षीच्या लॉकडाऊनमध्ये गावात परतलेत. ते गावातच स्वतःच्या किंवा इतरांच्या शेतात लहान-मोठी कामं करतात.
सरपंचपदी महिला असल्यावर संपूर्ण गावालाच ती आपलं घर मानून काम करत असल्यानं गावचा विकास आणि गावाचं आरोग्यही कसं चांगलं राहतं हे चित्राताईंच्या उदाहरणातून दिसून येतं.

– साधना तिप्पनाकजे

Leave a Reply

Discover more from Navi Umed

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading