कोरोनाअनुभव भारताबाहेरचा

 

मी पश्चिम लंडन येथील हौन्सलो ह्या भागात राहतो. कोरोनाने जो जगभरात थयथायट मांडला आहे त्याला लंडन ही अपवाद नाही. किंबहुना युके (United Kingdom) Europe खंडातील सर्वाधिक प्रभावित देश होण्याची दाट शक्यता वर्तवली आहे. ह्याची मुख्य कारणे अशी: १. लंडन हे जगाच्या केंद्रस्थानी असल्याने इथं जगभरातील लोकांचं येणं जाणं असतं. २. इथं वृद्ध लोकांची संख्या अधिक आहे. आणि वृद्धांना या संसर्गाचा धोका सर्वाधिक आहे.

युकेआधी युरोप मधल्या काही देशात ह्या रोगाचा पसार झाला होता. सर्वप्रथम युके सरकारने त्यांच्या बेवसाईटवर त्यांची हा साथ रोग हाताळण्याची कृती योजना प्रकाशित केली. त्यात ४ टप्पे – १. प्रसार थांबवणे २. प्रसार नियंत्रण आणणे ३. संशोधन करणे आणि ४. प्रसार सौम्य करणे. आता इथे दुसरा आणि तिसरा टप्पा चालू आहे.

युकेमध्ये लॉकडाऊनची सुरुवात थोडी उशिराच केली गेली. तो पर्यंत कोरोना बऱ्यापैकी पसरला होता. आता इथं अनावश्यक वस्तूंची दुकाने, बंद करण्यात आली आहेत. हॉटेल्स आणि उपहारगृहाना फक्त जेवण वितरित करायची अनुमती आहे. पण आवश्यक सुविधा म्हणजे किराणाची दुकाने, सुपरमार्केट, टपाल, काही कारखाने चालू आहेत. तुम्ही फक्त घरचे आवश्यक सामान किंवा व्यायाम म्हणून चालायला बाहेर पडू शकता. अर्थातच तुम्हाला बाहेर असताना सामाजिक अंतर ठेवणं सक्तीचं आहे. सरकारने नियम मोडणाऱ्यांसाठी आर्थिक दंडाची अंमलबजावणी केली आहे. सर्वात चांगला उपक्रम म्हणजे ज्या व्यवसायांवर परिणाम झाला आहे त्यांना सरकारने आर्थिक मदत देऊ केली आहे. त्यात सर्व कर्मचाऱ्यांचे ८०% वेतन हे सरकार देणार. ह्या उपाययोजनेचा लाभ घेणं अगदी सोपं असून त्याची पूर्ण माहिती सरकारच्या वेबसाईटवर दिली आहे. सरकारचे कोरोनाचे औषध शोधण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत आणि ऑक्सफर्ड संस्थेनेने चांगली प्रगती केली असून काही लशींचे मानवी प्रयोग पण सुरू आहेत.

काही अपवाद वगळता सरकारने लागू केलेले नियम सर्वजण पाळताना आढळतात. जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी रांगेत उभे असताना सामाजिक अंतर ठेवूनच उभे असतात. वृद्ध आणि अपंग लोकांबरोबर आरोग्यसेवा व इतर अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना रांगेत प्राधान्य दिलं जातं. रस्त्यावर चालताना समोरून कोणी आलं तरी रस्ता ओलांडून पलीकडे जातात. इथं अजून फेस मास्कची सक्ती नसली तरी बरेच लोक बाहेर पडताना फेस मास्क आणि हॅन्ड सॅनिटायझर आवर्जून बरोबर घेतात. बसेसमध्ये ड्रायव्हर जवळ जाण्यास मनाई आहे.

दर गुरुवारी बरोबर ८ वाजता प्रत्येकजण आपल्या घराबाहेर येऊन आरोग्यसेवा कर्मचारी व इतर अत्यावश्यक सेवा करणाऱ्यांसाठी ५ मिनिटे टाळ्या वाजवतात. जागोजागी corona मध्ये घ्यायच्या काळजीच्या जाहिराती दिसतात.

मला असं वाटतं की ह्या संकटाच्या काळी प्रत्येक सरकार त्यांच्या परीने जितके होईल तितके प्रयत्न करत असते. एक सजक नागरिक म्हणून आपले फक्त एवढे कर्तव्य आहे की आपण त्यांनी केलेल्या नियमांचं पालन केलं पाहिजे.
आणि ह्या धकाधकीच्या जीवनात आपल्याला एक सुंदर संधी दिली असे समजून आपण थोडं शांतपणे आपल्या जीवनशैलीचा विचार करू शकतो.
लवकरच आपण ह्या रोगावर विजय मिळवू हे नक्की.

– आदित्य बागलकर, लंडन, युके

Leave a Reply

Discover more from Navi Umed

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading