तिची शाळा सुरू राहावी म्हणून- सायकल बँक
सोलापूरच्या माळशिरस तालुक्यातील निमगाव हे एक मोठं खेडं. केवळ लांबच्या शाळेत जाण्या- येण्याची सोय नसल्याच्या कारणावरून निमगावातील ४० मुलींनी शाळा सोडल्याची बाब समोर आली. समाजाला ही किरकोळ गोष्ट वाटू शकते, पण केवळ सायकल नसल्याने आणि सायकल विकत घेण्याइतकी आर्थिक कुवत नसल्यानं, मुलींचं शिक्षणच संपणं, शाळा सुटणं ही किती गंभीर बाब आहे, हे सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या लक्षात आलं. या समस्येवर मात करण्यासाठी त्यांनी ‘सायकल बँके’ची योजना तयार केली. ज्याद्वारे गरीब- गरजू मुलींना शाळेत जाण्यासाठी मोफत सायकलची सोय करण्यात येतेय.
सोलापुरातील गरजू विद्यार्थिनींसाठी सायकल बँक
निमगावच्या एका उदाहरणावरून स्वामी सरांनी जिल्ह्याची काय परिस्थिती आहे, त्याचा शोध घेण्याचे ठरविले. त्याकरिता आधी सायकलीअभावी ज्या मुली शाळेत जाऊ शकत नाहीत, त्यांचा सर्व्हे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातर्फे करण्यात आला. त्यातून एकट्या सोलापूर जिल्ह्यात ७८४१ मुली केवळ सायकलअभावी शिक्षणापासून वंचित असल्याचे वास्तव समोर आले. त्यामुळे सायकल बँकेची योजना केवळ निमगावपुरती मर्यादित न ठेवता ती संपूर्ण जिल्ह्यासाठी लागू करण्यात आली.
जिल्हाभरातील मुलींची खरी निकड समोर आल्याने, या योजनेसाठी दात्यांनी हात पुढे करण्यास सुरवात केल्याचे सकारात्मक चित्र सोलापूर जिल्ह्यात पाहायला मिळतेय. याच उपक्रमाला मदत म्हणून माळशिरस येथील खडकमल शाळेचे मुख्याध्यापक दिगंबर गायकवाड यांनी, सायकल बँक उपक्रमास भेट म्हणून तब्बल दीड लाख रूपयांचा चेक सीईओ दिलीप स्वामी यांच्याकडे सुपुर्द केला. ‘शिक्षणाची दशसुत्री’ उपक्रमांतर्गत माळशिरस तालुक्यातील अकलूज येथील सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील स्मृती भवन सभागृहात मुख्याध्यापकांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. त्याप्रसंगी “जिल्ह्यातील लेकी- बाळी, माझ्या बहिणी शिक्षणापासून केवळ सायकल नसल्याने वंचित राहू नयेत, म्हणून माझ्या बहिणींसाठी दीड लाखांची मदत” देत असल्याचे गायकवाड सरांनी सांगितले.
मुख्याध्यापक गायकवाड सरांकडून सायकल बँक उपक्रमाला दीड लाखांची देणगी
गायकवाड सरांच्या मदतीने दिलीप स्वामी सरही भारावून गेले आणि या उपक्रमासाठी गायकवाड सरांसारख्या जाणत्या दात्यांची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. शिक्षणाचे महत्त्व जाणणाऱ्या सुजाण नागरिकांनी, विशेषत: शिक्षक- मुख्याध्यापकांनी या उपक्रमाकरिता पुढे येणं सुखावणारं आहे, असंही ते म्हणाले. गायकवाड सरांच्या उदाहरणावरून रक्षाबंधन- भाऊबीजेच्या पार्श्वभूमीवर ‘सायकल भेट बहिणीसाठी’ हा ही उपक्रम सोलापुरात सुरू करण्यात आलाय. सप्टेंबर महिन्यापर्यंत या उपक्रमाद्वारे दोन हजार गरजू मुलींना सायकलचे वाटप करण्यात आले, मात्र अजूनही साडेपाच हजार लेकींना सायकलची गरज आहे. अर्थातच या उपक्रमाला दानशुरांच्या हातांची गरज आहे. या निकडीला गायकवाड सरांची मदत हातभार लावेलच, पण संवेदनशील- शिक्षणप्रेमी नागरिकांची मदतही मोलाची ठरेल.
या उपक्रमाद्वारे मुलींच्या शिक्षणात छोटे- छोटे वाटणारे, पण किती मोठे अडथळे असतात, हे पुन्हा पुन्हा लक्षात येतंय. एकट्या सोलापूर जिल्ह्यात जवळपास आठेक हजार मुली केवळ सायकल नसल्याने शिक्षणापासून वंचित असल्याचं सर्वेक्षणातून लक्षात आलंय, असंच सर्वेक्षण जर राज्यभरात केलं तर हा आकडा अधिक धोकादायक असू शकतो. त्यामुळे सोलापूरचा सायकल बँकेचा पॅटर्न राज्यभरातही राबवला जायला हवा.
लेखन: विनोद चव्हाण, सोलापूर
नवी उमेदची टीम दररोज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातली सकारात्मक कामं, घटना, व्यक्ती तुमच्यापर्यंत आणत असते. या कामाला खर्च येतो. त्यातला काही वाटा वाचक म्हणून तुम्ही उचलावा, ही विनंती. त्यासाठी ही लिंक:
अकाऊंट डिटेल्सः
Sampark account details
Name: SAMPARK
Account No: 50100547410322
Account Type: Savings
Branch Name: HDFC Bank, Goregaon East
IFSC Code: HDFC0000212
सोबतच नवी उमेदविषयी तुमचा अभिप्राय, प्रतिसाद अवश्य लिहा.

Leave a Reply

Discover more from Navi Umed

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading