१. रुग्णाला सकाळी ६ वाजता गरम काढा.
२. ७ ते ८ या वेळेत व्यायाम व योगा.
३. ८ ते ९ वेळ रुग्णाला फ्रेश होण्यासाठी .
४. ९ वाजता नाष्टा ज्यात शिरा, उपिट, पोहे, सुशेला, अंडी व फळे
.५. १० ते ११ या वेळेत मेडिकल चेकअप.
६. दुपारी १ वाजता जेवण
७. २ ते ५ या वेळेत रुग्णांची आरामाची वेळ.
८. ५ वाजता सेंटरसमोरील मैदानात फेरफटका
९. ६ वाजता गरम सूप
१०. ७ वाजता औषधोपचार
११. रात्री ८ वाजता जेवण
१२. १० वाजता रुग्णांची झोपेची वेळ.
हा आहे उमरगातल्या कोविड केअर सेंटरमधल्या रुग्णांसाठी १२ कलमी कार्यक्रम. उमरगा,उस्मानाबाद जिल्ह्यातला तालुका. इथल्या युवकांनी ईदगाह फंक्शन हॉलमध्ये सर्व सुविधायुक्त कोविड केअर सेंटर सुरू केलं आहे. कोरोनाचं संक्रमण रोखण्यासाठी सर्व यंत्रणा जीवाचं रान करत असतानाही रुग्णसंख्या झपाट्यानं वाढतच होती. सोशल मीडियाच्या माध्यमातून सल्ले देणं, प्रशासनाला लक्ष्य करणं यापेक्षा आपल्या माणसांसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे, असं या युवकांना वाटलं. कोविड सेंटर उभारायचं त्यांनी ठरवलं.
सेंटर उभारावं असं का वाटलं याबाबत ख्वाजा मुजावर सांगतात. ”आमच्या कुटुंबातल्या दोघांना कोरोनाची लागण झाली. आमचं संपूर्ण कुटुंब विलगीकरण कक्षात आणि कोविड सेन्टरमध्ये होतं. आमची खूप गैरसोय झाली. मानसिक आधार देणारंही कोणी नव्हतं. पण यासाठी फक्त कोणाला तरी दोष देत राहण्यापेक्षा आपण काहीतरी करावं असं वाटलं. जेणेकरून आम्हाला जो त्रास झाला तो इतरांना होणार नाही. शासकीय यंत्रणांना काहीतरी हातभार लावता येईल. ”
मग एक ऑगस्टला व्हाट्सएप ग्रुपवर चर्चा. तहसीलदार संजय पवार यांना संकल्पना सांगितली. ईदगाह फंक्शन हॉलची अवस्था खूपच बिकट होती. रंगरंगोटी, खिडक्यांच्या काचा, शौचालय, दिवे, पंखे, स्वयंपाकघर, भोजनकक्ष अशी अनेक कामं आवश्यक होती. खर्चाचा अंदाज बांधून युवकांनी व्हाट्सएप ग्रुपवर आवाहन केलं. ‘उमरगन्स’, ‘उमरगा डिबेट ग्रुप’ आणि समाजातल्या दानशूर व्यक्तींनी यासाठी भरभरून मदत केली.
१० ऑगस्टला ३५ खाटांचं कोविड सेंटर उभं राहिलं. आतापर्यंत १०० बाधितांवर इथं उपचार झाले आहेत.
बाबा जाफरी, ख्वाजा मुजावर, जाहेद मुल्ला, कलीम पठाण, राशीद मौलाना, हाफिज रशीद, मौलाना आयुब अजहर शेख,फैजल पटेल आणि अन्य स्वयंसेवक व्यवस्था पाहतात. उमरगा इथले योगप्रशिक्षक सुरेंद्र वाले आणि संतोष राठोड मोफत योगमार्गदर्शन करतात.
बाबा जाफरी सांगतात,” योग आणि प्राणायामामुळे रुग्णांच्या मनस्थितीत सुधारणा होते. कठीण काळात आपण फक्त प्रशासनाकडून अपेक्षा ठेवता कामा नये. आपणही समाजाचं देणं लागतोच की !”
तहसीलदार संजय पवार वेळोवेळी सेंटरला भेट देऊन मार्गदर्शन करतात. पालकमंत्री शंकरराव गडाख, खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार ज्ञानराज चौगुले, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार, किरण गायकवाड यांनी या उपक्रमाचे कौतुक केले आहे.
-गिरीश भगत, ता . उमरगा, जिल्हा उस्मानाबाद