1300 हून जास्त अंधांना दृष्टी देणारा ‘प्रकाशदाता’
साल 1991, अहमदनगर जिल्हा. बबईबाई बोरूडे यांच्यावर मोतिबिंदूची शस्त्रक्रिया करायची होती. त्याकाळी आजच्यासारख्या प्रगत वैद्यकीय सुविधा सगळीकडे उपलब्ध नव्हत्या. त्यांचा मुलगा म्हणजेच जालिंदर बोरूडे, तेव्हा जलसंपदा विभागात शिपाई म्हणून कार्यरत होते. त्यांचा आईवर फार जीव, पण पगार मोजका, घरची जबाबदारी. आईचं ऑपरेशन करणं अत्यावश्यक, पण त्या काळी या छोट्याश्या ऑपरेशनसाठी पैसे जमवताना आणि तज्ज्ञ डॉक्टरांकडून ऑपरेशन करून घेण्यासाठी बोरूडेंची चांगलीच तारांबळ उडाली. सुदैवाने बबईबाईंचे ऑपरेशन सुरळीत पार पडले, आणि त्यांचे डोळे वाचले.
“मी नोकरी करत असूनसुद्धा आईचं ऑपरेशन करून घेण्यासाठी मला इतकी धावपळ करावी लागत असेल, तर ज्यांच्याकडे पैसा नाही, शिक्षण नाही त्यांचे काय हाल होत असतील?” या विचाराने बोरूडेंना अस्वस्थ केलं. आणि मग त्यातूनच जन्म झाला अहमदनगरच्या ‘फिनिक्स सोशल फाऊंडेशन’चा. सध्या जलसंपदा विभागात टेलिफोन ऑपरेटर म्हणून कार्यरत असलेल्या या अवलियाने गेल्या तीस वर्षांपासून मोफत नेत्र तपासणी आणि मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिरं सातत्याने घेतली आहेत. एवढंच नाही तर नेत्रदानाचे महत्त्व ओळखून, 83 हजारांहून जास्त लोकांकडून नेत्रदानाचा संकल्प करवून घेतलाय. आणि त्याहूनही जास्त महत्त्वाचं म्हणजे 1348 अंधांना प्रत्यक्ष नेत्रदान घडवून खरोखर नवी दृष्टी दिलीये.
मोफत नेत्रशिबिरे घेणाऱ्या जालिंदर बोरूडेंना आशीर्वाद देणाऱ्या आजीबाई
समविचारी मित्रांना सोबत घेऊन उभारलेल्या या फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या माध्यमातून, नगर तालुक्यातल्या नागरदेवळे इथं दर महिन्याच्या १० तारखेला ‘मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर’ घेतलं जातं. अहमदनगरमधील जिल्हा रूग्णालय आणि पुण्यातील बुधरानी हॉस्पिटल या नेत्रतपासणी आणि मोफत शस्त्रक्रिया शिबिराला मोठी मदत करतात. तसेच अहमदनगरच्या आनंदऋषी रूग्णालयातही कमी खर्चात उपचार आणि शस्त्रक्रिया केली जाते. नेत्रतपासणी शिबारीत ज्यांना शस्त्रक्रिया करण्याची गरज आहे, त्यांच्यावर पुण्यातील बुधरानी हॉस्पिटलच्या तज्ज्ञांच्या मदतीने मोफत नेत्रशस्त्रक्रिया केली जाऊ जाते. गेल्या तीस वर्षात आतापर्यत पाच लाखांहून अधिक गरीब रुग्णांची तपासणी करून, सुमारे २ लाख १३ हजार रुग्णांच्या मोफत नेत्र शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. यात अगदी शिबिराकरिता नोंदणी म्हणूनही एक रूपयासुद्धा रूग्णांकडून घेतला जात नाही. शिवाय पुण्यात शस्त्रक्रिया करायची असल्यास अहमदनगर ते पुणे बसप्रवास, पुण्यात मोफत शस्त्रक्रिया, तिथलं जेवण- राहणं, नंतरची औषधं आणि चष्मा असं सर्व काही गरजूंकरिता पूर्णपणे मोफत केले जाते.
फक्त डोळ्यांची शस्त्रक्रिया नव्हे तर ‘दृष्टी’ ही किती मोलाची गोष्ट आहे, याची जाणीव असलेल्या बोरूडेंनी नेत्रदान चळवळीची पाळंमुळं अहमदनगर जिल्ह्यात पक्की केली आहेत. त्यामुळे शिबिरांदरम्यान नेत्रदान करण्याची इच्छा व्यक्त करणाऱ्या लोकांचे अर्ज भरून घेतले जाऊ लागले. नेत्रदान चळवळीत दिलेल्या योगदानाने मरणोत्तर नेत्रदानातून 1348 दृष्टीहीनांना नवदृष्टी मिळाली आहे. 83 हजार जणांनी ‘मरणोत्तर नेत्रदान’ करण्याचा संकल्प केला आहे. नेत्रदान चळवळीमुळे अनेकांना हे सुंदर जग पाहता आले. नेत्रदानाचा फॉर्म भरलेल्या एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला की, त्यांच्या नातेवाईकांचा फिनिक्स सोशल फाऊंडेशनला फोन येतो. लवकरात लवकर त्या घरी तज्ज्ञ डॉक्टरांची टीम पोहोचते आणि मृत व्यक्तीचे डोळे शास्त्रोक्त पद्धतीने काढून घेतले जातात. आणि मग वेटिंग लिस्टवर असलेल्या गरजू अंध व्यक्तीला डोळे बसवले जातात. मग अक्षरश:, त्या अंध व्यक्तीचे जगच बदलून जाते.
अशाच प्रकारचे काम विविध सामाजिक संस्था, संघटनांच्या माध्यमातून केले जाते. परंतू जालिंदर बोरुडे यांनी नेत्रदान आणि नेत्रशस्त्रक्रिया चळवळीत केलेले कार्य वाखाणण्याजोगेच आहे. शिबिरांचा लाभ घेण्यात विडी कामगार, बांधकाम कामगार, हमाल, कष्टकरी, शेतकरी, मजूर, महिला, गरीब वंचित घटकांतील लोकांची संख्या अधिक आहे. इतकंच नव्हे तर कोरोनाच्या संकट काळात देखील, कोविड प्रतिबंधक सगळे नियम पाळून नेत्रतपासणी आणि शस्त्रक्रिया शिबिरे बोरूडेंनी यशस्वी करून दाखवली. कोरोनाच्या संकटकाळात सर्वसामान्य नागरिकांसाठी राबविण्यात आलेल्या या शिबीरांची राष्ट्रीय अंधत्व निवारण समिती, दिल्ली आणि केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी दखल घेऊन बोरूडे यांचा गौरव केला.
या शिबिरांमध्ये डोळ्यांची तपासणी तसेच नेत्रशस्त्रक्रियाही केल्या जातात
जालिंदर बोरूडे यांनी नेत्रदान चळवळीवर ‘दृष्टीमित्र’ आणि ‘नेत्रज्योत’ ही पुस्तके लिहिली आहेत. गौरव बोरूडे, सौरभ बोरूडे, राजू बोरूडे, वैभव दाणवे, आकाश धाडगे, बाबासाहेब धीवर इ. मंडळी फिनिक्स फाऊंडेशनच्या कामात सहभागी असतात. बबईबाईंच्या म्हणजेच त्यांच्या आईच्या निधनानंतर त्यांनी आता नेत्रतपासणीसोबत अन्य रोगांचे निदान करणारी शिबिरे घेणंही सुरू केलंय.
लेखन: सूर्यकांत नेटके, अहमदनगर
नवी उमेद कसं वाटतं तुम्हाला? तुमचा अभिप्राय, प्रतिसाद अवश्य लिहा. आणि वाचकहॊ, तुम्हीही नवी उमेदला आर्थिक मदत करा. त्यासाठी ही लिंक: https://naviumed.org/support/

Leave a Reply