मोक्षकाष्ठ

 

”मोक्षकाष्ठ’, मोक्ष म्हणजे मुक्ती आणि काष्ठ म्हणजे लाकूड”. विजय लिमये सांगतात. अंत्यसंस्कारावेळी लाकडाला पर्याय मोक्षकाष्ठ. शेतातील तुराटी,पराठी, झुडपं यापासून केलेले ओंडके म्हणजे मोक्षकाष्ठ. नागपूर शहरातल्या १४ दहन घाटावर याचा वापर होतो. महिन्याला साधारण ६५० अंत्यविधी. मोक्षकाष्ठमुळे महिन्याकाठी जवळपास ८०० झाडं वाचतात.
मोक्षकाष्ठ निर्मितीसाठी लिमये यांनी कुही गावात फॅक्टरी सुरू केली आहे. लिमये निसर्गप्रेमी. इको-फ्रेंडली फाऊंडेशनचे संस्थापक आणि अध्यक्ष.


वर्ष २०१३ मध्ये वडिलांच्या अंत्यसंस्कारावेळी घाटावरील स्थिती पाहून त्यांना निसर्गाच्या ऱ्हासाची जाणीव झाली. मग त्यांनी गोवरीचा प्रयोग सुरू केला. पण गोवऱ्यांचाही तुटवडा भासत असल्याचं लक्षात आलं. तीन वर्ष हा प्रयोग केल्यावर मोक्षकाष्ठची संकल्पना सुचली.
शेतकरी शेतातला कचरा जाळतात. त्यातूनही मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होतं. लिमये पैसे देऊन शेतातला हा कचरा विकत घेतात. शेतकऱ्याला हेक्टरी पंधराशे रुपये. तसेच ट्रॅक्टरनं त्याची नांगरणीसुद्धा होते. हा कचरा बारीक करतात. तो मशीनमध्ये टाकल्यावर अर्धा ते दीड किलोचे ठोकळे तयार होतात. एका अंत्यविधीसाठी साधारण असे २५० ठोकळे लागतात. दहनानंतर राख गोळा होण्यासाठी ट्रे ठेवला जातो. ही राख खत म्हणून उपयुक्त ठरते.
”एका अंत्यविधीसाठी ३०० ते ३५० किलो लाकूड लागतं तर मोक्षकाष्ठ साधारण २५० किलो. ”लिमये सांगतात. ” हळूहळू लोकांमध्ये याबाबत जागृती होत आहे. महिन्याकाठी शहरात दीडशे टन उत्पादन लागतं.”त्यांच्या या प्रयोगातून झालेली रोजगारनिर्मिती, पर्यावरण संरक्षण,शेतकऱ्याला होत असलेला दुहेरी फायदा याचं कौतुक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही केलं आहे.

-नीता सोनवणे, नागपूर

Leave a Reply