“मी नाशिक शहरातील शासकीय कार्यालयात माझ्या महत्वाच्या कामासाठी आले होते. सात महिन्यांचा माझा मुलगा सोबत आणण्याशिवाय मला पर्याय नव्हता. काही तासांनंतर माझं काम झालं. घरी परतण्यासाठी ठक्कर बझार बसस्थानक गाठले. बाळाला दूध पाजून साडेतीन तास होऊन गेले होते. एवढ्या वेळानंतर बाळाला पाजणं गरजेचं होतं. तिथंच बाकड्यावर मी चुळबुळत बसले होते, तर शेजारच्या ताईंनी हिरकणी कक्षाकडे बोट दाखवून, मला तिथं जाण्यास सांगितले. मी घाबरतच तिथं गेले, बाळाला पाजायला ही जागा सुरक्षित असेल का? असं वाटत होतं. मी दरवाजा ढकलला तर आश्चर्यच! छोटीशी खोली- फॅन, लाईट, बेडसह सज्ज होती. दार लावून घेत मी बाळाला दहा मिनिट निवांतपणे दूध पाजलं. मग बाहेर येऊन बसची वाट बघत बसले. बसही लगेच आली. एसटी महामंडळाने आमच्यासारख्या स्तनदा मातांसाठी केलेली ही सोय फार फार उपयोगी आहे. त्याबद्दल हा कक्ष तयार करणाऱ्यांचे, तो सांभाळणाऱ्यांचे आभार मानावेत तेवढे कमीच.” अशा शब्दात नाशिकच्या मीनल देशमुख यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
असाच अनुभव धुळ्याच्या कोमल कोठावळे यांनीही सांगितला, त्या म्हणाल्या, “ मी कुटुंबासह नाशिकहून धुळ्याला चालले होते. ठक्कर बसस्थानकावर बसची वाट बघत असताना माझी एक वर्षाची मुलगी जोरात रडायला लागली. तिला दूध पाजणं गरजेचंच होतं, कारण तिची तब्येत बरी नव्हती आणि ती काही खातही नव्हती. क्षणभर टेन्शन आलं, इथं कुठं आणि कसं दूध पाजणार? त्याचवेळी माझं लक्ष ‘हिरकणी कक्ष’ या समोरच्या बोर्ड कडे गेलं. मुलीला घेऊन लगेच तिथं गेले. दरवाजा उघडला, आतली स्वच्छ्ता, सोयीसुविधा बघून फार आनंद झाला. मुलीला निवांत दूध पाजलं आणि बाहेर आले. लेक लगेच शांत झाली. बस लागलेली होती. पुढचा प्रवास चांगला झाला. हा कक्ष फार चांगला होता आणि त्या क्षणी खूप दिलासा मिळाला.” या कक्षाबद्दल या दोघींसह अनेकजणींनी आनंद आणि समाधान व्यक्त केले.
शासकीय कार्यालये आणि सर्वच महत्त्वाच्या सार्वजनिक ठिकाणी स्तनदा मातांसाठी ‘हिरकणी कक्ष’ उभारावेत हा 2012 सालचा शासननिर्णय. भारतीय स्तनपान प्रसारक मंडळाच्या महाराष्ट्र शाखेने याची शिफारस केली होती. यात 60X60 ची स्वतंत्र खोली स्तनपानासाठी असावी, तिथं पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, पलंग- गादी, चांगले बेडशीट, तक्क्या- उशा, पंखा असावा, हिरकणी कक्षाच्या भिंतीवर स्तनपानाचे महत्त्व आणि शिशुपोषणाच्या शिफारशी इ.ची सचित्र माहिती असावी, अश्या शिफारशी होत्या. त्यानंतर एसटी महामंडळाचे तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर यांनी महाराष्ट्रात्या सर्व 248 बसस्थानकांमध्ये हिरकणी कक्षाची स्थापना करण्याचा निर्णय घेतला होता. पण आज दुर्दैवाने महाराष्ट्रातील प्रत्येक एसटी स्थानकावर असा चांगल्या अवस्थेतील हिरकणी कक्ष आहेच असं आपण ठामपणे म्हणू शकत नाही.
मात्र नाशिक शहरातील ठक्कर बझार बसस्थानक आणि महामार्ग बसस्थानक येथे राज्य परिवहन महामंडळाने ‘डाबर इंडिया लिमिटेड’ या खाजगी कंपनीच्या मदतीने देखणे, आकर्षक, सर्व सोयीसुविधांनी सज्ज असे ‘हिरकणी कक्ष’ बसस्थानक आवारात उभारले आहेत. यामुळे स्तनदा मातांची मोठी सोय झाली आहे. शासनाने ठिकठिकाणी बस स्थानकांवर हिरकणी कक्ष स्थापन करण्याचे आदेश दिले तेंव्हा पूर्वीही इथे हिरकणी कक्ष होता. परंतु तो म्हणजे चालक, वाहकांच्या विश्रांती खोलीतला एक कोपरा. तिथं स्वच्छ्ता नव्हती की, कोणत्या सुविधाही नव्हत्या. स्तनदा मातांची तिथं फिरकायची हिंमतही होत नव्हती, शिवाय तिथं पुरूषांचा वावर होता.
पण यावर्षी 26 जानेवारी 2022 रोजी, या ठिकाणी छोटा का होईना पण अत्याधुनिक आणि सोयीसुविधा हिरकणी कक्ष उभारण्यात आलाय. तिकीट बुकिंग कार्यालयाच्या समोर आणि सीसीटीव्हीच्या निगराणी खाली हा कक्ष असल्यानं त्याचा गैरवापर होणार नाही, याची वाहतूक निरिक्षक आणि येथील कर्मचारी कटाक्षाने काळजी घेत असतात. त्याचा वापर वाढावा म्हणून बुकिंग खिडकीवरील महिला कर्मचारी स्वतः स्तनदा मातांकडे जाऊन त्यांना या कक्षाची माहिती देतात, वेळप्रसंगी कक्षापर्यंत नेऊन सोडत आहेत. वरिष्ठ आगार व्यवस्थापक सुनील शिंदे आणि वाहतूक निरीक्षक परमेश्वर रावणकोळे यांनी सांगितले की, दररोज पहाटे 4 वाजता कक्षाचे कुलूप काढून टाकले जाते, आतल्या स्वच्छतेची काळजी घेतली जाते. रात्री 12 पर्यंत कक्ष महिलांसाठी खुला असतो. 12 वाजल्यानंतर टवाळखोरांकडून त्याचा गैरवापर होऊ नये, म्हणून कक्षाला कुलूप घातलं जातं. वापर झाल्यावर आतील फॅन, लाईट बंद करण्याची, दाराला बाहेरून कडी लावून घेण्याची काळजी कर्मचाऱ्यांकडून घेतली जाते. त्यामुळे अनेक स्तनदा माता याचा लाभ घेत आहेत.
असाच हिरकणी कक्ष महामार्ग बसस्थानकात उभारण्यात आला असून, भविष्यात शहरातील जास्त गर्दीच्या सर्व बस स्थानकांवर ते उभारण्याचे नियोजन असल्याचीही माहिती, महामंडळाकडून देण्यात आली. कक्षाच्या बाहेरील बोर्डावर मातृत्व सुविधा केंद्र, बेबी फीडिंग रूम अर्थात ‘हिरकणी कक्ष’ असे ठळक अक्षरांत लिहिले आहे. सफाई कर्मचाऱ्यांकडून कक्षाची नियमित साफसफाई केली जाते. कचरापेटी वेळच्या वेळी रिकामी केली जाते.
नाशिकसारखेच सुसज्ज हिरकणी कक्ष राज्यभर सर्वत्र उभारले आणि सांभाळले जावोत, अधिकाधिक स्तनदा मातांना त्याचा लाभ मिळो, हीच इच्छा व्यक्त करावीशी वाटते. नाही का?
लेखन: भाग्यश्री मुळे, नाशिक.
#नवी_उमेद
#हिरकणीकक्ष
#स्तनपान_जागृती_सप्ताह
#नाशिक
#worldbreastfeedingweek2022
#मातेचंदूधअमृतासमान