25 किमीचा प्रवास…नंतर कोरोना वॉर्ड !

 

पल्लवी जाधव. गेली पाच वर्षं कृष्णा चॅरिटेबल हॉस्पिटल, कराड येथे नर्स म्हणून काम करत आहे. तिचं मूळ गाव जाधववाडी. कराडपासून साधारण २५ किमी. कोविड- १९ ची साथ सुरू झाली अन् पंधराच दिवसांत कामाची पाळी सुरू झाली. कामाचे तास सहा. कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून शरीर झाकणारे पीपीई किट अंगावर. त्यातून उन्हाळा. घामाने संपूर्ण शरीर ओलं होई. बुटामध्ये पाणी साचे. नंतर हॉस्पिटलने नवीन पद्धतीचे पीपीई किट दिलं आणि त्रास थोडा कमी झाला असं पल्लवी सांगते.
सार्वजनिक वाहतूक बंद असल्याने तिचा भाऊ गणेश जाधव रोज तिला दुचाकीवरून कराडला सोडायला जात आहे. मागील दोन महिने हा प्रवास असाच चालू आहे. गावातील काही लोकांनी कौतुक केलं. मात्र काहींनी तिच्या जवळ जाणं देखील टाळलं. तू जास्त काळजी करू नको, मनात नको ते विचार आणू नको, सगळं काही ठीक होईल असा पाठिंबा घरून मिळाल्याने पल्लवीचं मनोबल वाढलं आहे.
शहरातून गावाला होणारं स्थलांतर वाढल्याने कोविडचे रुग्ण गावात वाढत आहेत. रुग्णांना रोगापेक्षा मानसिक आधाराची जास्त गरज आहे, तरुण मंडळी रोगाला चांगला प्रतिकार करत आहेत, शिवाय रुग्ण बरे होण्याचा वेग देखील वाढला आहे. रुग्णांना योग्य आहार, हळद दूध दिल्यास कोविड-१९ हा तितका भयानक रोग नाही असा पल्लवीचा अनुभव आहे. सुरुवातीला वाटणारी भीती आता पूर्ण निघून गेली आहे, योग्य काळजी घेतल्यास डॉक्टर, नर्स, वॉर्ड बॉय संक्रमित होत नाहीत शिवाय हॉस्पिटलद्वारे प्रत्येक स्टाफची कोविड तपासणी केली जाते. औषधं दिली जातात. किट घालून काम केलेल्या नर्सला दुसऱ्या दिवशी सुट्टी दिली जाते. हॉस्पिटलद्वारे दिल्या जाणाऱ्या सुविधांमुळे हॉस्पिटलचा स्टाफ अजून कार्यक्षमपणे काम करत आहे. सुरुवातीला करोना वॉर्डमध्ये काम करताना भीती वाटली, पण शेवटी ही आपली माणसं आहेत, त्यांची देखभाल करणे, त्यांचं मनोबल वाढवणे हे माझं कर्तव्य आहे. शिवाय औषधासोबत मानसिक आरोग्य व्यवस्थित असल्यास रोगी लवकर बरा होतो असं पल्लवी सांगते.

– संतोष बोबडे, सातारा

Leave a Reply