365 देशी झाडांचं कॅलेंडर

कॅलेंडर म्हणलं की आपल्याला कालनिर्णय आठवतं, तसंच सुंदर गुळगुळीत कागदावर छापलेल्या निसर्गचित्रांच्या कॅलेंडरचाही मोह होतोच. पण याच कॅलेंडर आपल्या भारतातल्या संपन्न अश्या देशी झाडांचे आणि फुला- फळांचे फोटो, माहिती असं छापलं तर? हा विचार हर्षद तुळपुळे यांच्या मनात आला. पण आपल्यासारखे निसर्गप्रेमी किती असतील? ते खरंच असं कॅलेंडर विकत घेतील का? 1000 प्रती तरी खपतील का? असा विचार करत असताना, प्रत्यक्षात या कॅलेंडरच्या सुमारे 10 हजार प्रतींची ऑर्डर हर्षद तुळपुळेंना आली.

झाडांचे कॅलेंडर

 

 

हर्षद तुळपुळे. रत्नागिरीच्या राजापूर तालुक्यातील अणसुरे गावचा निसर्गप्रेमी आणि अभ्यासू युवक. बालपण गावात निसर्गातच फुललं, तर महाविद्यालयीन शिक्षण गोगटे जोगळेकर कॉलेजमध्ये. अर्थशास्त्रात त्यांनी एम ए केलं. लिखाणाची, पर्यावरणाची खूप आवड. त्यामुळेनंतर साप्ताहिक विवेक आणि मुंबई तरूण भारत या वर्तमानपत्रात पर्यावरण विषयावर काम करायला लागले. हळूहळू या क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळी, संस्था,पुस्तके यांच्याशी परिचय आणि अभ्यास वाढू लागला. नोकरीच्या निमित्ताने पुण्यात असताना पुण्याच्या इकॉलॉजिकल सोसायटीतून ‘शाश्वत विकास आणि नैसर्गिक स्त्रोत व्यवस्थापन’ हा एक वर्षाचा अभ्यासक्रमही हर्षद यांनी पूर्ण केला. त्याचसोबत पर्यावरण संदर्भात लिखाण, प्रत्यक्ष पर्यावरण संवर्धनाचं काम आणखी सिरियसली सुरू झालं.

 

पहिल्यापासूनच नोकरीत न अडकता पूर्णवेळ गावी राहण्याची ओढ होती. लॉकडाऊननं ती संधी दिली. हर्षद अणसुरेला परतले. पर्यावरणासंदर्भात काम करणाऱ्या वेगवेगळ्या संस्थांच्या प्रोजेक्टवर काम करायला सुरूवात केली. गेली अडीच वर्ष वेगवेगळ्या प्रोजेक्टवर काम करताना, पर्यावरणासाठी काम करणाऱ्या अनेकांच्या मुलाखती घेतल्या. त्यातील निवडक 25 मुलाखती एकत्र करून, 2020 साली ‘गप्पा निसर्गाच्या’ हे पुस्तक त्यांनी प्रकाशित केलं.

स्थानिक झाडांची माहिती घेताना हर्षद

 

हर्षदचा आणखी एक छंद म्हणजे गावात निसर्ग भ्रमंती करत असताना, ज्याची फारशी माहिती नाही अश्या झाडांचे फोटो काढणं, ते तज्ज्ञ व्यक्तीला पाठवून त्या झाडांची माहिती मिळवणं, त्यांच्या नोंदी संकलित करणं, हा अगदी आवडता छंद. हा छंद जोपासताना अश्या फोटोंचं कॅलेंडर करता येईल का? असा विचार हर्षद यांच्या मनात आला. मग पुढे तारखा आणि मागच्या पानावर झाडांची माहिती व फोटो अस 12 पानांचं कॅलेंडर करावं, असा विचार आला. पण तारखा उलटून मागची बाजू सहसा कुणी पाहत नाही, असं लक्षात आल्यावर, प्रत्येक तारखेला एका झाडाचा फोटो अशी 365 झाडं, असं 2022 सालाचं मागेपुढे सहा पानांचं जैवविविधता कॅलेंडर तयार केलं.

 

या कॅलेंडरमध्ये सगळी स्थानिक झाडं असून, जास्तीत जास्त झाडं रत्नागिरी परिसरातील आहेत. यासाठी काही अभ्यासकांनी स्वतःजवळील दुर्मिळ फोटोही पाठवले. छपाई खर्च, डिझाईन खर्च, वाहतूक खर्च पकडून कमीत कमी 60 रूपये प्रति कॅलेंडर, इतकी किंमत ठेवणं गरजेचं होतं. शिवाय कॅलेंडर कितपत विकलं जाईल ही शंकाच होती. सुरूवातीला 1000 प्रती खपतील असं हर्षदना वाटत होतं. मात्र त्यांच्या स्वत:च्या फेसबुक अकाऊंटवर त्यांनी याबाबतची पोस्ट टाकल्यावर लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. आणि चक्क 10 हजार प्रतींची ऑर्डर आली.

 

पुढील वर्षीसाठी आणखी सुंदर फोटो आणि काही नव्या झाडांसह हर्षद पुन्हा जैवविविधता कॅलेंडर तयार करणार आहे. त्यासाठी अजून दोन महिन्यांनी जोमाने कामाला लागणार आहेत.

हर्षद तुळपुळेंचं आणखी एक मह्त्त्वाचं काम म्हणजे https://ansurebmc.in/ ही अणसुरे गावाच्या जैवविविधतेबाबत तयार केलेली वेबसाईट. 2002 च्या जैवविविधता कायद्याच्या अंतर्गत प्रत्येक गावाने स्वतःची लोकजैवविविधता नोंदवही तयार करणं आवश्यक आहे. ज्यात गावाची पीक रचना, निसर्ग, संस्कृती अशी सगळी माहिती लिहावी लागते, हा एक प्रकारचा महत्त्वाचा दस्तऐवज तयार होतो. अणसुरेसाठी अशीच माहिती हर्षद यांनी संकलित करायला सुरूवात केली. मग झाडं, नदी, पीकपाणी अशी माहिती स्थानिकांना, जुन्या जाणत्या लोकांना विचारणे, ती पुन्हा पुन्हा तपासून घेणे असं काम वर्षभर चाललं. मात्र अशी नुसती वही न करता त्याची वेबसाईट करावी, ही कल्पना त्यांना सुचली. आनंदाची गोष्ट म्हणजे त्यांचे मित्र मंदार परांजपे यांनी कोणताही मोबदला न घेता ती वेबसाईट बनवून दिली. तज्ज्ञांकडून वेबसाईट तपासून घेतली. इतकं सुंदर काम महाराष्ट्रातील कुठल्याच गावात झालं नाहीए, असा शेरा देखील त्यांना मिळाला. नुकतंच 22 मे 2022 रोजी आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिनादिवशी या वेबसाइटचं उद्घाटन झालं. लोकजैवविविधता नोंदवहीची वेबसाईट तयार करून, हा ठेवा डिजिटली जपणारं, हर्षद यांचं ‘अणसुरे’ भारतातलं अग्रमानाचं गाव ठरलंय.

 

#जागतिक_पर्यावरणदिन

#विशेष_साप्ताहिक_पोस्ट

#निसर्गाशी_मैत्री_करू_पृथ्वीला_जपू

#रत्नागिरी

#Biodiversity

#जैवविविधता

#लोकजैवविविधता_वेबसाईट

#देशी_झाडांचे_कॅलेंडर

 

नवी उमेद कसं वाटतं तुम्हाला? तुमचा अभिप्राय, प्रतिसाद अवश्य लिहा. आणि वाचकहॊ, तुम्हीही नवी उमेदला आर्थिक मदत करा. त्यासाठी ही लिंक: https://naviumed.org/support/

 

संतोष बोबडे

Leave a Reply