या वाढदिवसाला ना पोस्टरबाजी, ना मेजवानी, ना डीजे, ना हारतुरे, ना अन्य कुठली भेटवस्तू.

राजकीय नेतेमंडळींच्या वाढदिवसाचा थाट आपल्या परिचयाचा असतो. पण आपल्या अनुयायांना विश्वासात घेत साधेपणे आणि त्यातही लोकहिताच्या कामाने वाढदिवस करणारे मोजकेही आहेत. नंदुरबार जिल्ह्यातल्या शहाद्याचे नगराध्यक्ष वनश्री मोतीलाल पाटील, हे या मोजक्यांपैकीच. त्यांचा वाढदिवस अलिकडेच झाला. या वाढदिवसाला ना पोस्टरबाजी, ना मेजवानी, ना डीजे, ना हारतुरे, ना अन्य कुठली भेटवस्तू. भेटायला येणाऱ्यांना जी एक भेटवस्तू घेऊन यायला सांगितलं होतं, तेवढीच फक्त. त्यासाठी सोशल मीडियाची मदत घेतली आणि अवघ्या काही क्षणात हा संदेश वाऱ्यासारखा मित्रपरिवार आणि समर्थकांमध्ये पसरला. पाटील यांना भेटण्यासाठी रांगा लागल्या होत्या. भेट म्हणून आणलेली वह्यापुस्तकं खोलीभर झाली होती. 


या भेट मिळालेल्या वह्यापुस्तकांमध्ये स्वतःची भर घालून शहरातल्या गोरगरीब मुलांना वाटण्याचा संकल्प पाटील यांनी केला. त्यानुसार शहादा नगरपालिका शाळेतल्या मुलांना दोनशेवर पुस्तक आणि एक हजारावर वह्या वाटण्यात आल्या आहेत. साधी राहणी, लोकांचा विचार करणारे , बुलेटवर फिरत सहज लोकांमध्ये वावरणारे पाटील लोकप्रिय नगराध्यक्ष आहेत. अशा प्रकारे वाढदिवस साजरा करण्याची संकल्पना नगरसेविका रिमा पवार यांनी मांडली . शुभेच्छारूपात मिळालेली ही वह्यापुस्तकं अनेक मुलांच्या जीवनात बदल घडवून आणणार आहेत.


मोतीलाल पाटील गेल्या दोन तपांपासून राजकारणात आहेत. नोव्हेंबर २०१६ मध्ये ते लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून निवडून आले. नगरपालिकेच्या कामात त्यांनी पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न केला आहे. कचऱ्याचा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न त्यांनी केला. लोकांचं आरोग्य चांगलं राहील यासाठीच्या योजना राबवण्यावर त्यांचा विशेष भर असतो. त्यांच्या नदीनांगरणीच्या प्रयोगातून शहाद्यामध्ये पाण्यावर चांगलं काम उभं राहिलं आहे. २००० साली त्यांनी केलेल्या या प्रयोगामुळे नांदरखेडयाजवळून वाहणाऱ्या गोमाई नदीला जीवदान मिळालं होतं. १९७० मध्ये एमएससी (कृषी) झालेल्या पाटील यांनी शेती, कृषीपर्यटन, सहकार क्षेत्रात ठसा उमटवला आहे.