अ फ्यु गुड मेन
मार्च 2021. कोविड19 ची दुसरी लाट. या लाटेने अनेक कुटुंबांची वाताहत झाली. कुणाला दवाखाना मिळेना, कुणाला ऑक्सिजन असलेले बेड, कुणाला व्हेंन्टीलेटर, कुणाला रेमडेसिवीर तर कुणाला प्लाझ्मा मिळत नव्हता. विक्रांत मते, विनोद धनपाल शहा, दिनेश शेजपाल, मनोज टिबरेवाल, उद्योजक श्रीरंग सारडा, बांधकाम व्यावसायिक ललित रुंगठा, बांधकाम व्यावसायिक सुजॉय गुप्ता हा मित्रांचा ग्रुप हे सगळं बघत होता. त्यातूनच गरजू लोकांसाठी काही करता येईल का हा विचार सुरू झाला. ‘ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर बँक’ सुरू करावी ही कल्पना त्यातून पुढे आली. हे मित्र आर्थिक दृष्ट्या सक्षम, सामजिक दृष्ट्या संवेदनशील होते. पूर्वीपासून आपापल्या स्तरावर सामाजिक कामं करत होते. त्यामुळे त्यांना एकत्र येत उपक्रम सुरु करायला फारसा वेळ लागला नाही. जवळपास १५ ते २० जणांच्या या ग्रुपमधील सदस्यांनी मिळेल तिथून जमतील तितके ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर विकत घेतले. दोन दिवसात ६५ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर त्यांच्या बँकेत जमा झाले. आणि ‘अ फ्यु गुड मेन’ या नावाने उपक्रमास सुरुवात झाली.
नाशिक शहरातील डॉ. अतुल वडगावकर, डॉ. कुणाल गुप्ते, डॉ. आनंद सराफ या डॉक्टर मंडळीना ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर बँकेची कल्पना दिली गेली. गरजू रुग्णाचा पत्ता तसंच संपर्क क्रमांक देण्याची विनंतीही केली गेली. त्या रुग्णांना तत्काळ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर घरपोच उपलब्ध करून देण्यात आले. यासाठी कुठलंही शुल्क या बॅंकेने आकारले नाही. मार्चपासून आजपर्यंत २०० हून अधिक रुग्णांना त्याचा फायदा झाला. ते घरच्या घरी करोनावर मात करू शकले. डॉक्टरांच्या शिफारसी खेरीज इतर कुणालाही वैयक्तिक रित्या ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर द्यायचा नाही हे आधीच ठरलं होतं. त्याचंही काटेकोर पालन झालं. कारण वैद्यकीय दृष्ट्या रुग्ण वा इतर कुणापेक्षा डॉक्टरच रुग्णाला घरी ठेवायचं की दवाखान्यात याचा निर्णय देऊ शकतात.
आता कोविड पेशंट कमी झाल्याने मागणी कमी झाली आहे. सध्या केवळ १६ रुग्णांच्या घरी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर दिलेले आहेत. प्रत्येक रुग्णांना साधारणत: सात दिवसांसाठी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर वापरायला दिला जातो. तो वापरण्याची पद्धत सांगितली जाते. काय काळजी घ्यायची त्याच्या सूचना दिल्या जातात. या उपक्रमाचा उपयोग झालेल्या रुग्णांनी आणि डॉक्टरांनी वेळेवर मिळालेल्या या मदतीचं भरभरून कौतुक केलं. या ग्रुपने आपण करोना प्रकोपाच्या काळात रुग्णांना मदत करू शकलो, समाजाचं ऋण फेडू शकलो याबद्दल समाधान व्यक्त केलं.
– भाग्यश्री मुळे, नाशिक

Leave a Reply