गडचिरोलीचे युवा सेलिब्रेटी – आदिवासींच्या विकासासाठी झपाटून काम करणारा रवी

आदिवासींच्या विकासासाठी झपाटून काम करणारा रवी

‘अरततोंडी (जि.गडचिरोली) ग्रामसभेच्या कार्यक्षेत्रात माझं काम सुरु होतं. तिथे एक दहा वर्षांचा मुलगा रोज ग्रामपंचायत कार्यालयाच्या बाहेर मला बसलेला दिसायचा.  उत्सुकतेपोटी मी तिथल्या एका व्यक्तीला हा मुलगा कोण? इथे का बसतो? असे विचारलं. त्यानं सांगितले, ““तो मतीमंद, मूकबधीर आहे. शाळेत न जाता दोन वर्षांपासून घरीच आहे.’’ हे उत्तर ऐकून मी मुलाच्या पालकांकडे चौकशी केली. तेव्हा काही कागदपत्रांच्या त्रुटीमुळे प्रवेश मिळाला नसल्याचं समजलं. मी एका आश्रमशाळेत पाठपुरावा केला आणि या चिमुकल्याला शाळेत प्रवेश मिळाला. जेव्हा मी त्याला शाळेत भेटायला गेलो, तेव्हा हा मुलगा पळत येऊन मला बिलगला. हा आनंद खरचं अवर्णनीय होता. त्याची सर कशालाच येणार नाही.’  रवी सांगत होता. हा युवक सांगत होता.

गडचिरोली जिल्ह्यातील चिंचलपेठ या छोट्याशा गावातील रवींद्र चुनारकर. शेतकरी कुटुंबातला. घरी आई, वडील आणि एक भाऊ.  असा परिवार. रवींद्रचं प्राथमिक शिक्षण  गावातील जिल्हा परिषद शाळेत तर माध्यमिक शिक्षण कर्मवीर विद्यालय, चंद्रपूर जिल्ह्यात बल्लारपूर इथे झालं. राजुरा इथे बारावी उत्तीर्ण केल्यानंतर रवीने चंद्रपूरच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात इन्स्ट्रुमेंटेशन शाखेत प्रवेश घेतला. वैद्यकीय क्षेत्रात जायचं होतं. परंतु घरची आर्थिक स्थिती फार ठीक नव्हती. नाईलाजाने अभियांत्रिकीला आलेल्या रवीचं अभ्यासात मन लागेना. परिणामी सलग दोन वर्षे काही विषयांत तो पास होऊ शकला नाही. रवीच्या मनात मोठे मानसिक आंदोलन सुरु होतं. काय करायचं कळतं नव्हतं.

इंजिनिअरिंगच्या तिसर्‍या वर्षात असताना सर्च संस्थेच्यात ‘निर्माण’ शिबिरात रवींद्रने भाग घेतला. या शिबिरात अनेक व्यक्ती भे्टल्या. प्रत्येकाच्या अनुभवांतून काही ना काही मिळत होतं. या शिबिरातून एक ऊर्जा मिळाली. परतल्यानंतर रवीने आता अभ्यासाकडेही मन लावून लक्ष दिलं.  नापास झालेल्या विषयांत तो पास झाला.  शिवाय  त्याने प्रथम क्रमांक पटकावला. २०१६ मध्ये लॉयल्स मेटल्स या कंपनीत त्याने इंटर्नशीप केली. हे काम त्याला नीरस वाटलं. यातून, आपल्याला काय  करायचं नाही,  हे रवीला उमजलं. काय करायचं आहे, यावर मात्र त्याचा विचार सुरुचं होतां.  ‘निर्माण’च्या  अनुभव शिदोरीतून त्याने सामाजिक क्षेत्रात काम करण्याचे ठरवलं. मात्र द्विधा मनस्थिती इथेही होतीचं.

याच काळात त्यानं ‘सर्च करके देखो’ ही फेलोशिप घेतली. वयम‌‌् या संस्थेच्या माध्यमातून त्याने पालघर जिल्ह्यातील जव्हार, विक्रमगड, मोखाडा अशा तीन तालुक्यात मुलांचं शिक्षण आणि आदिवासींचे हक्क या विषयावर काम केलं. समाजात राहून काम करायला रवीला आवडू लागलं. आपल्या कामामुळे लोकांच्या जीवनात बदल घडून येतो याची जाणीव झाली.  इथेच त्याला उमजलं, हेच ते क्षेत्र आहे, जिथे आपण टिकू शकतो. या कामाने त्याच्या जीवनाला दिशा मिळाली.

हे काम सुरु असतानाच एप्रिल २०१७ मध्ये महाराष्ट्र ग्रामीण सामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत ‘सीएम रूरल डेव्हलपमेंट फेलो’ म्हणून तो निवडला गेला. एकूण ९६ मुलं राज्यातून निवडण्यात आली होती. यात २३ वर्षांचा रवी सर्वात लहान. या अभियानांतर्गत रवीवर ‘होलिस्टिक डेव्हलपमेंट’ हा विषय सोपवण्यात आला. कुरखेडा तालुक्यातील अरकतोंडी ग्रामपंचायतीत तीन वर्षे त्याने काम केलं. बेसलाईन डेटा गोळा करण्यापासून ते ग्रामपंचायतीच्या विकास आराखड्याची आखणी. आणि पुढे आराखड्य़ाची  अंमलबजावणी करणं आदी कामे तो करत होता. ग्रामस्थांचीही साथ मिळाली. यातून या गावाला स्मार्ट व्हिलेज पारितोषिक प्राप्त झालं. यासोबतच संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानातही विभागीय स्तरापर्यंत गावाने मजल मारली.  मुळात काम आवडत असल्याने रवीने झोकून दिलं होतं.  ‘हे काम प्रचंड ऊर्जा देणारं होतं. आपण करत असलेल्या कामामुळे झालेले बदल जेव्हा दिसतात ना, तेव्हा अजून मजा येते. हे काम करत राहावसं वाटतं’,  रवी सांगतो.

प्रत्येक २६ जानेवारीला अरततोंडी ग्रामपंचायतीत सांस्कृतिक, सामाजिक उपक्रमांचा मोठा इव्हेंट होतो, लोक एकत्र येतात, माहिती, ज्ञान, कला, संस्कृतीचं आदान-प्रदान इथे होतं. त्याची सुरुवात रवीने केली.  २०१९ मध्ये सीएम फेलोशीप कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत दीक्षांत सोहळा होता. याच दिवशी अरततोंडी इथे प्रजासत्ताक दिनाचा हा इव्हेंटही होता. आता मुंबईला जायचं की गावात लोकांसोबत कार्यक्रमात सहभागी व्हायचं,  असा प्रश्न रवीसमोर आला. गावात, लोकांत रमणाऱ्या रवीने मुंबईचा कार्यक्रम सोडून गावातल्य कार्यक्रमास प्राधान्य दिलं. आपण सुरु केलेल्या कार्यक्रमाला आपणच महत्व दिले नाही तर त्यात खंड पडेल, असं त्याला वाटलं.  पुढे रवीने ते गाव सोडलं. तरीही,  ग्रामस्थांनी हा कार्यक्रम सुरु ठेवला आहे. आणि हा कार्यक्रम सुरु केल्याबद्दल रवीचा या वर्षी विशेष सत्कारही केला.

सीएम फेलोशीप पूर्ण झाल्यानंतर रवीने गडचिरोली जिल्ह्यात वनक्षेत्रविषय्क काम करण्या्चं निश्चित केलं. माहितीच्या अधिकाराचा वापर करत वनक्षेत्र, वनउपज आणि संबंधित माहिती संकलित केली. एकूण अभ्यासानंतर त्यानं कोरचीला काम करण्याचं ठरवलं. कोरचीत सामूहिक वनहक्काचं काम सुरूच होतं. काही महिने त्याने ‘आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ या संस्थेसोबत महाग्रामसभेची रचना पाहणं, ग्रामसभांच्या कामाचं निरीक्षण, बेसलाईन सर्वे करणंही कामं केली. तीन महिन्यानंतर गीतांजय साहु यांच्या मार्गदर्शनाखाली टाटा समाजविज्ञान संस्थेची फेलोशिप रवीला मिळाली. सामूहिक वनहक्क मिळाल्यानंतर गावांच्या स्थितीत काय परिवर्तन झालं याची पाहणी रवीने केली. वनहक्कपूर्व स्थिती आणि नंतरचे बदल याचं विश्लेषण केलं. वनहक्क मिळालेल्या ८७ गावांत त्याने काम केलं.

यासाठी २५ निकष ठरवले होते. वनहक्काचे दावे मंजुर झालेल्या  ग्रामसभेत मीटिंग होतात का? महिला येतात का? दावा केल्यापैकी किती वनक्षेत्र गावाला मिळालं? महिलांचे प्रमाण समित्यांत किती आहे? यासोबतच वनहक्क मिळालेल्या देशातील पहिल्या गावात, मेंढा (लेखा) इथे भेट देऊन १०४ कुटुंबांच्या घरी जाऊन पाहाणी केली. नोव्हेंबर २०२१ मध्ये  टाटा समाजविज्ञान संस्थेची फेलाशीप संपल्यानंतर रवीला इंडियन स्कूल ऑफ बिझनेसमध्ये भारती इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक पॉलिसी डिपार्टमेंट फॉरेस्ट गव्हर्नन्स या प्रकल्पात विशेषज्ञ म्हणून संधी मिळाली. जंगलात मैलोनमैल फिरून रवीने वनक्षेत्राचं सीमांकन करण्याचं काम केलं. आताची पिढी जी मोबाईल, इंटरनेट, सोशल मिडीयाशिवाय एक क्षणही काढू शकत नाही, तिथे रवी हा मोबाईल रेंज नसलेल्या भागात लोकांशी भेटीगाठी घेत फिरत असतो.  लोकांची रखडलेली कामं मार्गी लावणं, गावविकासाच्या प्रक्रियेत त्यांना सहभागी करून घेणं, यातच तो रमतो.

या प्रकल्पाचे काम हे ७२ गावांसाठी असून आतापर्यंत २० गावांची पाहणी आणि संसाधन उपलब्धीची नोंद करण्यात आलेली आहे. या माहितीचा उपयोग गावाचा नियोजन आराखडा बनवताना झाला. येणाऱ्या काळात हिरडा, बेहडा, मोह, चारोळी, बांबू व इतरही वन उत्पादनांना चांगली बाजारपेठ मिळवून देण्याच्या दृष्टीनेही रवी अभ्यास करतोय. वन उत्पादनांच्या उपयुक्ततेबाबत बोलताना रवी सांगतो, ‘तरोटा नावाची एक वनस्पती कुरखेडा, कोरची या भागात मोठ्या प्रमाणात असते. इथले लोक ती फेकून द्यायचे. परंतु, आम्ही संशोधन केल्यानंतर छत्तीसगडमध्ये या तरोट्यापासून साबण बनवला जात असल्याचं दिसलं. कच्चा माल म्हणून तरोट्याला दरही चांगला आहे. हे फक्त एक उदाहरण झालं. असंच  अनेक वन उत्पादनांबाबत आहे. त्यामुळे माहिती संकलन, मार्केट लिंकेजेस, संस्थात्मक बांधणी अशा गोष्टींवर अधिक काम करायचं आहे. याचा फायदा आगामी काळात इथल्या आदिवासी बहिणी-भावांना होईल. इथला शाश्वत विकास हे माझं ध्येय आहे”, रवी सांगतो.

  • अनंत वैद्य

Leave a Reply