आमची एक पणती तुमच्या अंगणात लागावी
दिवाळी म्हणलं की डोळ्यासमोर उभी राहते ती- लखलख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया!! आणि त्यातल्या झळाळणाऱ्या कोट्यवधी ज्योतींना प्राणपणाने जपणारी- पणती!! कोरोनाकाळानंतर आलेल्या या दीपवाळीत हजारो प्रकारचे रंगीबेरंगी दिवे आणि पणत्या बाजारात उपलब्ध झालेल्या आहेत. सध्या बीडमधल्या गेवराईत मात्र लक्ष वेधून घेत आहेत- ते सहारा अनाथालयाच्या बालग्राम परिवारातील मुला-मुलींनी रंगविलेले आकर्षक दिवे.
गेवराई येथील बालग्राम परिवारातील १२७ मुलांनी आपापलं शाळा- महाविद्यालय आणि अभ्यास सांभाळून यंदा दिवाळीकरिता सात हजार दिव्यांची रंगरंगोटी करून आकर्षक पणत्या तयार केल्या आहेत. या परिवारातील विद्यार्थ्याने सुंदर सजावट केलेल्या या पणत्या प्रत्येक गेवराईकरांच्या अंगणात लागाव्यात, अशी या मुलांची इच्छा आहे आहे. अल्पदरात विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या या पणत्यांच्या विक्रीद्वारे येणाऱ्या पैशांतून सहारा अनाथालयातील मुलांची यंदाची दिवाळी गोड होणार आहे.
पणत्या रंगविण्यात रममाण झालेली चिमुकली
दिवाळीत जसं प्रकाशाचं महत्व आहे, तसंच तो प्रकट करणाऱ्या दिव्यांनाही तेवढेच महत्व आहे. दिव्यांना प्रकाशाचं प्रतिक मानलं जातं. दिव्याची ज्योत आपल्याला जीवनात नेहमी काहीतरी करत राहण्याची प्रेरणा देते. दिव्याची ज्योत आपल्याला या समाजाप्रती असलेली आपली जबाबदारी दर्शविते. स्वतःला जळतांना कितीही त्रास झाला तरी, इतरांना त्यांच्या अंधारमय जीवनातून प्रकाशाकडे न्यावे, अशी प्रेरणा ही ज्योत आपल्याला देते. अगदी अशीच प्रेरणा गेवराई शहरातील गोवंदवाडी, खंडोबा डोंगर रोड येथे असणाऱ्या सहारा अनाथालय म्हणजेच बालग्राम परिवारातील मुलांनी दिली आहे.
गेवराईत २००४ साली सुरू झालेल्या या प्रकल्पात सध्या १२७ मुलंमुली आहेत. गेल्या वर्षी या प्रकल्पातील विद्यार्थ्यांनी दिवाळीच्या निमित्ताने साडेतीन हजार दिवे तयार केले होते. त्यात प्रामुख्याने पणत्या, लक्ष्मीच्या मूर्ती, नारळ दिवे, अशा विविध आकर्षक गोष्टींचा समावेश होता. कागदापासून ५५ आकाश दिवेही त्यांनी तयार केले होते. मागील वर्षी बाजारात दिव्यांची अल्पदरात विक्री करून आलेल्या 23 हजार रूपयांत या प्रकल्पाची दिवाळी गोड झाली होती. यंदा बालग्राम परिवारातील आठवी ते बारावीत शिक्षण घेणाऱ्या १२७ मुला- मुलींनी गेल्या महिनाभरात आपापलं शाळा- महाविद्यालय आणि अभ्यास सांभाळुन तब्बल सात हजार दिव्यांची रंगरंगोटी व सजावट केली आहे.
बालग्रामच्या मुलांनी रंगविलेल्या सुंदर पणत्या
बालग्राम प्रकल्पाने यंदा बीड शहरातील गणपती कारखान्यातून कच्च्या मालाची खरेदी केली. खरेदी केलेल्या प्लेन पणत्या प्रकल्पात आणल्यांनतर मुलामुलींनी त्या पणत्यांना आकर्षक रंगात रंगवून देखणी सजावट केलीये. याकरिता विद्यार्थ्यांना बालग्रामचे प्रकल्प संचालक संतोष गर्जे, प्रिती गर्जे, केअर टेकर नंदा पौळ, मोनिका गर्जे, सुवर्णा भालेराव यांनी मार्गदर्शन करत, मुलांकडून दिवे तयार करून घेतले आहेत. पणत्यांबरोबरच प्रकल्पातील मुलांनी यंदा कागदापासून १५० पर्यावरणपूरक आकाशदिवे तयार केले असून, बालग्राममधील खोल्या, किचन, डायनिंग हॉल असे सर्वत्र हे आकाश दिवे लावून बालग्राम सजणार आहे. मात्र हे आकाशकंदिल यंदा विक्रीसाठी उपलब्ध नाहीत.
बालग्राम परिवारातील बालकांच्या कलाकौशल्यातुन तयार झालेल्या या पणत्या बीडच्या गेवराई शहरातील शास्त्री चौक, पंचायत समिती चौक परिसरात नागरिकांसाठी अल्पदरात विक्रीकरिता ठेवलेले आहेत. दिव्यांच्या विक्रीतून बालग्राममधील मुलांना दिवाळी निमित्त फराळ, कपडे तसेच त्यांचा आवश्यक शैक्षणिक खर्च भागविण्याचा प्रयत्न आहे. “या कामातून मुलांना कलाकुसरीचा आणि नवनिर्मितीचा आनंद मिळतो, तर विक्रीतून त्यांना हिशोब कसा करावा, लोकांशी कसं बोलावं, स्वभाव कसे असतात हे व्यवहारज्ञान मिळतं. दिवाळीचा हा उत्सव तुमच्या आमच्या नात्यांचा असून, आमची एक पणती आपल्याही अंगणात लागावी हीच आमची इच्छा आहे,” असे बालग्राम प्रकल्पाचे संचालक संतोष गर्जे यांनी सांगितले.
लेखन- दिनेश लिंबेकर, बीड

Leave a Reply