चंद्रपूर जिल्ह्यातल्या चिमूर तालुक्यातलं आमडी (बेगडे) नावाचं गाव. पाचेकशे लोकसंख्येचं, शेती हा मुख्य व्यवसाय असलेलं हे छोटंसं गाव. या गावातल्या अंगणवाडीत सप्टेंबर 2021 मध्ये दोन-तीन वेळा एक विचित्र प्रकार घडला. अंगणवाडीच्या समोर रात्रीतून हळद- कुंकू लावलेली लिंबं, उतारे येऊन पडायला लागले. हा विचित्र करणीसदृश प्रकार बघून गावकरी अस्वस्थ झाले. अनेक जण तर इतके घाबरले की सध्या अंगणवाडीतून लहान मुलं आणि गर्भवती, स्तनदा मातांना मिळणारा कोरडा शिधा (गहू, डाळी, तेल, साखर इ.) नेण्यास त्यांनी चक्क नकार दिला.
इथं अंगणवाडी ताई असलेल्या सरिता गोरवे हे सगळं पाहून हैराण झाल्या. लहान लेकरांसाठी आणि गर्भवती महिलांसाठी आवश्यक असणारा पोषक आहारच, त्यांना केवळ भीतीपोटी मिळत नाहीए, हा मुद्दा त्यांना फार अस्वस्थ करत होता. त्यांनी लोकांना ही अंधश्रद्धा आहे, घाबरायचं कारण नाही हे समजावण्याचा प्रयत्न केला, पण लोक काही अंगणवाडीत यायला तयार होईनात. तिसऱ्यांदा जेव्हा अंगणवाडीच्या अंगणात ही हळद- कुंकू लावलेली लिंबं येऊन पडली तेव्हा मात्र सरिताताईंनी मुळावरच घाव घालायचं ठरवलं.
“करणी, मंतरलेली लिंबं वगैरे काही नसतं. हे फक्त लेकरांना आणि त्यांच्या मायबापाला घाबरवायचे प्रकार आहेत. आता या लिंबांचा मीच नायनाट करते, काय होणारच असेल ते मला होऊ देत,” असं म्हणत सरिताताईंनी चक्क ती लिंबं जाळूनच टाकली. सरिताताईंच्या धाडसाला गावकऱ्यांनीही दाद दिली आणि दुसऱ्या दिवशीपासून हळूहळू का होईना, पालक पोषणआहार घ्यायला अंगणवाडीत यायला लागले.
या सगळ्याबद्दल सरिताताई म्हणाल्या, “हे बघा ताई, हे असलं करणी, बाधा वगैरे काही नसतं, लोकांना उल्लू बनवण्याचे आणि घाबरवायचे प्रकार आहेत फक्त. हे मला माहितीए. केवळ या कारणांनी लेकरांच्या पोटात त्यांच्या हक्काचा पोषण आहार पडेना, गावात भीतीचं वातावरण पसरलं म्हणून मी ती लिंबं जाळून टाकली. म्हणलं काय होणार असेल ते मला होऊ द्या! काही होणार नव्हतंच, कारण ती साधीच तर लिंबं होती आणि ही अंधश्रद्धा आहे, ते मला माहीत होतं.”
“मी काय फार शिकलेली नाही बगा ताई, फक्त सातवी झाले होते. मग लग्न झालं, संसार सुरू झाला. अंगणवाडीत मदतनीस म्हणून 2009 पासून काम करतेय. 2020 पासून अंगणवाडी ताई म्हणून प्रमोशन झालं. आता यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून पदवीचा अभ्यासक्रम पूर्ण करतेय. माझ्या मिस्टरांचा विलास गोरवेंचा मला खूप पाठिंबा आहे, ते ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत होते. पण दुर्दैवाने काही वर्षांपूर्वी ते अपंग झाले. माझ्या दोन मुलीही कॉलेजात शिक्षण घेत आहेत. मला अंगणवाडीचं काम आवडतं. लेकरांचं आणि त्यांच्या आयांचं आरोग्य चांगलं ठेवण्यात आपण उपयोगी पडतोय, याचं समाधान आहे.”
“बाकी अंधश्रद्धांचं म्हणाल तर असं लिंबू फेकून, मंत्र तंत्र करून दुसऱ्याचं वाईट करता आलं असतं, तर जगात चाकू-सुरे आणि बंदुका कशाला लागल्या असत्या? थोडा नीट विचार केला की मिळतंच उत्तर.” छोट्या गावात राहूनही असा विचार जोपासणाऱ्या सरिताताई गोरवेंसारख्या अंगणवाडी ताई आपल्या समाजाची ताकद आहेत.
– स्नेहल बनसोडे- शेलुडकर, पुणे
Related