खणखणीत ‘टाळी’ – आम्ही तृतीय हे ठरवणारे तुम्ही कोण?

आम्ही तृतीय हे ठरवणारे तुम्ही कोण?

तृतीयपंथीय समाजाबाबत जसजसं वाचत, ऐकत गेले तसतसं जाणवत गेलं की हा समाज उच्चशिक्षित होऊन नोकरी- व्यवसायाचा तर प्रयत्न करतोच आहे पण त्याचसोबत सामाजिक- राजकीयदृष्ट्या अधिकाधिक प्रगल्भ होत चाललाय. त्यातल्याच काही मोजक्या प्रभावी व्यक्तिमत्त्वांबद्दल थोडक्यात लिहिण्याचा प्रयत्न करतेय. यातली पहिलीच व्यक्ती आहे गौरी सावंत, ज्यांच्या आयुष्यावर एक वेब सिरीज येऊ घातलीय-‘ ताली’ आणि त्यात गौरीची भूमिका करतेय- सुश्मिता सेन. तुम्ही सुश्मिताचे गौरी सावंतसोबतचे फोटो, त्यांच्या विचारांनी भारावून जाऊन सुश्मिता यांनी केलेल्या इन्स्टाग्राम, ट्विटर पोस्ट नक्की पाहिल्या असतील. तर ही गौरी म्हणजेच पुण्यात पोलिस अधिकाऱ्यांच्या कुटुंबात जन्मलेला- गणेश नंदन. लहानपणीपासूनच गौरीला मुलींसोबत खेळायला, तसंच वागायला आवडायचं. आधी मुलगा- मुलगा म्हणून वडिलांनी खूप लाड केले, पण गणेशच्या वयाच्या सातव्या वर्षी त्याची आई गेली आणि जगच पालटलं. कारण गणेशला आपण वेगळे आहोत याची जाणीव व्हायला लागलेली. तशातच एक दिवस चतुश्रुंगीच्या जत्रेत फिरणारं चक्र हाती घेऊन, स्वत:ला देवी समजून रममाण झालेला गणेश दिसला आणि वडिलांची एक सणसणीत लाथ त्याच्या पार्श्वभागावर पडली. त्या दिवसापासून आईवेगळ्या गणेशचा घरापासून दूर मुंबईत येऊन प्रवास सुरू झाला- स्वशोधाचा- गौरी बनण्याचा!

या सगळ्यात सुरूवातीला गुरू मिळवणं, सिग्नलवर साडी नेसून भीक मागणं हे सगळे प्रकार त्यांनी केले. पण गौरी यांच्या लवकरच लक्षात आलं आपला जन्म केवळ भिक्षा मागण्यासाठी झालेला नाही, समाजाच्या व्यथा दिसत असताना आपण गप्प बसू शकत नाही. आणि मग त्यातूनच आकाराला आली- सखी : चारचौघी ही त्यांची संस्था. या संस्थेत त्यांच्याकडे सुमारे 172 तृतीयपंथीय आरोग्यसेवक स्वरूपाचं काम करतात. प्रामुख्याने तृतीयपंथीय समाजात आणि मुंबईच्या वेश्यावस्तीत त्यांचं काम चालतं. ज्यात एचआयव्ही एडस बाबत जनजागृती, कंडोम वाटप, लैंगिक आजारांचं टेस्टिंग आणि औषधवाटप करतात. गौरी म्हणतात “हे काम करताना माझ्या लक्षात आलं की, सेक्स वर्कर महिलांची परिस्थिती आम्हा तृतीयपंथियांपेक्षा वाईट आहे, खरंतर त्या अगदी खरीखुरी बाई असूनसुद्धा!! एका एचआयव्ही बाधित सेक्स वर्करचा मृत्यू झाल्यानंतर तिच्या मुलीला- गायत्रीला मी दत्तक घेतलं तेव्हा लोकांना खरं वाटत नव्हतं- मी म्हणजेच एक हिजडा सुद्धा आई बनू शकतो. लोक वाट्टेल ते बोलायचे- कुणी म्हणायचं- “हा तर हिजडा आहे, या पोरीला विकून टाकेल”, कुणी म्हणालं “ही स्वत:च्या म्हातारपणीची सोय करतेय,” पण मलासुद्धा आई होण्याची तहान असेल असं कुणालाही वाटलं नाही.”

गौरी सावंत पुढे सांगत होत्या ” गायत्रीचा जेव्हा शाळेत प्रवेश घ्यायला गेलो तेव्हा शाळेच्या व्यवस्थापनाने मला तासभर आतच घेतलं नाही. ‘तुम्ही कोण? तुम्ही कश्या काय पालक असाल हिच्या?’ त्या वेळेला गायत्री म्हणाली ही आई- अम्मा आहे माझी!! तरीसुद्धा तिथल्या लोकांचा एकच आग्रह “गायत्री ही मुलगी आहे, गायत्री हिजडा नाही, तुम्हांला आम्ही पालक म्हणून परवानगी देऊ शकत नाही, कुणीतरी नॉर्मल माणूस हिचा पालक म्हणून घेऊन या, मग आम्ही तिला शाळेत प्रवेश देऊ.” त्यानंतर माझा संताप- संताप झाला आणि मी सुप्रीम कोर्टात गेले आणि ‘नाल्सा’अंतर्गत तृतीयपंथियांना कायदेशीररित्या मूल दत्तक घेण्याचा अधिकार मिळावा अशी केस 2014 मध्ये फाईल केली. ही केस आम्ही जिंकली कारण- डॉ. आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानानुसार त्यांनी ‘I the Indian Citizen’ यात कुठंच स्त्री नागरिक -पुरूष नागरिक असं लिहिलेलं नव्हतं, या एका गोष्टीवर आम्ही जिंकलो आहोत आणि 2014 पासून आम्हांला तृतीयपंथीय म्हणून कायदेशीर ओळख आणि काही अधिकार मिळाले. त्यानुसार आमचं वय 9 वर्षांचंच आहे, भारत स्वतंत्र झाल्यापासून 76 वर्षांचा झालाय, आम्हांला तुमच्या गतीशी मॅच करून धावायचं आहे.”

गौरी सावंत यांच्या संस्थेतर्फे ‘आजीचं घर’ हा आगळा प्रकल्प राबवला जातो, ज्यात म्हातारे तृतीयपंथीय सेक्स वर्करच्या मुलांमुलींना सांभाळतात. स्वत: कुटुंबाच्या प्रेमाला पारखे झालेले तृतीयपंथीय, या मुलांना आपल्या नातवंडांप्रमाणे खूप मायेने सांभाळतात. भारतातलं या प्रकारचं हे एकमेव डे केअर सेंटर असावं. या प्रकल्पासाठी गौरी सावंत ‘कौन बनेगा करोडपती’ कार्यक्रमातही सहभागी झाल्या होत्या. गौरी म्हणतात, “आपल्याकडे तृतीयपंथीय म्हणजे काही तरी विकृती मानली जाते, मुलांच्या मनात त्यांची भीती निर्माण केली जाते. मी तर म्हणते एखाद्या लहान मुलांच्या नर्सरीत आया म्हणून, सेविका किंवा अंगणवाडी ताई म्हणून तृतीयपंथियांना संधी का मिळत नाही? ते मुलांसोबत राहतील, पालकांचा हात सोडून मुलं आत येतात तेव्हा त्यांना कळेल, अश्याही काकू- मावश्या, शिक्षिका असतात, ज्यांना थोडी-थोडी दाढी, मिश्या आहेत, आवाज जरा वेगळा आहे, पण ते खूप मायाळू आहेत. असे बदल हळूहळू करावे लागतील. तुम्ही आदर आणि प्रेम द्यायला शिका, आम्हांला आमच्या या वेगळ्या ओळखीसह स्वीकारा, आम्हांला शिक्षणाची- रोजगाराची संधी द्या, आमचा आत्मसन्मान जपा आणखी वेगळं काही मागणंच नाही.”

आत्मबळावर ठाम उभं असलेलं असंच दुसरं व्यक्तिमत्त्व म्हणजे- दिशा पिंकी शेख. आयुष्याची 20 वर्षे पुरूष म्हणून काढल्यावर जेव्हा आपल्या स्त्री असण्याची जाणीव त्यांना झाली तेव्हा आयुष्य 360 अंशात बदललं. तारूण्याच्या बदलत्या भावनांनुसार त्यासुद्धा एका पुरूषाच्या प्रेमात पडल्या, पण या तृतीयपंथियासोबत आयुष्य काढायला जेव्हा तत्कालीन प्रियकराने ठाम नकार दिला, त्या दिवसापासून ‘मी बदलले’ असं त्या म्हणतात. दिशा सांगतात, “ब्रेकअप झालं आणि मी विचार करायला सुरूवात केली, सुरूवातीला त्याला खूप शिव्या- शाप दिले, रडले मग लक्षात आलं की खरंच माझा एकेकाळाचा बॉयफ्रेंड मला सोडून गेला, याला तो जबाबदार आहे का? खरंच? विचार करताना लक्षात आलं, नाही तो नाही- इथला समाज जास्त जबाबदार आहे या सगळ्यासाठी, समाज ठरवतो- कुणी कसं राहायचं, काय खायचं प्यायचं?, कुणी कुणासोबत नातं जोडायचं? मग मला जाणवलं एखाद्या बाईने जर चांगलं धैर्याचं काम केलं तर तिला फेटा बांधतात, हाती तलवार देतात- ‘मर्दानी’ म्हणून सत्कार करतात, पण एखादा पुरूष जर संवेदनशील, प्रेमानं वागला तर त्याचा कोणी साडी- चोळी देऊन सत्कार करेल का? उलट तो त्या पुरूषाला ही अपमान वाटेल, त्यामुळे महिलेने पुरूषी गुण दाखवणं कदाचित Upgraded version आहे, पण पुरूषाने महिलेचे गुण दाखवणं इथं Downgraded चं समजलं जातं.”

दिशा शेख मग वेड्यासारखं वाचायला लागल्या. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं, इथल्या साहित्यात तृतीयपंथियांच्या व्यथाच नाहीत, कसलंच प्रतिबिंब नाही, “आमच्या भावना, आमची नाती नाहीत हे लक्षात आलं माझ्या, आणि डिप्रेशन आणखी वाढलं. मग मी माझं बंद पडलेलं फेसबुक अकाउंट चालू केलं आणि ‘शब्दवेडी दिशा’ या नावानं माझ्या भावभावना मांडायला सुरूवात केली. यातून माझ्या कविता, लिखाण लोकांना आवडायला लागलं आणि ‘कवयित्री दिशा पिंकी शेख’ ही नवी ओळख मला लाभली. अहमदनगरचेच कवी सुदाम राठोड यांनी मला त्यांच्या वाड्.मय मंडळाच्या उद्घाटनाला बोलावलं तेव्हा हे काय भलतंच? माझा काय संबंध साहित्याशी असं वाटलं, तेव्हा त्यांनी मला समजावलं की तुम्ही मराठी लोकसाहित्यात साहित्याचा, वंचितांच्या जगण्याचा एक नवा प्रवाह सुरू केला आहात, त्यामुळे तुम्ही या उद्घाटनासाठी योग्य व्यक्ती आहात.”

दिशा शेख तेव्हापासून या नव्या ओळखीचं आणि जबाबदारीचं भान राखून आहेत. ‘कुरूप’ हा तृतीयपंथियांचं जगणं, कथा- व्यथा मांडणारा त्यांचा कवितासंग्रह गाजलाय. दिव्य मराठी वृत्तपत्रात, वेगवेगळ्या दिवाळी अंकात त्यांनी LGBTQ समाजाच्या प्रश्नांवर सदरलेखन केलंय. शाळा- कॉलेजात मुलांसोबत बोलून त्या तृतीयपंथीय समाजाबद्दलचे गैरसमज मिटवण्याचं काम करतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने प्रभावित झालेल्या दिशा शेख सध्या वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.

तिसरं असंच एक खणखणीत नाणं म्हणजे शमिभा पाटील. जळगावमधल्या रावेर तालुक्यातील फैजपूर इथं गेली 13 वर्षं राहणाऱ्या शमिभाताईंनी तिथल्या महाविद्यालयात मराठीच्या प्राध्यापक म्हणून काम पाहिलेलं आहे. सध्या त्या ‘कवी ग्रेस यांच्या कवितांमधील सौंदर्यशास्त्र’ या विषयावर पीएचडी करत आहेत. राजकीय आणि वैचारिकदृष्ट्या शमिभाताईंचा अगदी 360 अंशात फिरणारा प्रवास झालाय. मूळच्या औरंगाबाद जिल्ह्यातील पैठणच्या असलेल्या शमिभाताई, लहानपणी जेव्हा धीरज/ शाम म्हणून ओळखल्या जात होत्या, तेव्हा त्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कट्टर कार्यकत्या होत्या. आधी खेळायला मिळतं म्हणून शाखेवर आणि मग संघाची तृतीयवर्ग प्रचारक म्हणूनसुद्धा त्यांनी काम केलंय.

पुढे एकीकडे आपण पुरूष नाहीत बाई आहोत या जाणीवेचा प्रवास, दुसरीकडे जेमतेम पाचवीत असताना एक मुलानं केलेलं लैंगिक शोषण आणि दुसरीकडे मुलग्यांचं कुठं लैंगिक शोषण होतं का, म्हणून झिडकारून टाकलं जाणं याचा वाईट परिणाम त्यांच्या मानसिकतेवर झाला. त्या दिवसेंदिवस अंतर्मुख बनत गेल्या, त्यात वाचन वाढत गेलं आणि त्यातच त्यांना लखलखीत वैचारिक वारसा सापडला तो- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या रूपात. झपाटल्यासारखे आंबेडकर, फुले, कर्वे सगळं काही त्या वाचत गेल्या. आणि मग आरएसएसची साथ सोडली, फैजपूरला आल्या. इथं लोकसंघर्ष मोर्चातून आदिवासींच्या जल- जंगल- जमीन हक्कांवर काम केलं. दुसरीकडे स्वत:ची ट्रान्सजेंडर ही ओळख स्वीकारली, आणि या समाजासाठीही काम सुरू केलं. या दरम्यान भयंकर मानसिक ओढाताणीने त्यांना डिप्रेशनचा त्रासही झाला- पण चांगल्या पुस्तकांनी आणि आयुष्यातील मला साथ दिली असं त्या सांगतात.

शमिभाताई म्हणतात, “मला ‘तृतीयपंथीय’ ही ओळख तात्त्विकदृष्ट्या आवडत नाही. कोण पहिलं, कोण दुसरं, कोण तिसरं हे कोण ठरवणार? त्या पेक्षा मला ‘हिजडा’ ही ओळख चालेल. हिजडा शब्दाचा अर्थच आपली मुळं सोडून दुसरीकडे रूजलेला, नवा पंथ स्वीकारलेली व्यक्ती असा होतो, जो मला चालेल.” शमिभा पाटील सध्या वंचित बहुजन महिला आघाडीच्या राज्य कार्यकारिणीवरही आहेत. त्या महाराष्ट्र राज्यातील ट्रान्सजेंडर वेल्फेअर बोर्डच्या सदस्यपदीही आहेत. यात तृतीयपंथियांना शिक्षण आणि नोकरीत तीन टक्के आरक्षण, आर्थिक विकास महामंडळावर नियुक्ती अश्या कितीतरी बाबींसाठी त्या पाठपुरावा करतायत. त्या म्हणतात “धर्मशास्त्रानं बायकांनाच दुय्यम स्थान दिलंय, कस्पटासमान लेखलंय. तर आमची दखल घ्यायला लोक वेळ लावणारच, पण आमचे अस्सल हिरे आपापल्या अंगगुणांनी चमकल्याशिवाय राहणार नाहीत.”

  • स्नेहल बनसोडे – शेलुडकर

Leave a Reply