आता सोलापुरातही होणार रणजी- दुलिप करंडक
१९७२ साली सोलापुरात इंदिरा गांधी स्टेडियमची निर्मिती झाली होती. आज पन्नास वर्षानंतर सोलापूरचे हेच इंदिरा गांधी स्टेडियम नव्या दिमाखदार रूपात क्रिकेटप्रेमींच्या सेवेसाठी सज्ज झालेले आहे. केंद्र सरकारच्या ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्पातंर्गत इंदिरा गांधी स्टेडियम अर्थात पार्क स्टेडियमचे नूतनीकरण करण्यात आलंय. एकेकाळी पुरेसं गवतही नसणाऱ्या या स्टेडियमचा कायापालट आंतरराष्ट्रीय स्तराच्या मैदानात झालाय, ही सोलापूरकरांसाठी अभिमानाची बाब आहे.
सोलापुरातील या स्टेडियमवरील मैदान मुंबईच्या प्रसिद्धा वानखेडे स्टेडियममधील मैदानापेक्षाही मोठे असून बावीस हजार स्क्वेअर मीटर इतकं या मैदानाचं क्षेत्रफळ आहे. मैदानात ११ मुख्य धावपट्ट्या, तर सरावासाठी ८ अतिरिक्त धावपट्ट्या अशा एकूण १९ धावपट्ट्या तयार आहेत. एकाच वेळेला पंचवीस हजार प्रेक्षक क्रिकेट सामन्यांचा आनंद घेऊ शकतील, अशी सुसज्ज बैठकव्यवस्था करण्यात आलीये. शिवाय अचानक जोराचा पाऊस आला तरी अवघ्या तीस मिनिटांत क्रिकेट सामना पुन्हा सुरू होऊ शकेल, अशी पॉवरफुल अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टिम या स्टेडियमवर करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय स्तकावरील ग्रेड वनच्या मॅचेस होऊ शकतील, इतकी सुसज्ज व्यवस्था इंदिरा गांधी स्टेडियमवर झालेली आहे.
आंतरराष्ट्रीय दर्जाच्या या मैदानावरील विकेटची चाचणी घेण्यासाठी नुकताच एक अनौपचारिक सामनाही खेळविण्यात आला. येथील विकेट (पीच) उत्कृष्ट असल्याचे संयोजकांकडून स्पष्ट करण्यात आले. या सामन्यावेळी मैदान व परिसराचे ड्रोन कॅमेऱ्याने चित्रीकरण करण्यात आले. सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनकडून सोबतचा व्हिडिओ जारी करण्यात आला आहे. या मैदानावरील धावपट्टीची चाचणी करण्यासाठी १९ वर्षांखालील मुलींची निवड चाचणी इथं आयोजित करण्यात आली होती. या निवड चाचणीसाठी राज्यभरातून नऊ संघ सहभागी झाले होते. पाच सप्टेंबर 2022 रोजी मुलींचा हा सराव सामना सोलापुरातील इंदिरा गांधी स्टेडियमवर पार पडला. मॅच खेळलेल्या खेळाडूंसह, क्रिकेटमधील जाणकारांच्या पसंतीस देखील हे मैदान उतरत आहे.
आतापर्यंत झालेल्या अनौपचारिक सामन्यांमधून या मैदानावरील धावपट्टीचे निरीक्षण- परिक्षण करण्यात आले. इथं अकरा विकेट तयार करण्यात आल्या असून, सरावासाठी दहा विकेट आहेत. अतिशय तंत्रशुद्ध पद्धतीने हे मैदान तयार करण्यात आले आहे, अशी माहिती सोलापूर मनपाचे क्रीडा अधिकारी नजीर शेख यांनी दिली. तर इंदिरा गांधी स्टेडियमवरील धावपट्टी आंतरराष्ट्रीय दर्जाची असून, सर्व प्रकारचे सामने खेळवण्यासाठी ती उत्तम आहे, असा अहवाल काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनकडे पाठवण्यात आल्याचे, सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सचिव चंद्रकांत रेंम्बर्सु यांनी सांगितले. सोलापूरकरांना लवकरच या स्टेडियमवर रणजी, दुलिप करंडक यासह कदाचित आयपीएलचे सामनेही पाहता येतील, असा विश्वास त्यांनी दर्शविला.
एकूणच सोलापूर जिल्हा आणि आजूबाजूचे मराठवाड्यातील जिल्हे तसेच शेजारच्या कर्नाटक राज्यातील क्रीडा रसिकांसाठी सोलापूरचे इंदिरा गांधी स्टेडियम ही उत्तमोत्तम सामने पाहण्याची पर्वणी ठरणार आहे. शिवाय क्रिकेट मैदानासोबत या ठिकाणी टेबल टेनिस, हॉलिबॉल, स्विमिंग टँक, लॉन टेनिस इत्यादी खेळाची मैदानेही विकसित करण्यात आली आहेत. त्यामुळे सोलापुरातील होतकरू तरूण क्रिकेटपटू आणि इतरही खेळाडूंच्या सरावासाठी आणि उज्ज्वल भवितव्यासाठी हे स्टेडियम मैलाचा दगड ठरणार आहे. या मैदानाच्या औपचारिक उद्घाटनाची आणि दिमाखदार क्रिकेट सामन्यांची सोलापुरातील क्रिकेट रसिकांना उत्सुकता आहे.
लेखन- विनोद चव्हाण, सोलापूर

Leave a Reply