टाकाऊतून टिकाऊ संकल्पनेतून उभारले हँगिंग गार्ड
सोलापूर शहरातल्या अक्कलकोट रोड परिसरातील वेदांतनगर इथे राहणारे पूजा आणि सागर अचलकर. या दाम्पत्याने तयार केलेली हँगिंग गार्डन सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
मूळची बागकामाची आवड होतीच. लॉकडाऊनच्या काळात उसंत मिळाली आणि आजूबाजूच्याच गोष्टींकडे बघण्याची वेगळी नजरही! अचलकर पतीपत्नी सांगतात. नारळ फोडल्यावर त्याची करवंटी नेहमी कचऱ्यात फेकली जाते. इतका चांगला आकार असलेली करवंटी फेकून का द्यायची? असा विचार आला आणि त्यात बागेसाठी हँगिंग पॉटस दिसू लागले.
‘’पर्यावरणाचा सर्वात मोठा शत्रू म्हणजे प्लॅस्टिकच्या बाटल्या.’’ सागर अचलकर सांगत होते. ‘’ लोक पाणी,कोल्ड्रिंक्स पिऊन झालं की, त्या बाटल्या कुठेही फेकून देतात. त्यामुळे आपल्या पर्यावरणाची हानी तर होतेच अस्वच्छताही पसरते. आमच्या घरात आलेली एकही प्लॅस्टिकची बाटली आम्ही वाया जाऊ देत नाही. त्याचा वापर बागेत करतो. बाटल्या व्यवस्थित कापून, रंग देऊन त्यात रोपे लावतो.’’ असाच उपयोग ते खराब झालेल्या टायर्सचासुद्धा करतात.
बाजारात असंख्य प्रकारचे फॅन्सी पॉट्स मिळतात. पण घरातच इतक्या टाकाऊ वस्तू असतात की त्यापासून आपण हवे तितके पॉट्स बनवू शकतो आणि सोबत स्वतः तयार करण्याचा आनंदही घेऊ शकतो,असे त्यांना वाटते. यातून मिळणारा आनंद शब्दात व्यक्त करता येणार नाही, असे पूजा म्हणतात.
अचलकर गेल्या दीड वर्षापासून तयार करत असलेल्या या हँगिंग गार्डनमध्ये, लकी प्लांट, पर्पल हार्ट, मनी प्लांट, बटन गुलाब, चिनी गुलाब, ऑफिस टाइम, लिली, शेवंती, जास्वंद, कण्हेर, अबोली, चाफा, पारिजात, जाई जुई यासारखी फुलझाडे तर सीताफळ, पपईसारखी फळझाडे मिळून जवळपास देशीविदेशी शंभर प्रकारची झाडे पाहायला मिळतात. यात सागर यांच्या आई संतोषी आणि भाऊ स्वप्नील यांचाही हातभार आहे.
-अमोल सीताफळे, सोलापूर

Leave a Reply