अडगळ नव्हे सत्कार्य
दसरा- दिवाळी उत्साहात झाली. शहरात राहणाऱ्या, सुस्थितीत असणार्या अनेकांनी मुला- बाळांसह स्वतः ला नवीन कपडे, एखादी गाडी, फ्रीज, वॉशिंग मशीन अश्या नव्या गृहोपयोगी वस्तूंची सणाच्या निमित्ताने खरेदी केली. हा आनंद मोठा असतोच पण याचवेळी नव्या वस्तूंची- कपड्यांची खरेदी करताना जुन्या सुस्थितीत असलेल्या कपड्यांचं आणि वस्तूंचं काय करायचं, हा प्रश्न असतोच. बर्याचदा या वस्तू भंगारात टाकण्याइतक्या खराबही झालेल्या नसतात. काही जण घरातल्या कामगारांना- इतर गोरगरीबांना वाटूनही टाकतात. पण घरातल्या मदतनीसांपलीकडे खरोखर गरजू असणार्यांकडे या वस्तू गेल्या तर?
तुमच्या घरातली ही अडगळ गरिबाच्या घरातली महत्वाची वस्तू ठरू शकते, हाच धागा पकडत नाशिकच्या ‘नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाईंड’ संस्थेच्या वतीने एक भन्नाट संकल्पना प्रत्यक्षात आणण्यात आली आहे. या उपक्रमाचे नाव आहे, ‘अडगळ नव्हे- सत्कार्य’!! तुम्हांला घरात नकोश्या झालेल्या पण सुस्थितीत असलेल्या वस्तू तुम्ही नॅबला दान करू शकता. नाशिकच्या सातपूर येथील नॅब चॅरिटी सेंटरमध्ये या वस्तू एकत्रित केल्या जातात. गरजू तसेच आर्थिकदृष्टया दुर्बल घटकांना या वस्तू आणि कपडे अत्यंत नाममात्र दरात विकले जातात आणि त्याची रीतसर पावतीही मिळते. जमा झालेला पैसा अंधांसाठी झटणाऱ्या ‘नॅब’च्या कामात वापरला जातो.
लोकांना नकोश्या झालेल्या वस्तूंची नाममात्र दरात विक्री
यात घरातील आवर सावरमध्ये नको झालेल्या पण चालू कंडिशनमधील जुन्या वस्तू उदा. इस्त्री, मिक्सर, टेपरेकॉर्डर, पंखे, रेडिओ, फ्रिज, वॉशिंग मशीन, खुर्च्या, कपाट, सायकली असं सर्व सामान, तसेच जुन्या उत्तम स्थितीतील साड्या, कोट, कुर्ते- पायजमे,शर्ट पँट, लहान मुलांचे कपडे असं सर्व काही स्वीकारलं जातं. आपण अनेकदा आधीच्या सामानाचा कंटाळा आला किंवा त्यापेक्षा आधुनिक व्यवस्था असलेले सामान घेण्याच्या उद्देशाने जुने सामान अडगळीत टाकतो. पण नव्या वस्तू न परवडणार्या गरीब वर्गासाठी ती लक्झरी असू शकते. या वस्तू नाममात्र दरात म्हणजे कपडे- साड्या अगदी १० रूपयांपासून ते ५०-१०० रूपयांपर्यंत, तर डबल डोअर फ्रीज ५००० रू, सिंगल डोअर फ्रीज २००० रू. , वॉशिंग मशीन १५०० रू. इ. अश्या गरिबांना परवडण्याजोग्या किंमती असतात.
ही संकल्पना कशी सुचली त्याबद्दल सांगताना, नॅबचे मुक्तेश्वर मुनशेटीवर म्हणाले, ” संस्था चालवायची तर पैसा तर लागतोच. संस्थेला निधी संकलन करण्याचे स्त्रोत काय आहे त्याचा शोध घेतला,तेव्हा सभासद बनविणे, देणगी साठी आवाहन करणे, सीएसआर‌ फंड, नाटक प्रयोग करून निधी संकलन असे उपाय होतेच. शिवाय नॅब अहमदाबाद, गुजरात येथे असे शॉप आहे, जिथे घरातल्या नको असलेल्या वस्तू देणगी आणून ती गरजू लोकांना ‘ना नफा ना तोटा’ तत्त्वावर विकल्या जातात आणि त्यातून संस्थेकरिता निधी संकलन होते. हा उत्तम पर्याय लक्षात आल्यावर हा प्रयोग नाशिकला सुरू केला. इथं ही कल्पना राबवण्यात रामेश्वर कलंत्री ,अशोक बंग आणि मी कार्यरत आहोत. तसेच रद्दीतूनही निधी संकलन करतो आणि पेपर बॅग करण्यास वापर केला जातो. फक्त सणावारालाच नव्हे तर वर्षभर वस्तू संकलन आणि विक्री चालू असते. या परिसरात कंत्राटी कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात असल्याने या उपक्रमाला उत्तम प्रतिसाद लाभतोय.”
आजवर अडगळ, जुने वाटणाऱ्या सामानातून काहींनी अगदी लग्नाचा बस्ता सुद्धा या ठिकाणी बांधलाय, तर अनेकांची दिवाळी, दसरा, ईद उत्साहात साजरी झालीये. वर्तमान पत्राच्या रद्दीतून अंध बालके कागदी पिशव्या तयार करत आहे. दुसरीकडे, या माध्यमातून जमा होणारा पैसा हा दृष्टिबाधितांच्या वेगवेगळ्या उपक्रमासाठी वापरला जात आहे. नाशिकच्या नागरिकांनी असे अडगळीतील सामान जमा करण्यासाठी ०२५३-२३५३५७, २३५५३७८,२३५१५७८ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन नॅबच्या वतीने करण्यात आले आहे.
लेखन- प्राची उन्मेष, नाशिक

Leave a Reply